vv17बॉलरूम डान्सिंग या तशा अल्पपरिचित नृत्यशैलीविषयी आपण गेल्या भागात बोललो. या नृत्यशैलीची ढोबळ मानाने केलेली विभागणीही पाहिली. सालसा, चाचा, किझोंबा,वॉल्ट्झ हे युगुल नृत्याचे प्रकार बॉलरूम डान्सिंगमध्येच मोडतात.
मागच्या लेखात आपण पाहिलं की ‘बॉलरूम डान्सिंग’चे अनेक प्रकार आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचलित आहेत. बॉलरूम डान्सिंगचे प्रकार मुख्यत चार संज्ञांमध्ये विभागता येतात. यात स्टँडर्ड बॉलरूम हा एक प्रकार आहे. स्टँडर्ड बॉलरूमध्ये थोडे स्ट्रिक्ट रुल्स आणि चौकटी आहेत, ज्या ओलांडून चालत नाहीत. बॉलरूममध्ये ‘लीड’ आणि ‘फॉलो’चे दोन प्रकारचे होल्ड्स असतात. म्हणजे बॉलरूम डान्सिंगची ती मुख्य पोझिशन असते, सुरुवात असते. हातात हात धरून जो होल्ड असतो त्याला ‘ओपन होल्ड’ असे म्हणतात. ‘क्लोज्ड होल्ड’मध्ये बॉलरूमची टिपिकल पोझिशन किंवा एकमेकांबरोबर आलिंगनसदृश होल्डमध्ये उभे राहणे. यात ‘फॉलो’चा डावा हात ‘लीड’च्या खांद्यावर असतो आणि ‘लीड’चा उजवा हात ‘फॉलो’च्या पाठीवर असतो. दुसरा हात नुसता एका विशिष्ट पद्धतीने धरलेला असतो याला क्लोज्ड होल्ड म्हणतात. ‘इंटरनॅशनल स्टँडर्ड बॉलरूम’मध्ये क्लोज्ड होल्डला जास्त महत्त्व असते आणि ‘इंटरनॅशनल लॅटिन बॉलरूम’मध्ये ओपन होल्डला जास्त महत्त्व असतं.
स्टँडर्ड बॉलरूम नृत्यशैलीत क्लिष्ट किंवा स्पेसिफिक स्टेप्स करायची पद्धत असते. त्यात शिथिलता आणून चालत नाही. थोडय़ाफार फरकाने स्टँडर्ड बॉलरूम म्हणजेच शास्त्रीय किंवा क्लासिकल बॉलरूम असंही म्हणता येईल. यात वॉल्ट्ज, फॉक्स स्ट्रॉट, टँगो आणि व्हिएनीज वॉल्ट्ज अशी नृत्य येतात. या शैली अतिशय मोहक आहेत. या शैलीच्या वेगळ्या जागतिक स्पर्धा होत असतात.
फिटनेसच्या दृष्टीने या शैलीमुळे पॉस्चर करेक्शन होते. नाचताना सुडौल आणि ढंगदारपणे उभं राहण्याची पद्धत नर्तकाला अवगत होते. पोट घट्ट करून, ताठ उभे राहून, पाय जुळवून केलेली मुद्रा ‘कोअर’ स्ट्राँग करते. पायाचे, कमरेचे आणि पोटाचे स्नायू पीळदार होतात. या शैलीची सतत प्रॅक्टिस केल्याने ‘अ‍ॅब्स वर्कआउट’सुद्धा होत राहते.
viva15याउलट थोडय़ा शिथिल केलेल्या नियमावलीचा वापर करून जे केले जाते ते म्हणजे ‘लॅटिन बॉलरूम नृत्यशैली’ आणि ‘क्लब स्टाइल डान्सिंग.’ यात क्लोज्ड पोझिशनचा वापर कमी होतो आणि ओपन पोझिशनचा वापर जास्त असतो. अ‍ॅटिटय़ूड थोडा खेळकर आणि मोकळा असतो. नर्तकांची एकमेकांमध्ये केमिस्ट्री उत्तम  लागते.  नियम कमी, पण धमाल जास्त असते. याला काही जण ‘स्ट्रीट स्टाइल’ असेही म्हणतात. यामध्ये स्टेप्सचे जास्तीतजास्त व्हेरिएशन येते.
