गेल्या आठवडय़ात एक मराठमोळं नाव देशभराच्या फॅशन क्षेत्राचं लक्ष वेधून घेत होतं – मानसी मिलिंद मोघे. मध्यमवर्गीय घरातली, चंद्रपूरसारख्या छोटय़ा शहरातून आलेली मानसी मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत होती. फॅशन शोची झगमग, मॉडेलिंगचं ग्लॅमर हे काही आता महानगरांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, हेच यावरून सिद्ध झालंय. मराठी मुलीही या ग्लॅमरच्या दुनियेत तितक्याच सहजपणे वावरू शकतात, हे मानसी मोघेनं दाखवून दिलं. दुर्दैवानं मिस युनिव्हर्सचा झगमगता मुकुट मानसीला मिळाला नाही, पण ती जगभरातील सौंदर्यवतींशी सामना करत पहिल्या दहामध्ये पोचली होती.
यापूर्वीही मानसीनं देश-विदेशातील विविध सौंदर्य स्पध्रेत चमकदार कामगिरी केलेली आहे. विशेष म्हणजे मानसी – चंद्रपूरसारख्या छोटय़ा शहराची कन्या. या स्पध्रेत तिची निवड झाली तेव्हा चंद्रपूरकरांनी दिवाळीनंतरही दिवाळीइतकाच आनंदोत्सव साजरा केला होता.
मानसीचे वडील डॉ. मिलिंद मोघे वेकोलिच्या एरिया हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. चंद्रपूर व इंदूर येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर मानसीने नागपुरातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. म्हणजे मानसी नुसतीच सुंदर नाही, तर ब्यूटी विथ ब्रेन्स आहे, हे तिनं सुरुवातीलाच सिद्ध केलंय. प्रथम जिल्हा पातळीवरच्या सौंदर्य स्पर्धामध्ये तिने भाग घेऊन यश मिळवले. मग विदर्भ आणि राज्यस्तरावरील विविध सौंदर्य स्पध्रेत भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकविला. यानंतर तिने थेट मुंबई आणि मग दिल्ली गाठली. तिथल्या सौंदर्य स्पर्धामध्ये भाग घेतला. यामुळे तिचा आत्मविश्वास व्दिगुणित झाला.
मिस इंडिया स्पर्धेमध्ये तिनं यश मिळवलं आणि मानसी मोघे या नावाला ग्लॅमर मिळालं. मिस इंडिया दिवा म्हणून मग मानसीला मिस युनिव्हर्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. ९ नोव्हेंबरला रशियातल्या मॉस्को शहरात या स्पर्धा झाल्या. मिस युनिव्हर्सचा मुकुट मानसीला मिळाला नसला तरी ग्लॅमरच्या दुनियेत ती आता प्रस्थापित व्हायच्या मार्गावर आहे. मराठी माणूस, तेही महानगरांबाहेरचा मराठी माणूस याही क्षेत्रात मागे नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.