भटक्या कुत्र्यांना- मांजरांना जीव लावायचं काम हा मीत नावाचा अवलीया गेली अनेक वर्ष करतोय. स्वतच्या पॉकेटमनीचे, बक्षीसांचे आणि आर्टिकलशिपचे पैसे राखून ठेवून त्यांच्यावर उपचार करतोय.
‘‘सोमवारचा दिवस होता तो.. माझ्या आर्टिकलशिप अंतर्गत मी वाशीतल्या एका कंपनीत काम करत असताना मला फोन आला की, माझ्या घराजवळच म्हणजे ठाण्यातल्या विष्णूनगरमध्ये एका मांजरीवर कुत्र्याने झडप घालून तिला जखमी केलंय. माझं कामात लक्ष लागेना. वरिष्ठांची कशीबशी परवानगी काढून निघालो आणि त्या निश्चेष्ट पडलेल्या मांजरीला एका खोक्यात मऊ फडक्यावर ठेवून रिक्षाने तडक मालाडला डॉक्टरांकडे पोहोचलो. तिच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती. डॉक्टर म्हणाले, ‘तिला सलाइन देऊन पाहू पण त्यासाठी तिला रोज इथे आणावं लागेल.’ मांजरीला प्रवासाची दगदग नको म्हणून मी तिला गोरेगावला माझ्या एका मित्राकडे ठेवलं. त्यानंतर पुढचे १८ दिवस रोज वाशीहून संध्याकाळी ६-६।। ला निघून गोरेगावला जाऊन, मांजरीला घेऊन मालाडला जायचं. तिथे दीड-दोन तास थांबून उपचार घेतल्यावर पुन्हा त्याच क्रमाने ठाण्याला यायला मला रात्रीचे दोन-अडीच वाजायचे. एवढं करूनही जेव्हा १९व्या दिवशी तिने डोळे मिटले तेव्हा मी अक्षरश: ढसढसा रडलो..’’ दोन वर्षांपूर्वी घडलेला हा प्रसंग सांगतानाही ‘त्याला’ला भावना आवरता येत नव्हत्या. या मुलाचं नाव मीत आशर.
पाळलेल्या प्राण्यांवर प्रेम करणारे असंख्य भेटतात पण बेवारस अशा मुक्या प्राण्यांसाठी जीव टाकणारा मीत सारखा एखादाच! १९ वर्षांचा हा मुलगा मुलुंडच्या वझे-केळकर कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षांत शिकतोय. बरोबर सी.ए. फायनलचा अभ्यासही सुरू आहे. अभ्यासासाठी तो वेळ कुठून काढतो कोणास ठाऊक? कारण त्याला महिन्यातले कमीत कमी २५ दिवस मुंबई-ठाण्याच्या कानाकोपऱ्यातून कॉल असतात. कधी मुक्या प्राण्यांवरील अत्याचाराविषयी तक्रार आली तर त्या त्या सोसायटीत जाऊन संबंधितांना समज द्यावी लागते. अगदी पोटतिडकीने तो आपला मुद्दा त्यांच्या गळी उतरवतो; कधी भांडतोदेखील. वेळप्रसंगी पोलिसांची मदत घ्यावी लागते. या संदर्भातील कायद्यांची माहिती त्यांच्या तोंडावर आहे.
या घडीला मीतपाशी १२ मांजरी आहेत, सगळ्या कुठल्या ना कुठल्या अपघातातून याने सोडवून आणलेल्या. मीत म्हणतो, ‘आता त्या माझ्याजवळच राहणार.’  शिवाय तो राहतो त्या परिसरातल्या २२ भटक्या कुत्र्यांचाही तो पालक आहे. त्यांना खायला घालणं, औषधोपचार, लसीकरण, नसबंदी.. ही त्याची जबाबदारी! स्वत: पूर्ण शाकाहारी असून (मीत गुजराती आहे.) आपल्या या कुत्र्यांसाठी तो पेडिग्री (चिकन जेली)ची पाकिटं आणतो आणि भात किंवा चपातीत कुस्करून त्यांना खायला देतो. रोज १२ पाकिटं लागतात आणि २५ चपात्या. चपात्या मीतची आई करते, ती घोडबंदर येथील शाळेची प्रिन्सिपॉल आहे.