लॅटिन बॉलरूम स्टाइल्स म्हणजेच चाचा, सांबा, रुम्बा, पॅसो-डोबले आणि जाइव्ह. या सगळ्याच नृत्यशैलींमध्ये उत्स्फूर्तता जास्त आहे. युगुल नृत्यातली इंटरेस्टिंग देवाणघेवाण यात जास्त असते. या स्टाइल्स जास्त चपळतेकडे  झुकणाऱ्या आहेत. चाचा हे ‘क्युबा’ या देशाचे नृत्य असून बाकीच्या इतर लॅटिन अमेरिकन देशांतून आल्या आहेत.
viva16याशिवाय काही बॉलरुम नृत्यशैलींचे नाइट क्लब्समध्ये किंवा डिस्कोथेकमध्ये इव्होल्यूशन झाले आहे. त्याला क्लब स्टाइल डान्सिंग म्हणतात. या शैलीमध्ये अधिक वेग, एकल नृत्याची जोड (ज्याला शाइन्स असे म्हणतात)  आहे. जास्त उत्स्फूर्तता असते. बऱ्याचदा सालसा, बचाटा, मरेंगे या क्लब स्टाइल डान्सिंगमध्ये खूप जवळीकसुद्धा आढळते, पण त्यालाही एक शिस्त असते. नृत्याचा उगम जिथून झाला, त्यामुळेच ही जवळीक असेल.  बचाटा किंवा झूक लव्ह या दोन्ही नृत्य प्रकारांची सुरुवात प्रेमी युगुलांमध्ये झाली. या नृत्याचा स्थायिभाव शृंगार रसपूर्ण आहे. कारण पूर्वी हे नृत्य प्रेमी युगुलांमध्ये किंवा अनेक दिवसांनंतर भेटलेल्या प्रियकर-प्रेयसीच्या मनोभावना टिपण्यासाठी केले जात असावे.
मुळातच बॉलरूम नृत्यशैली ही आपल्याकडे फारशी प्रचलित नाही. आजकालच्या दैनंदिन धावपळीत तणावमुक्तीसाठी, पार्टनरला वेळ देण्यासाठी या शैलींची प्रचंड मदत होऊ शकते. मुळात कामामुळे हल्ली कुणालाच एकमेकांशी गप्पा मारायला सोशयलाइज व्हायला मिळत नाही.  बॉलरूम नृत्यशैलीमुळे मैत्रीची वाट फुटते. गप्पा होतात.  म्हणूनच तरुणाईमध्ये हल्ली हे प्रकार लोकप्रिय होत असावेत. नृत्याच्या विद्यार्थ्यांना नकळत स्त्रीबद्दल संवेदनशीलता, संगीताशी एकरूपता हे संस्कार बॉलरूम नृत्यामुळे होतात.
विशेष म्हणजे ७ ते ७० या सर्व वयोगटांतील लोकांसाठी ही शैली अत्युचित आहे. माझ्याकडे ७५ वर्षांचे गीता आणि चंद्रकांत परब हे  जोडपं गेली ८ वर्षे सालसा आणि बॉलरूम शिकताहेत. एखाद्या सालसा नाइटमध्ये त्यांना सालसा करताना पाहिले की त्यांची एनर्जी ही तरुणांना लाजवेल अशी असते. या नृत्यशैलींमुळे फिटनेस वाढतो, मानसिक आणि शारिरिक स्वास्थ्य वाढते.
नकुल घाणेकर -viva.loksatta@gmail.com