vv28एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..
शाळेत असताना एकाच शब्दाचे दोन अर्थ लिहा हा प्रश्न आपण सोडवायचो ते आठवतंय का? ‘नाव’ म्हणजे नाम आणि होडी असं काहीसं ते असायचं. इंग्रजीत असे शब्द शोधायला गेलो तर तिथेसुद्धा काही शब्द सापडतात. काहीवेळा आपल्या ऱ्हस्व-दीर्घसारखाच त्यांच्या स्पेलिंगमध्ये किंचितसा फरक असतो आणि त्यातून अर्थदृष्टय़ा ते शब्द वेगळे होतात. आपल्याकडे पाणी आणि पाणि याच्यात कसा फरक होतो, अगदी तस्सेच काही शब्द इंग्रजीतही आहेत. अजिबात तिळाइतकाही स्पेलिंग फरक नसलेला शब्द असला तर एकाचा उच्चार दुसऱ्यात मिसळण्याची शक्यता अगदी १०० टक्के.
बुफे (Buffet ) हा शब्दसुद्धा अगदी असाच आहे. पंगती जाऊन उभ्याने जेवणाच्या बुफे पद्धती आपल्याकडे काही दशकांपूर्वी रुजल्या. तेव्हापासून डोक्यात गोंधळ होतो. ‘बुफे’ का ‘बफेट’ की नुसताच ‘बफे’ काय म्हणायचं नक्की? स्पेलिंगमध्ये तर ट अगदी व्यवस्थित दिसतो, पण सायबाच्या इंग्रजीत कुठलं अक्षर कधी गपगुमान बसेल म्हणजे silent होईल हे सांगता येत नाही.
तर मंडळी मुळात  buffet  या एकाच स्पेलिंगचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे मांडलेल्या जेवणाचा उभ्या उभ्या आस्वाद घेणे म्हणजे ‘बुफे’ आणि ठोसा किंवा एखाद्या गोष्टीचा आघात म्हणजे बफेट. पण हा अर्थ जेवणात मिसळून काही वेळा ‘बुफे’चं ‘बफेट’ होतं किंवा स्पेलिंगमधल्या ‘ट’ ला कसं विसरायचं म्हणूनही ‘लग्नाला बफेट होतं बरं का!’ असं म्हटलं जातं. पण खरा उच्चार सायबाच्या इंग्रजीत बुफे असाच आहे. अमेरिकन माणसं मात्र ‘बुफे’मधल्या ‘उ ’चा उच्चार करायचाही कंटाळा करत असावीत. त्यामुळे ते ‘बुफे’ऐवजी ‘बफे’ म्हणतात. त्यातही ‘फे’चा उच्चार तोंडातून वाफ काढल्यासारखा करायचा.
बुफे हा शब्द मूळचा फ्रेंच. पण अशा प्रकारे जेवणाची पद्धत मात्र स्वीडिश. त्या काळात राजेरजवाडय़ांकडे जेवण मांडायची व वाढायची सामग्री अजोड असायची. चांदीची टेबलं, सोन्याची भांडी यांचं प्रदर्शन करण्याच्या इच्छेतूनच ही बुफे पद्धती रुजली. आपल्या भारतीयांकडे सोन्या-चांदीची भांडी नव्हती असं नाही, पण आसनमांडी घालून जेवणं आरोग्यदृष्टय़ा हिताचं मानलं जाई. ही मान्यता मोडून हातातल्या ताटवाटय़ा सावरत, रेशमी साडय़ा आणि भरजरी कुर्त्यांवर डाग पडू न देता ‘जेवलो बुवा एकदाचे!’ असं म्हणत हुश्श करायचे दिवस आता आले आहेत. आता पद्धत रुजलीच आहे तर किमान उच्चार तरी नेटका करू या. तेव्हा हॉटेलमध्ये किंवा लग्नाच्या जेवणात बफेटवर फुल्ली आणि बुफेवर राईट क्लिक.
रश्मी वारंग – viva.loksatta@gmail.com