vv25तरुण मुलं कट्टय़ावर एकत्र जमतात ते टाइमपास म्हणून, फेसबुकवर चालतात त्या टवाळक्या आणि डोंगरदऱ्यात ट्रेकच्या नावाखाली भटकतात ते धमाल करायला असा सर्वसाधारण समज. पण सगळी तरुणाई तशी नाही. कट्टय़ावरच्या गप्पांमधून, जंगलातल्या भटकंतीतून आणि फेसबुकवरच्या चॅटवरूनही काही चांगल्या गोष्टी घडताहेत.

अस्वच्छतेबद्दल प्रशासनाला दोष देण्यात आपण सगळेच पुढे असतो; पण माझं शहर सुंदर दिसावं म्हणून आपणहून काही करण्याचं मात्र सगळ्यांना सुचत नाही. औरंगाबादमध्ये तरुणाईचा ग्रुप नेहमीप्रमाणे सोशल नेटवर्किंगवर चर्चा करून थांबला नाही, तर एक वाहतूक बेट आणि स्मारक दत्तक घेऊन सुशोभीकरण केलं.

शहर स्वच्छ करण्यासाठी राजकीय नेते घोषणाबाजी करतात, तर प्रशासन विविध मोहिमा राबवण्याचा प्रयत्न करतं; पण बऱ्याचदा अशा मोहिमा त्या दिवसापुरत्याच मर्यादित राहतात. अशी उदाहरणं आपण नेहमीच पाहतो आणि वाचतो; पण औरंगाबाद शहरातील काही तरुण-तरुणींनी एकत्र येऊन एक स्मारक दत्तक घेतलं आहे. त्या स्मारकाचं सुशोभीकरण करून दाखवलं आहे. फेसबुकच्या माध्यमातून ही मोहीम सुरू झाली होती, हे विशेष.
फेसबुकच्या माध्यमातून शहरातल्या काही स्वच्छताप्रेमी तरुण मंडळींनी एकत्र यायचं ठरवलं. या ग्रुपमधील मुलांची मैत्री झाली आणि ‘माझं औरंगाबाद’ नावाने एक पेज तयार झालं. हे पेज तयार करण्याची संकल्पना मिलिंद पोटेला सुचली. ‘‘सुरुवातीला या पेजला नाव काय द्यावे, हा प्रश्न होता. ‘भारत माझा देश आहे’ या वाक्यातून प्रेरणा घेऊन आमची चळवळ सुरू झाली होती. म्हणून माझं औरंगाबाद हे नाव सुचलं,’’ मिलिंद सांगतो. ‘आपलं औरंगाबाद’देखील म्हणता आलं असतं, परंतु आपलं म्हणल्यावर जबाबदारी कोणी तरी दुसरा येऊन सांभाळेल, अशी मनोधारणा आपोआप तयार होते. माझं हा शब्द वापरला तर आपण स्वत:ची जबाबदारी समजतो. म्हणून नाव ‘माझं औरंगाबाद’ त्याने पुढे सांगितले.
vv22 माझ्या शहरासाठी काही तरी करायला हवं, या तळमळीतून मिलिंदने याची सुरुवात केली. सुमीत रगडे, अक्षय रत्नपारखे, विजय थोरात या मित्रांना घेऊन ‘माझं औरंगाबाद’चं अधिकृत फेसबुक पेज बनविण्यात आलं. समीर पानझडे, करण हजारी, निखिल गाडेकर, हृषीकेश धोर्डे पाटील, स्वप्निल गायकवाड, महेश रोडगे, सुयोग कोष्टी, अंकित अग्रवाल आदी इतर मेंबर त्यांना जॉइन झाले. शहरात चालू असलेल्या घडामोडींवर लक्ष ठेवून या पेजवर त्या गोष्टी टाकणं, या उद्देशानं प्रथम २०१३ मध्ये हे पेज तयार केलं होतं. मराठवाडय़ाची राजधानी असलेल्या औरंगाबादेत कचरा व्यवस्थापनासाठी कोणीच प्रयत्न करताना दिसत नाही. त्यातूनच आपण पुढाकार घेऊन स्वच्छतेचा वसा हाती घ्यावा, असं वाटलं.. ‘माझं औरंगाबाद’चे मेंबर्स सांगतात. त्यासाठी पहिल्या टप्प्यात त्यांनी सेव्हन हिल्स उड्डाणपुलाची साफसफाई करून या मोहिमेस प्रारंभ केला. तो यशस्वी झाल्यावर जळगाव रोडवरील स्टेट बँक ऑफ हैदराबादसमोरचं राधाकृष्णाची मूर्ती असलेलं वाहतूक बेट दत्तक घेतलं.

सगळ्याच जबाबदाऱ्यांसाठी आपण शासनाला जबाबदार धरू शकत नाही. बदलाची सुरुवात आधी स्वत:पासून करावी लागते. या विचारातूनच ‘माझं औरंगाबाद’ स्वच्छता मोहीम राबवत आहोत.
– मिलिंद पोटे

साफसफाई करून झाल्यानंतर आपली जबाबदारी संपली असं होऊ नये, म्हणून ती जागा दत्तक घेऊ न कायमची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
– समीर पानझडे
या वाहतूक बेटाचं रूप पालटायचा निर्णय घेतला. ग्रुपमध्ये वेगवेगळ्या कल्पनांवर चर्चा झाली. ग्रुप मेंबर्सनी रोज सकाळी जमिनीची लेव्हल करण्यासाठी श्रमदान करण्याचं ठरवलं. मग तिथे लोखंडी खांब गाडून हिरवळ विकसित केली. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकं बसवली. या बेटाला तारेचं कुंपण केलं. संपूर्ण बेटाला रंगकाम करून अत्यंत सुंदर जागा विकसित केली. पॉकेटमनीतून वाचवलेले २० हजार रुपये या ग्रुपने बेट सुशोभीकरणासाठी वापरले. ग्रुप मेंबर्सपैकी बहुतेक जण कॉलेजात शिकणारे आहेत. माझं शहर सुंदर दिसलं पाहिजे, या भावनेतून हे सगळं काम केल्याचं ते सांगतात. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावरही सामाजिक कार्यात सहभागी होण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. काही दिवसांत राधाकृष्ण वाहतूक बेटावर एक फायबरचा पुतळा बसवण्याचा आमचा मानस आहे, असं ग्रुप मेंबर्स सांगतात. ‘माझं औरंगाबाद’ नावानं त्यांचं फेसबुकपेज आहे.
प्रतीक्षा पाठक –    viva.loksatta@gmail.com