थोडीथोडकी नव्हे तर गेली ८ वर्ष मीतचं हे भटक्या कुत्र्या-माजरांना जीव लावणं सुरू आहे. मीत अगदी लहान होता, म्हणजे ३-४ वर्षांचा तेव्हा त्याचे आजोबा कुत्र्यांना बोलावून बिस्किटं द्यायचे. ते पाहून हा मुलगा शाळेच्या डब्यातील पोळी-भाजी स्वत: न खाता वाटेतल्या कुत्र्यांना खाऊ घालायचा. हळूहळू त्याने प्राथमिक उपचारांची माहिती करून घेतली. ठाण्याच्या डॉ. एस. आर. देशपांडय़ाकडून तो बरंच काही शिकला. फक्त कुत्री-मांजरीच नव्हेत तर त्याने आत्तापर्यंत शेळ्या, मेंढय़ा, गाय, बैल, म्हैस आणि हो ४-५ घोडय़ांनाही प्राथमिक उपचार देऊन, पुढे हॉस्पिटलमध्ये नेऊन बरं केलंय.
अर्थात हे सर्व करण्यासाठी खर्चही पुष्कळ येतो. प्राण्यांसाठी खास गाडी मागवून त्याना दवाखान्यात नेणं-आणणं, गोळ्या-इंजेक्शनची खरेदी, त्याचबरोबर त्यांची किडनी स्टोन, हार्निया, टय़ूमर, अ‍ॅम्प्युटेशन.. अशी ऑपरेशन्स धरून महिन्याला १२ ते १५ हजार तरी लागतातच. मीतचं काम माहीत झाल्याने माणसं आता त्याला मदत करू लागली आहेत, पण सर्वात आधी तो स्वत:चा स्टायपेंड, पॉकेटमनी, कधीमधी बक्षिसादाखल मिळालेली रक्कम यातील पैन् पै बाजूला ठेवतो. या झपाटलेल्या मुलाने आपल्या या वेडापायी गेल्या ४-५ वर्षांत एकही सिनेमा बघितलेला नाही.
मदत मिळवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरायलाही तो आता शिकलाय. एकदा एक गाय जखमी अवस्थेत फिरतेय. असा त्याला बोरिवलीहून फोन आला. मीतने जाऊन बघितलं तर अतिशय हडकुळ्या अशा त्या गायीला ३-४ ठिकाणी जखमा झाल्या होत्या, त्यातच भर म्हणजे तिला दिसतंही नव्हतं. त्याने गाडीसाठी फोन केला तर त्या माणसाने ६००० रु. तयार आहेत का म्हणून विचारलं. (३००० तिला उचलण्यासाठी आणि ३००० पहिल्या आठवडय़ाच्या उपचारांसाठी). नशिबाने मीतच्या खिशात वाढदिवसाला मिळालेले दोन हजार रुपये होते. त्याने क्षणभर विचार केला आणि लगेचच तिथल्या तिथे आजूबाजूच्या लोकांना या ‘गोमाते’विषयी भावनिक आवाहन करून उरलेले पैसे जमवले. सध्या ती गाय एका प्राणिप्रेमी महिलेच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर सुखाने राहते आहे. अर्थात मीत म्हणतो, ‘ती गाय होती म्हणूनच हे शक्य झालं.’
प्राण्यांविषयी एवढा कळवळा असूनही ‘पशुवैद्यक’ शाखेकडे न जाण्याचं कारण सांगताना तो म्हणतो, ‘मुक्या प्राण्यांवरील उपचारांचे पैसे मी कसा घेऊ शकणार होतो?’ मीत स्वतंत्रपणे काम करत असला तरी मुलुंडच्या R.A.W.W. (रेस्क्युइंग असो. फॉर वाइल्ड लाइफ वेल्फेअर) आणि ठाण्याच्या S.P.C.A. (सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ क्रएल्टि टू अ‍ॅनिमल्स) या संस्थांशी त्याचे मित्रत्वाचे संबंध आहेत. घरून आई-वडिलांचा पाठिंबा तर आहेच पण त्यांना आपल्या या मुलखावेगळ्या मुलाची सतत काळजी वाटत  राहते. पण एक दिवस या मुलाचा आदर्श इतरांना शिकवला जाईल. असं नक्की वाटतं. वाचकहो, तुम्हालाही असंच वाटतंय ना?
छाया : गुरुनाथ संभूस