vv10एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..

इंग्रजी शब्दांच्या वापराबाबत एकीकडे प्रचंड नाराजी असताना दुसरीकडे अगदी तळागाळापर्यंत काही इंग्रजी शब्द इतके झिरपले आहेत की ते शब्द मूळचे मराठी नाहीत, इंग्रजी आहेत, असं ओरडून सांगितलं तरी काहींना खरं वाटणार नाही. बरं त्यांना मराठीत आपण सामावून तर घेतलंच आहे, शिवाय त्यांचं गोड गोंडस बारसंसुद्धा केलं आहे.. नव्यानं. पाळण्यातलं नाव आणि आपलं रोजच्या बोलण्यातलं लाडाचं नाव कसं दोन्ही आपण स्वीकारतो तसं काहीसं या शब्दांचं होतं.
असाच शब्द म्हणजे अलार्म. हे त्याचं पाळण्यातलं नाव. पण जसं राजेशचं राजू, मीनाक्षीचं मिनू असे शॉर्ट फॉर्म होतात त्याच्या अगदी उलट थोडक्यात आटपणाऱ्या ‘अलार्म’चं काही भारतीयांनी केलं ‘आलाराम’. सखाराम, तुकाराम तसं आलाराम. कदाचित आपल्या मातीतलं वाटलं असण्याची शक्यता अधिक आहे.
हा शब्द इथे इतका रुजला आहे की, ‘अगं सकाळी सहाचा आलाराम लाव’,  अशी वाक्यं आपण इतकी सहज बोलतो की यात कोणताही इंग्रजी शब्द वापरतोय याची शंकाही येऊ नये. हे शहरी भागापुरतं नाही. अगदी गावातसुद्धा घडाळ्याचा गजर लाव असं हल्ली क्वचित ऐकू येतं. घडाळ्याचा गजर बऱ्याचदा मराठी लेखकांच्या कथा, कादंबऱ्यात वाचताना दिसतो. म्हणजे नेमकं सांगता येणार नाही, पण अलीकडे हा शब्द ऐकण्याऐवजी मी कोणत्या तरी पुस्तकात वाचल्याचं मला अधिक आठवतंय.
मुळात या शब्दाचा इंग्रजी व अमेरिकन उच्चार आहे अलार्म. त्याचा आपल्याकडे एक तर आलाराम होतो किंवा आलार्म. हा शब्द आपण घडाळ्याशी जास्त जोडला आहे पण तो तेवढय़ापुरता मर्यादित नाही.
खरं तर शब्दाचं मूळ शोधण्याच्या भानगडीत पडायचं कारण नाही, पण तरी काळ बदलत जातो, तसे या शब्दाच्या रूपात होत जाणारे बदल बघणं जाम इंटरेिस्टग आहे. १४ व्या शतकात जुन्या फ्रेंच भाषेतील अलार्मचे रूप पुढे बदलत बदलत आताचा अलार्म सिद्ध झालाय. अलार्म म्हणजे धोक्याची सूचना देणारा कोणताही आवाज. हा या शब्दाचा मूळ अर्थ आहे. पण १६९० मध्ये हा शब्द ‘अलार्म क्लॉक’ शी जोडला गेला आणि मूळ अर्थ थोडा बाजूला होऊन अलार्म म्हटलं की घडाळ्याचा गजर असं काहीसं नातं तयार झालं. आताच्या काळात मोबाइलवरच सकाळचा ‘अलार्म’ लावणारी मंडळी असली तरी हे नातं पक्कच राहिलं आहे. त्याशिवाय एखाद्याने ‘फॉल्स अलार्म’ दिला असाही शब्दप्रयोग होतो. म्हणजे थोडक्यात खोटी हुलकावणी दिली.
आता नेमका उच्चार तर कळला, किंबहुना मी तर म्हणेन की तो बऱ्यापकी माहीत होताच. ‘अलार्म’चा आलाराम करणाऱ्या अनेकांना मूळ उच्चार अलार्म आहे, हे माहीत असतंच पण तरीही ये गलती से मिस्टेक क्यूं होता है? अलार्म म्हटलं की, चला, उठा सज्ज व्हा असा भाव जाणवतो. आलाराममध्ये अजून पाच मिनिटं पडतो जरा असा एक रिलॅक्स भाव आहे. म्हणजे आपल्याला बुवा तरी तो तसा जाणवतो.आ  ला  रा  म मध्ये जे खेचलेपण आहे त्यातून हा रिलॅक्स भाव आला आहे का?  बरं ते काही असो. आलाराम गेलाराम घर में रखो. अलार्मच योग्य उच्चार आहे.  पुढच्या भेटीचा अलार्म लावून आतापुरतं बाय बाय!