कलाकार मंडळींसाठी दिवाळीचा काळ म्हणजे पर्वणी. आपल्या कलेला ओळख देणारी. या काळात अनेकांच्या प्रतिभेला नवे रंग चढत असतात. त्यात आता तरुण कलाकार मंडळींच्या मदतीला सोशल नेटवर्किंग साइट्स असल्यानं त्यांची कला सर्वदूर पोहोचतेय आणि त्यातून नवे व्यवसायही फुलताहेत. अशाच काही कलाकारांच्या कलात्म दिवाळीवर एक नजर..
 
दिवाळी हा दिव्यांचा उत्सव, तसा आपल्यातल्या कलाकारालाही जागवणारा उत्सव. प्रतिभेचा उत्सव. दिवाळीनिमित्त आकर्षक रोषणाई करायला घर सजवायला आपण सगळेच सज्ज असतो. पण आपल्यातीलच काही तरुण कलाकार आपल्यातल्या कलेच्या आविष्काराने दिवाळीला एक वेगळाच रंग देऊन जातात. ही मंडळी स्वत:ची घरं सजवता सजवता आपल्या कलेने इतरांची घरंसुद्धा सजवतात.
vv08लक्ष्मी शिवरामन ही अशीच एक कलाकार. स्वत:चा छंद जोपासण्यासाठी अगदी दुसरीत असल्यापासून विविध प्रकारच्या पणत्या डिझाइन करतेय. छंदातूनच तिने आता याला व्यवसायाचं स्वरूपही प्राप्त करून दिलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कुंदन, रंगीबेरंगी स्टोन्स, कलर्स वापरून पणत्यांना ती एक वेगळाच लुक देते. पिकॉक डिझाइन्स, बॉक्स डिझाइन्स, पॉट किंवा अ‍ॅटमबॉम्ब डिझाइन्स अशी तिने स्वत: या डिझाइन्सला नावं दिली आहेत. आपल्या या डिझायनर पणत्यांच्या प्रदर्शनासाठी तिनं सोशल नेटवर्किंग साइटचा पर्याय निवडला आहे. तिचं स्वत:चं फेसबुक पेज आहे. त्यातूनही तिच्या कलेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. या वर्षीचा तर तिचा ‘स्टॉक’ दिवाळीआधीच संपलेला होता. आपली दिवाळी वर्षांतून एकदाच येते पण अनेक सणांना आणि वाढदिवसांना भेट म्हणून देण्यासाठी लक्ष्मीचा दीपोत्सव वर्षभर सुरूच असतो.
Painting is my passion, असं म्हणत गायत्री निंबकरसुद्धा स्वत:च्या आनंदासाठी पणत्या रंगवते. शाळेच्या सुट्टय़ांमध्ये जडलेली ही कला ती आजतागायत जपत आहे. मार्केटमध्ये मिळणाऱ्या प्लेन पणत्या आणून प्रथम ती ब्राइट कलर्सने बेस तयार करून घेते. त्यानंतर कलर टय़ूब वापरून काँट्रास्ट फॅब्रिक रंगांनी ती पणत्यांना सजवते. दिवाळीसाठी खास म्हणून ती स्वत: केलेल्या पणत्या आपल्या नातेवाईकांना भेटवस्तू म्हणून देते.
आईच्या ‘हॉबी क्लासेस’मधून प्रेरणा घेत रेणुका वाघनेही आपली आवड जपली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात परंपरा जपायला वेळही नसतो पण त्या आवडतात तर खरं. रांगोळी काढणं ही अशीच एक प्रथा. सध्याच्या बिझी लाइफस्टाइलमध्ये रांगोळी काढणं म्हणजे सोप्पं नाही बुवा! त्यातून फ्लॅट सिस्टीममध्ये तर हे काम अवघड होऊन बसतं. कारण काढायला जागा शोधण्यापासून तयारी असते, असंही काहींचं म्हणणं. त्यांच्यासाठीच ‘रेडी टू युज’ असा पर्याय रेणुकाने शोधून काढला. ती ‘लाकडावरची रांगोळी’ तयार करते. घरच्या जुन्या लाकडाचे कटआऊट कापून घेऊन त्यावर अ‍ॅक्रेलिक रंगांनी, थ्री डी आउटलाइनरचा वापर करून ती रांगोळी तयार करते.     या वर्षीचे विशेष म्हणजे ‘संस्कारभारती रांगोळी’ ही लाकडावर साकारताना दिसणार आहे.
