पाडवा हा दिवाळीतला सगळ्यात गोड दिवस.. जोडीदारासमवेत साजरा करण्याचा. त्यातून नव्यानं जुळलेल्या नात्याच्या बंधनात असाल तर दिवाळीचा पाडवा नक्कीच स्पेशल असतो. सेलिब्रिटीही त्याला अपवाद नाहीत. काही स्पेशल जोडय़ांच्या स्पेशल पाडव्याविषयी..
नव्यानंच बंधनात अडकलेल्या काही जोडय़ांच्या मनातली दिवाळी त्यांच्याशी बोलून उलगडली.
दिवाळी सण आहे रोषणाईचा, जल्लोषाचा, आनंदाचा. घराबाहेर छान दिव्यांची आरास करून, गोडाधोडाच्या फराळावर ताव मारून, आपल्या प्रेमाच्या माणसांसोबत साजरा करण्याचा हा सण. या दिवसांमध्ये दु:खाचा लवलेशही न राहता, संपूर्ण वातावरणामध्ये गोडवा पसरलेला असतो. अशा वेळी तुमचे लाडके सेलेब्रिटीज नक्की काय करत असतात, याची उत्सुकता लागून राहिलेली असेलच ना.. आपल्या प्रिय व्यक्तींसोबतचे आपले नाते अजूनच घट्ट करणाऱ्या या सणाचे औचित्य साधून सेलिब्रिटींचे दिवाळी प्लॅन्स आम्ही जाणून घेतले. पाडवा हा तर दिवाळीतला सगळ्यात गोड प्रेमाचा दिवस. जोडीदाराबरोबर साजरा करण्याचा त्याच्या किंवा तिच्याप्रती प्रेम, आदर व्यक्त करण्याचा. त्यातून नव्यानं जुळलेल्या नात्यात तुम्ही असाल तर दिवाळीचा पाडवा नक्कीच स्पेशल असतो. असा स्पेशल लोकांचा स्पेशल पाडवा कसा असेल हे त्यांच्याचकडून जाणून घेतलं. व्हिवाच्या या दिवाळी स्पेशल अंकामध्ये नात्यामध्ये नव्यानेच जोडल्या गेलेल्या या सेलेब्रिटीच्या मनातील दिवाळी जाणून घेताना, त्यांच्या दिवाळीच्या आठवणी ऐकताना त्यांनी एकमेकांसोबत साजऱ्या केलेल्या दिवाळीचे क्षणही आमच्याशी शेअर केले. त्याचेच हे शब्दांकन..

मस्तीचा ‘गोड’ पाडवा रित्विक दंजानी – आशा नेगी
vv04‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे घराघरांत पोचलेली ही जोडी प्रत्यक्षातही विवाहबंधनात अडकणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने यांचे सूर जुळले ते कायमसाठी. गेल्या वर्षी नच बलियेमधूनदेखील ही जोडी आपल्यापुढे आली होती. रित्विक आणि आशाचे प्रेमाचे सूर जुळत असले तरी दिवाळी साजरी करण्याच्या बाबतीत दोघांच्या संकल्पना अगदी भिन्न आहेत. आशा म्हणते, ‘दिवाळी म्हणजे फराळ, मिठाई, नातेवाईक आणि मित्रमंडळी. दिवाळी म्हटलं की, मला डेहराडूनमधलं माझं घर आठवतं. आम्ही तिथे घरासमोर दिव्यांची आरास करत असू, फराळ, मिठाई वाटून मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत दिवाळी साजरी करत असू.’ याच्या अगदी उलट दुबईमध्ये बालपण घालवलेल्या रित्विकच्या मनातली दिवाळीची आठवण आहे. रित्विक म्हणाला, ‘माझं बालपण दुबईमध्ये गेलं. त्यामुळे लहापणी मला भारतातल्या दिवाळीची मजा जास्त घेता आली नाही. पण मी जेव्हा कधी दिवाळी साजरी केली असेन, ती रावडी स्टाइलनेच केली आहे. दुबईमधल्या कडक कायद्यांमुळे आम्हाला तिथे फटाके वाजवायला परवानगी नसे, पण तरीही लपूनछपून पोलिसांच्या नजरा चुकवून आम्ही फटाके उडवायचो. भारतात गावी आल्यावर मित्रांसोबत फटाके उडवण्याचे सुख पूर्णपणे उपभोगायचो.’
