सर, मी ३५ वर्षांची आहे. मी पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल स्टुडंट असून सध्या मी सुपर स्पेशलायझेशन करत आहे. माझी अशी अडचण आहे की, मी कोणाशीही नजरानजर केली की, त्या व्यक्तीची माझ्या बाबतीतली वागणूक बदलून जाते. काहीजण मला टाळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मी माझ्याच कोषात राहते. संकुचित विचारसरणीनं सहसा कोणाशीही नजरानजर करणं टाळते. लोक म्हणतात की, मी छान दिसते; पण माझी पर्सनॅलिटी प्रभावशाली नसल्यामुळे लोक मला नोटीसच करत नाहीत. माझ्या मते, इतरांसोबत वर्चस्वाच्या वागण्याच्या स्वभावामुळे मी थेट समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहते (नजरानजर करते). इतरांशी कसं वागावं याबाबत मला प्लीज मार्गदर्शन करा. विशेषत: पुरुषांशी/ मुलांशी बोलताना यामुळे अडचण येते. ते मला टाळणार नाहीत, मला नीट समजून- ऐकून घेतील, यासाठी मी काय करू? माझ्या प्रोफेशनला पाहता माझं असं निरीक्षण आहे की, माझ्यापेक्षा वयाने लहान असणारी मुलंही माझ्यात रस घेतात. मला उपाय सुचवा जेणेकरून मुलं, पुरुष माझा आदर करतील आणि मी त्यांना न घाबरता सामोरी जाईन.
– अरुंधती आवडे

प्रिय अरुंधती,

तुझ्या प्रश्नावरून मला जे समजलं ते मी पहिल्यांदा लिहितो. तू एक हुशार, मेहनती मुलगी आहेस. वैद्यकीय अभ्यासात पदव्युत्तर शिक्षण घेणे हे काही छोटेमोठे काम नाही. वयाच्या ३५ व्या वर्षी तू शिक्षण घेते आहेस यावरून हे खरंच प्रशंसनीय आहे. आपल्या समाजात बुद्धी आणि सौंदर्य याबद्दल स्त्री- पुरुष यांचे काही वेगळेच विचार असतात. उच्चविद्याविभूषित पुरुषसुद्धा पुरुषप्रधान समाजात स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणूनच बघतात आणि तशीच भीती स्त्रियांनाही असते. तुमच्या प्रश्नामध्ये मला कुठेतरी त्याचाच भास होतो आहे. मेडिकल कॉलेजसारख्या ठिकाणी, हॉस्पिटलमध्ये काम करत असताना काळ, वेळेचं भान न राखता रुग्णासाठी झटत असताना बरेच फावले क्षण डॉक्टरांना एकमेकांच्या बरोबरीत मिळतात. शरीरशास्त्राच्या अभ्यासामुळे आणि एकत्रित घालवलेल्या वेळामुळे बरेचदा इतर व्यवसायापेक्षा थोडेसे मैत्रीपूर्ण संबंध वैद्यकीय क्षेत्रात होताना दिसतात. जेव्हा हे आपल्याला गैर वाटतं तेव्हा अशा संबंधाची आपल्याला भीती वाटू लागते. परंतु, ते प्रत्येक वेळी घातकच असतील असे नाही.
उच्च शिक्षण घेताना आपण ज्या वयात असतो तेव्हा मैत्रीपूर्ण संबंधातील समज आपल्याला समजायला हवी. स्त्री-पुरुषांमधील नैसर्गिक आकर्षण हे १७- १८ व्या वर्षी ठीक असतं. पण नंतर ते एकमेकांबद्दल असलेल्या कुतूहलात बदललं पाहिजे. मैत्री ही कुतूहलापोटी असली पाहिजे. एकत्र काम करत असताना जर एकमेकांबद्दल कुतूहल नसेल, तर जाणिवा येणार नाहीत, आणि जाणिवा नसतील तर एकमेकांची समज येणार नाही. टीमवर्कमध्ये हे अपेक्षित नसतं का? नात्याची टाळी दोन हाताने वाजते. जर एक हात अवघडत असेल, तर दुसऱ्या हाताने समजून घेतले पाहिजे.
तुम्ही स्वत:ला विश्वासात घ्या. तुमच्या आत्मविश्वासाने तुमच्या सौंदर्याकडे बघण्याचा इतरांचा दृष्टिकोन वेगळा होऊ शकतो. पण त्यासाठी तुमच्या वागण्यात मोकळीकीप्रमाणेच एक करारीपणा असला पाहिजे. त्यासाठी स्वत:च्या वागणुकीवर बंधन ठेवा. आपले प्राधान्यक्रम आपल्यालाच निश्चित करावे लागतील. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आपण मैत्री करायला नाही, तर शिक्षणासाठी आलो आहोत. पण ते शिक्षण चांगलं व्हावं यासाठी सहकाऱ्यांबरोबर चांगलं, विश्वासाचं नातं जोडणं हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.

मोकळं व्हा!
अभ्यास, परीक्षा, रिलेशनशिप, ब्रेक-अप, एकटेपणा, रॅगिंग.. अशा एक ना दोन असंख्य गोष्टीत नैराश्याचे क्षण येतात. निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा काय करावं सुचत नसतं. याचा मानसिक त्रास होतो आणि कुणाकडे तरी सल्ला मागावासा वाटतो. कुणाबरोबर तरी आपला प्रश्न शेअर करावासा वाटतो. असा कुणी तरी त्या वेळी लागतो, जो आपलं म्हणणं ऐकून घेईल, समजून घेईल आणि योग्य तो सल्ला देईल. लोकसत्ता व्हिवामधली ही जागा तुमच्या अशाच बावरलेल्या मनासाठी दिली आहे. ही जागा तुमची आहे. तुम्ही इथे मोकळेपणानं व्यक्त व्हा. मुंबईतील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशीष देशपांडे या सदरातून तुमच्या प्रश्नांना उत्तरं देतील. डॉक्टरांपर्यंत पोचण्यासाठी तुमचे प्रश्न viva@expressindia.com या ई-मेल आयडीवर आम्हाला पाठवा. सब्जेक्टलाइनमध्ये ‘बावरा मन’ असं जरूर लिहा.