फॅशन जगतात स्वतचा अमीट ठसा उमटवणाऱ्या स्त्रियांना ‘कौन्सिल ऑफ फॅशन डिझायनर्स ऑफ अमेरिका’ (सीडीएफए) दरवर्षी ‘फॅशन आयकॉन’ असा एक पुरस्कार देतात. जगभरातल्या फॅशन विश्वाचं या फॅशन आयकॉन पुरस्काराकडे लक्ष असतं. गेल्या आठवडय़ात न्यूयॉर्कला एका झगमगीत सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला. प्रसिद्ध गायिका, अभिनेत्री बियॉन्से हिला ‘फॅशन आयकॉन’ म्हणून गौरवण्यात आलं. बियॉन्से नोल्स ही तिच्या वेगळेपणामुळे नेहमीच रेड कार्पेटवर चर्चेचा विषय असते. पण या सोहळ्यात बाजी मारली बियॉन्सेच्या भाषणाने. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बियॉन्सेनं व्यक्त केलेल्या भावना अनेकांना भावल्या. आपल्या ‘स्ट्रगल पीरिअड’चे अनुभव सांगतानाच ती फॅशन म्हणजे काय हेदेखील जाता जाता सांगून गेली.
‘‘डेस्टिनीज चाइल्ड’पासून सुरुवात करताना आमच्या तरुण मुलींच्या म्युझिक बॅण्डकडे फारसं कुणी लक्ष देत नव्हतं. हायएण्ड फॅशन लेबल्स आमच्यासाठी डिझाइन्स करायला तयार नव्हती. कारण आम्ही काळ्या, निमशहरी भागातून आलेल्या आणि नेहमीच्या सौंदर्याच्या ठोकताळ्यात न बसणाऱ्या मुली होतो. अनेकांना माहिती नसेल, माझी आजी शिवणकाम करणारी होती. परिस्थिती फारशी चांगली नव्हती. आम्हाला महागडे डिझायनर ड्रेस घेणंदेखील तेव्हा परवडणारं नव्हतं. मग माझ्या आईनंच आमच्यासाठी ड्रेस डिझाइन केला. स्वतच्या हाताने शिवलेल्या या ड्रेसची किंमत कुठल्याही महागडय़ा ब्रॅण्डेड ड्रेसपेक्षा माझ्या लेखी जास्त होती. पुढे माझ्या पहिल्या पुरस्काराच्या वेळीही रेड कार्पेटसाठी आईनंच डिझाईन केलेला ड्रेस मी घातला. लग्नाचा गाऊनही तिनंच डिझाइन केलेला होता.
खरं तर माणसाच्या आत्म्याला कोणताच रंग नसतो, आकार नसतो आणि माप नसतं. म्हणूनच आतलं सौंदर्य हे खरं सौंदर्य असतं. फॅशन म्हणजे केवळ हायएण्ड लेबल नाही. त्यामध्ये व्यक्त होण्याची ताकद असली पाहिजे. आपल्याबद्दलच्या समजुती बदलण्याची, प्रेरणा देण्याची शक्ती सगळ्यांमध्ये असते. ती शक्ती ओळखून आपल्यातल्या वेगळेपणाला जपलं पाहिजे, आपल्यातल्या दोषांसह स्वतवर प्रेम केलं पाहिजे, तरच आपल्या आतलं सौंदर्य.. खरं सौंदर्य दिसून येईल. ते दाखवण्याची क्षमता फॅशनमध्ये आहे. फॅशन म्हणजे तुमची ओळख, तुमचं म्हणणं आणि तुमची ताकद मांडायचं माध्यम आहे.’’

गेल्या आठवडय़ात न्यूयॉर्कमध्ये ‘सीडीएफए’च्या ‘फॅशन आयकॉन’ पुरस्कार सोहळ्याप्रसंगी मायकेल जॅक्सनची आठवण करून देणारा चमचमता सूट बियॉन्सेने घातला होता.
गेल्या आठवडय़ात न्यूयॉर्कमध्ये ‘सीडीएफए’च्या ‘फॅशन आयकॉन’ पुरस्कार सोहळ्याप्रसंगी मायकेल जॅक्सनची आठवण करून देणारा चमचमता सूट बियॉन्सेने घातला होता.