रित्विक आशाचं लग्न अजून झालेलं नसलं तरी एकमेकांसोबतची ही त्यांची दुसरी दिवाळी आहे. ‘मागच्या वर्षी दिवाळीच्या दिवसांमध्ये आम्ही ‘नच बलिये’ हा कार्यक्रम करत होतो आणि योगायोग म्हणजे नेमक्या दिवाळीच्या दिवसांमध्ये डान्सच्या सरावादरम्यान आम्ही जखमी झालो होतो. त्यामुळे आमची पहिलीच दिवाळी ‘जखमी दिवाळी’ होती असं म्हटलं तरी काही हरकत नाही. यंदा दिवाळीमध्ये मात्र आम्ही एकमेकांसाठी शूटिंगमधून थोडा वेळ काढून एकत्र दिवाळी साजरी करणार आहोत. पण या वेळी आम्ही एकमेकांच्या पद्धतीने दिवाळी साजरी करणार आहोत, म्हणजे मी आशा सांगते त्याप्रमाणे गोडाधोडाचं खाऊन आणि आशा माझ्याप्रमाणे भरपूर मस्ती करून दिवाळी साजरी करणार आहे,’ रित्विक सांगतो. रित्विक आशाचा पाडवा यंदा गोड होणार तर!

फटाक्यांशिवायची धमाल दिवाळी प्रिया बापट आणि उमेश कामत
vv09‘नवा गडी नवं राज्य’ या नाटकातून आणि नंतर  ‘टाइमप्लीज’ चित्रपटातून लोकप्रिय झालेली जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत प्रत्यक्षातही लग्नाची जोडी आहे. प्रिया सांगते, ‘माझ्यासाठी सण कोणताही असो, पण आपल्या कुटुंबासोबत आणि नातेवाईकांसोबत छान वेळ घालवणं सर्वात महत्त्वाचं असतं. दिवाळीच्या दिवसांमध्ये माझ्या सासरचे आणि माहेरचे सर्व एकत्र मिळून छान दिवस साजरा करतो. माझ्या लहानपणीची दिवाळीबाबतची आठवण एका चुकीच्या आणि वाईट कारणासाठी लक्षात आहे, असं म्हणायला हरकत नाही. लहानपणी एकदा फटाके खेळताना माझ्या फ्रॉकला आग लागली होती. आता त्या प्रकरणाचा धसका असेल किंवा वाढत्या वयाबरोबर फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची जाणीव झालेली असेल म्हणून, पण त्यानंतर मी दिवाळीमध्ये फटाके वाजवायचे नाही हे ठरवलं होतं.’ अर्थात उमेश आणि तिला एकमेकांना ‘स्पेशल फील’ करून देण्यासाठी दिवाळीसारख्या सणांची वाट पाहावी लागत नाही, असं तिचं म्हणणं आहे. ‘एकमेकांना गिफ्ट्स देण्यासाठी किंवा एकमेकांसाठी खास काही करण्यासाठी आम्ही सणांचं निमित्त शोधत नाही. ज्या वेळी एकमेकांच्या बिझी शेडय़ुलमधून थोडासा वेळ काढता येणं शक्य असेल, तो दिवस आमच्यासाठी खास असतो. पण दिवाळीच्या एका दिवशी तरी आम्ही दोघं रजा मिळेल असा प्रयत्न नक्कीच करतो. यंदाही भाऊबिजेच्या दिवशी आम्ही सुट्टी घेण्याचा विचार करत आहोत. या वेळी आमची दोघांचीही भाऊबीज आमच्या घरीच साजरी होणार आहे. माझे भाऊ आणि उमेशच्या बहिणी आमच्या घरी येणार आहेत. त्यामुळे त्या दिवशी आमच्याकडे धमाल असेल,’ असे प्रिया सांगते.  

