चित्रपट, वेबसीरिज यात दाखवलेल्या रोड ट्रिप, ट्रॅव्हलिंगच्या गोष्टी प्रेक्षकांना आकर्षित करतात. एक वेगळा अनुभव घेण्याची, प्रवासाला निघण्याची प्रेरणा यातून मिळते. अशाच काही पडद्यावरच्या प्रवासवर्णनांविषयी..

चित्रपटाच्या चकचकीत चंदेरी पडद्यावर दिसणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला भावतात. आपल्याला वेड लावतात. आपणही असं करावं असं स्वप्न देऊन जातात. चित्रपटातून दिसणाऱ्या प्रेमाच्या कथांच्या तोडीसतोड प्रेक्षकांना सध्या आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे पर्यटन. चित्रपटातून दिसणारा प्रवास अनेकांना भुरळ घालते. या ट्रिपचं वर्णन पाहून सुरुवातीला आपलं मन आणि त्यानंतर आपली पावलं अर्थात गाडी आपसूकच त्या दिशेने वळायला लागते. चित्रपट हाच मुळात आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जाणारा रस्ता आहे. ज्यात आपण आपलं आयुष्य विसरून दुसऱ्या जगात प्रवेश करतो आणि कधीही न पाहिलेल्या, न अनुभवलेल्या प्रवासाला जातो.

‘दिल चाहता है’ आणि ‘ये जवानी है दीवानी’ या सिनेमांनी एका पिढीला प्रवासाला निघण्याची प्रेरणा दिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुंबई ते गोवा रोड ट्रिप असो किंवा मनालीचं ट्रेकिंग! हे चित्रपट पाहून प्रत्येकाला तिथे जावंसं वाटलंय. चित्रपटात पाहून गुलमर्गला गेलेले, थ्री इडियट्स पाहून मनाली ते लेह रोड ट्रिप केलेले अनेक तरुण असतील. ‘ये जवानी है दीवानी’ पाहून उदयपूरच्या प्रेमात पडलेले किंवा मग ‘दिल चाहता है’ पाहून गोव्याच्या किल्यावर जाऊन फोटो काढणारे किती तरी जण आपल्याला आजूबाजूला, फेसबुकवर फोटो शेअर करताना दिसतात. जुना ‘बॉम्बे टू गोवा’देखील विसरून चालणार नाही. ‘बर्फी’मधली झिलमिल आणि बर्फी यांचा दार्जिलिंग ते कोलकत्ता प्रवास आणि आदित्य आणि गीतचा ‘जब वी मेट’मधला रतलाम, कोटा, भटिंडा, मनाली, सिमला असा प्रवास खरंच आपल्याला भावतो. चित्रपटातून केवळ अतुल्य भारताचंच नाही तर परदेशदर्शनदेखील घडतं. यामध्ये ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’मधील स्पेन आणि ‘तमाशा’मधलं कॉर्सिका त्यातल्या रोड ट्रिपमुळे नक्कीच लक्षात राहतं.

या प्रवास वर्णनात वेबसीरिजदेखील मागे नाहीत. ‘बिंदास’ चॅनेलवर सुरू झालेली ‘ट्रिप’ ही वेबसीरिज आघाडीवर आहे. चार मैत्रिणी थायलंडला रोडट्रिपला निघतानाच्या या सीरिअलनी चांगली पकड घेतली आहे. जुन्या आठवणी, शाळेतले किस्से, इतक्या वर्षांत बदलेल्या गोष्टी, त्यांच्यातली मैत्री या सगळ्या गोष्टी पाहणाऱ्याला खिळवून ठेवतात.

या सगळ्यात थोडीशी वेगळी ठरलेली वेबसीरिज म्हणजे ‘टीवीएफ’ची ट्रिपलिंग. तिचं वेगळेपण असं की, बऱ्याचदा रोड ट्रिप म्हणजे मित्रमैत्रिणींसोबत मौजमजा करत जायचं. तेव्हाच धम्माल येते, असा समज या वेबसीरिजनं मोडीत काढला. बहीण-भावासोबतची रोड ट्रिपही तितकीच धम्माल होऊ शकते हे चंदन, चंचल आणि चितवन यांनी दाखवून दिलं. रोडीजसारखा रिअ‍ॅलिटी शो थोडा वेगळा. यामध्ये स्पर्धक साहसी प्रवासाला निघतात आणि रोडीज हे बिरुद मिळवण्यासाठी झगडत असतात. या सगळ्याला प्रोत्साहन आणि पाठबळ मिळण्यासाठी म्हणून प्रेक्षक पसंती तर आहेच त्यासोबत गाडय़ांच्या कंपनीकडून मिळणारी स्पॅन्सरशिप, ट्रॅव्हल आणि टुरिझम यांची असणारी मदत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. प्रेक्षकांना मिळणारा प्रवासाचा नयनरम्य अनुभव व या माध्यमातून त्याची होणारी जाहिरात असं दोन्ही साध्य करता येतं.

उत्तम संगीत, गाणी हीदेखील या चित्रपटांची, वेबसीरिजची जमेची बाजू म्हणायला हवी. समोर दिसणारे प्रवास केवळ प्रेक्षणीयच नाहीत तर गाण्याच्या साथीने श्रवणीयदेखील झाले. ‘हम जो चलने लगे’, ‘दिल धडकने दो’, ‘दिल चाहता है’, ‘इलाही’, ‘हैरत ही’ अशी गाणी पाहून आणि ऐकून आपणदेखील प्रवासाला निघतो. मग ‘यू हीं चला चल राही..’ कोणी म्हणालं तर ‘हसीन दुनिया’ बघायला कुणाला आवडणार नाही?

कोमल आचरेकर

viva@expressindia.com