नववधूच्या खरेदीत बनारसी शालू असलाच पाहिजे हा तसा अलिखित नियम होता काही वर्षांपूर्वी. पण डिझायनर आणि सिंथेटिक साडय़ांच्या झगमगाटात शालूचं महत्त्व कमी झालं. शिफॉन- जॉर्जेटच्या साडय़ाच फॅशनेबल म्हणून तरुण मुली मिरवू लागल्या. बनारसी साडय़ांमधली विणकरांची कला खरं तर युनिक म्हणावी अशी. या कलेला पुनरुज्जीवन द्यायचं काम देशातल्या काही नामवंत डिझायनर्सनी हाती घेतलं आहे. बनारसी साडी पुन्हा एकदा ट्रेण्डमध्ये आणणं आणि या वेळी साऱ्या जगाचं लक्ष या पारंपरिक भारतीय कलेकडे आणि विणकामाकडे वळवावं या उद्देशानं डिझायनर आणि खासदार शायना एन सी यांच्या नेतृत्वाखाली देशातल्या नामवंत फॅशन डिझायनर्सची फळी पुढे सरसावली आहे. ‘रीइन्व्हेंट बनारस’ ही कँपेन या पुढल्या आठवडय़ात मुंबईत होणाऱ्या लॅक्मे फॅशन वीकच्या निमित्ताने आयोजित केली आहे. त्याअंतर्गत मुंबईच्या प्रसिद्ध भाऊ दाजी लाड म्युझियममध्ये वीव्ह्ज ऑफ बनारस या नावाने एक प्रदर्शन भरवण्यात आले आहे. भारतीय वस्त्रोद्योग मंत्रालयानेही यासाठी कंबर कसली आहे. रितू कुमार, अनिता डोंगरे, कृष्णा मेहता, वरुण बहल, रितू बेरी, गौरव गुप्ता असे नामवंत डिझायनर्स यानिमित्ताने एकत्र आले आहेत. रितू कुमार यांनी बनारसी कशिदाकामावरून प्रेरणा घेऊन काही नवी डिझाइन्सही यानिमित्ताने सादर केलीत.
vn05आपल्याकडे साडीवर कलात्मक काम करणारे अनेक कारागीर आहेत. पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’च्या हाकेला प्रतिसाद देऊन देशभरातील फॅशन डिझायनर्सनी एकत्र येऊन त्यांची कला ग्लोबल प्लॅटफॉर्मवर न्यायची ठरवलीय. – शायना एनसी
या प्रदर्शनात पुढाकार घेतलेल्या डिझायनर शायना एन सी म्हणाल्या, ‘भारतीय साडी, बनारसी विणकाम यानिमित्ताने जगापर्यंत पोचवायचंय. भारतीय वस्त्रोद्योग त्यानिमित्ताने चर्चेत येईल. पंतप्रधानांच्या मेक इन इंडियाच्या हाकेला प्रतिसाद देऊन देशभरातील फॅशन डिझायनर्सनी एकत्र येऊन हा उपक्रम करायचा ठरवला. यानिमित्ताने बनारसी सिल्क पुन्हा फोकसमध्ये येईल.’
केवळ बनारसी विणकामच नाही, तर यानिमित्ताने एकूणच भारतीय जरीकाम आणि विणकाम यावर अनेक प्रयोग होत आहेत. नव्या पिढीतील डिझायनर्स हे प्रयोग करत आहेत. डिझायनर गौरांग शहा म्हणाला, ‘कुठलाही क्षेत्रात क्रांती घडवून आणायची असेल तर  प्रयोग करणे फार गरजेचे आहे. असेच काही प्रयोग करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. उदाहरणार्थ बनारसी साडीवर कांजिवरम वीव. पैठणीवर असणारी डिझाइन खादी वापरूनही आम्ही केलीत. मुळात मला भारतीय कपडे फार आवडतात आणि त्यावर वेगवेगळे प्रयोग करणं हा जणू माझा छंदच आहे आणि हाच अॅटिटय़ूड माझ्या लेबलची ताकद वाढवत आहे.’