लॉबस्टरचा चमचमीत बेत – आदिनाथ कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर-कोठारे
मराठी चित्रपटक्षेत्रातली एक ग्लॅमरस जोडी म्हणून आदिनाश कोठारे आणि ऊर्मिला कानेटकरचं नाव घेतलं जातं. अनवट या चित्रपटातून नुकतंच त्यांनी एकत्र दर्शन दिलंय. आदिनाथ कोठारे सांगतो, त्याच्यासाठी दिवाळी म्हणजे नातेवाईकांसोबत भरपूर फराळ खाऊन,गप्पा मारत साजरा करण्याचा सण आहे. म्हणूनच वर्षांतला हा त्याचा सर्वात आवडता सण आहे आणि वर्षभर तो त्याची आतुरतेने वाट पाहत असतो. ‘दिवाळीची पहिली आंघोळ असो किंवा आईच्या हातचा फराळ, दिवाळीमध्ये घालवलेल्या प्रत्येक क्षण मला खूप आवडतो. त्यामुळे या सणाची वाट मी कायम पाहत असतो. माझी आणि ऊर्मिलाची पहिली दिवाळीही मला अजूनही जशीच्या तशी आठवते आहे. प्रत्येक दिवाळीच्या वेळी आम्ही एक प्रघात नित्यनियमाने पाळतो. तो म्हणजे, पहिल्या आंघोळीनंतर मी, ऊर्मिला आणि आई बाजारात जातो आणि भरपूर लॉबस्टर खरेदी करतो. मग आई मस्त चमचमीत जेवणाचा बेत करते आणि आम्ही त्यावर तुटून पडतो,’ आदिनाथ सांगतो. यंदाही लॉबस्टरच्या चमचमीत जेवणाचा मेनू दिवाळीत असणारच आहे, हे सांगताना आदिनाथ आणखी एक आनंदाची गोष्ट सांगतो. यंदा योगायोगाने दिवाळीत ऊर्मिलाचा एक चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे तो चित्रपट पाहून आम्ही दिवाळी साजरी करणार असल्याचे तो सांगतो. त्यामुळे यंदा दिवाळीत थोडी हुरहुर, उत्कंठा आहे. चित्रपटाला प्रेक्षकांची कशी प्रतिक्रिया मिळते याची उत्कंठा यंदाच्या दिवाळीत लागून राहणार आहे, आदिनाथ म्हणाला.

रवी दुबे आणि सर्गुन मेहता
vv10  जमाई राजामधून परिचित झालेला रवी दुबे आणि बालिका वधूमधून घराघरांत पोचलेली सर्गुन मेहता नुकतेच प्रत्यक्ष आयुष्यात लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांची लग्नानंतर पहिलीच दिवाळी आहे. रवी सांगतो, ‘माझ्यासाठी दिवाळी म्हणजे दिल्लीला त्याच्या घरी जायची एक संधी असते. कामासाठी मुंबईत आलो असलो तरी गेली कित्येक वर्षे मी न चुकता दिवाळी दिल्लीला घरी जाऊन साजरी करत आलो आहे.’ पण यंदा लग्नामुळे कदाचित त्याच्या या रुटीनमध्ये थोडा बदल करावा लागणार आहे. ‘या वेळी माझी आणि सर्गुनची लग्नानंतरची पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे कदाचित आम्ही दोघे चंदिगढला तिच्या घरी दिवाळी साजरी करायला जाऊ. एक तर तिथे माझे आईवडील दिल्लीहून येतील किंवा दिल्लीला दिवाळीसाठी गेलो तर तिचे आईवडील आमच्याकडे येतील. पाहूयात काय होतयं ते,’ रवी सांगतो. दिवाळीवरून रवीला अजून काही आठवत असेल, तर ते आईच्या हातचा ‘मूंग दाल का हलवा’. ‘दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाके वाजवणे मी टाळतो. प्रदूषणात भर घालण्यापेक्षा आप्तेष्टांमध्ये आनंदात दिवाळी साजरी करायला आमचं प्राधान्य आहे. त्यामुळे दिवाळी म्हणजे गोडाधोडाचे खाणं आणि पत्ते खेळणं, हे आमच्या घरातलं समीकरण. लहानपणी दिवाळीत माझी आई हमखास काजूकतली आणि मूंग दाल का हलवा बनवायची. हा माझा दिवाळीचा आवडता मेवा. त्याचबरोबर गंमत म्हणून मी दिवाळीच्या दिवशी तीन पत्ती आणि फ्लॅश खेळायचो. त्यात पैसे जिंकण्यापेक्षा खेळाचा आनंद घेणं महत्त्वाचं असायचं. आम्ही तर पैशांच्या जागी कागदांचा वापर करायचो,’ रवी लहानपणच्या आठवणीत रमतो. दिवाळीचा पहिला पाडवा कसा असेल आणि सर्गुनला काय घेणार हे मात्र त्याच्याशी बोलताना गुलदस्त्यातच राहतं. पाडव्याची खरी गोडी अशा सरप्राइझेसमध्येच असावी.