 ‘पर्यावरणाला हानी होऊ न देता’ सणासाठी काही तरी वेगळं करायचं हा ध्यास घेऊन शब्दुली कुलकर्णी पेपर स्ट्रिप्स वापरून रांगोळी तयार करते. पेपर क्वििलग असंही या प्रकाराला म्हटलं जातं. सणांमध्ये घराच्या डेकोरेशनसाठीही याच कागदांचा वापर करून ती चिमण्या, बॅगवरची सजावट, बुकमार्क्‍स, फुलं अशाही वस्तू बनवते. कागदाच्या घडीवरच हा सगळा खेळ अवलंबून असतो. शिवाय आपल्या जवळच्या लोकांना, मित्रमत्रिणींनाही ती हे करूनही देते. अशा प्रकारे ‘इकोफ्रेंडली पद्धतीचं असं आर्ट’ ती वर्षभर जपत असते.
 दिवाळीच्या दिवसांत ज्याच्या रोषणाईने घर आणि आजूबाजूचा परिसर प्रसन्न होऊन जातो तो म्हणजे आकाशकंदील. ‘लॉ’चा अभ्यास करता करता आपल्यातील क्रिएटिव्हिटी जपायची हे ठरवून नेहा भन्साळी आकाशकंदील तयार करते. तिचे आकाशकंदील वॉशेबल असतात. फायबर प्लॅस्टिक मटेरिअल वापरून हा आकाशकंदील ती बनवते. वेगवेगळ्या आकारांचे आकाशकंदील ती दिवाळीच्या स्वागतासाठी तयार करते. हे कंदील ३ ते ४ वर्षे आरामात राहू शकतात. या वर्षीपासूनच केवळ मज्जा आणि आनंद म्हणून नेहाने सुरू केलेल्या या कंदिलांना भरघोस प्रतिसाद मिळाला. गोरेगाव, माटुंगा, मालाड, माहीम, भाइंदर अशा अनेक ठिकाणी तिनं कंदिलांचं प्रदर्शन भरवलं होतं.
इलेक्ट्रॉनिक्सची आवड असणारा सागर हा दृष्टिहीन असूनही ‘टाकाऊतून टिकाऊ’ या कल्पनेसाठी तो वर्षभर काही ना काही बनवत असतो. जे हातात मिळेल त्याने अगदी बसल्या बसल्या तो काहीही बनवू शकतो. बाटल्या, वापरलेले कागद, स्ट्रॉ, लहान-मोठय़ा आकाराची झाकणं, एक्स-रे यांसारख्या विविध टाकाऊ वस्तूंचा वापर करून सागर आकर्षक असा ‘आकाशकंदील’ बनवतो. सध्या दिवाळीसाठी एलईडी लँप्स वापरून आकाशकंदील आणि कलर रिफ्लेक्टर बनवण्याचं त्याचं काम चालू आहे, याचं प्रदर्शन भरवण्याचीही त्याची इच्छा आहे. घरातल्या डेकोरेशनसाठी आयड्रॉपच्या रिकाम्या बाटल्यांचा वापर करून फूल तयार करणे, इंजेक्शनच्या बॉटल वापरून मंदिर तयार करणे असे विविध प्रयोग सागरचे चालू असतात. खराब झालेले कागद आणि पत्रिका यांचा वापर करून तो ‘गिफ्ट बॉक्स’देखील तयार करतो. अशा प्रकारे टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून आपल्या कलेच्या दृष्टीने निसर्गाचा समतोल राखण्याचा सागर पुरेपूर प्रयत्न करत आहे. जणूकाही सागरची ही कला तुमच्या-आमच्या सारख्यांच्या दृष्टीला आव्हानच देते असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही.
आपल्या छंदातून, स्वत:च्या आनंदासाठी रांगोळ्या, पणत्या, आकाशकंदील साकारून इतरांच्या घरात आनंद फुलवणारी अशी किती तरी तरुण मंडळी आहेत. कला आणि सण याची पूर्वापार परंपरा आपल्या भारतात आहेच, हीच परंपरा आपल्या ‘हटके स्टाइल’ने हे युथ जपत आहेत. परंपरा जपतानाच नावीन्यपूर्ण असे कलाविष्कार ही तरुणाई साकारताना दिसते.