‘ये मेरी स्टाईल है’ असं म्हणत बॉलीवूडमधील अनेक सेलेब्रिटी स्वत: फॅशन डिझायनर होताहेत. त्यांच्या नावाचे ब्रॅण्ड येताहेत. बॉलीवूडची ‘क्वीन’ कंगना राणावतने गेल्याच आठवडय़ात ‘व्हेरो मोडा’ या ब्रॅण्डअंतर्गत Marquee हे स्वत:चं कलेक्शन लाँच केलं. यापूर्वी दीपिका, आलिया, हृतिक, जॉन, सोनम, मलाइका, बिपाशा, शिल्पा यांनीही आपापले फॅशन ब्रॅण्ड्स आणले होते. ‘आलिया भट्टने जबाँग या ऑनलाइन पोर्टलसाठी स्वत:च्या नावाचा, स्वत: डिझाइन केलेला कपडय़ांचा ब्रॅण्ड लाँच केला, तर दीपिका पदुकोणने व्हॅन ह्य़ुेसनसोबतच स्वत:चं कलेक्शन लाँच केलं. मलायका, बिपाशा आणि सुझॉन खान यांनी ‘द लेबल कॉर्प’साठी अनुक्रमे कपडे, अ‍ॅक्सेसरीज आणि होम डेकॉरचे क्लासी कलेक्शन लाँच केले. तर श्रद्धा कपूरचा ‘इमारा’ हा स्वत:चा ब्रॅण्ड आहे. फॅशनिस्ता सोनम कपूर तिच्या रिहा या फॅशन स्टाइलिस्ट बहिणीसोबत लवकरच स्वत:च फॅशन कलेक्शन लाँच करणार आहे. याशिवाय करिना कपूर खान लवकरच एका आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत बेबो या नावाने फॅशनेबल कलेक्शन लाँच करणार आहे. म्हणजे थोडक्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील एकही नायिका या फॅशन ब्रॅण्डच्या बिझनेसमध्ये मागे नाही. मराठीमध्ये मात्र सीन थोडा वेगळा आहे. मराठी चित्रपटसृष्टीने आत्ता कुठे फॅशन सीरिअसली घ्यायला सुरुवात केली आहे.
स्वत:चा फॅशन ब्रॅण्ड सुरू करण्यामध्ये आघाडी घेतलीय तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे या दोन अभिनेत्रींनी. ‘हम किसीसे कम नही’ असं म्हणत तेजस्विनी आणि अभिज्ञा या मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींनी ‘तेजाज्ञा’ या नावाने साडय़ांचा ब्रॅण्ड ग्राहकांच्या भेटीस आणला आहे. मराठीमधील सेलेब्रिटींच्या स्वत:च्या फॅशन ब्रॅण्डचा हा बहुधा पहिलाच प्रयोग असावा. या दोन अभिनेत्रींनी स्वत: डिझाईन केलेल्या साडय़ा आता ग्राहकांना उपलब्ध होत आहेत.

खणाच्या साडय़ांना सेलेब्रिटींचं कोंदण
भारतीय स्त्रीच्या वस्त्रांमधील आभूषण म्हणजेच साडी. भारतीय स्त्री साडीमध्येच अधिक सुंदर दिसते या विचारानेच या दोघींनी ‘तेजाज्ञा’ची निर्मिती केली असं त्या सांगतात. ‘तेजाज्ञा’च्या साडय़ांचं वैशिष्टय़ सांगताना तेजस्विनी म्हणाली, ‘आम्ही पारंपरिक मराठी साडी वेगळ्या पद्धतीने सादर केली आहे. ‘खणाची साडी’ ही महाराष्ट्रीय परंपरेचा अविभाज्य भाग. खणाची साडी नसेल तर उत्सवांना काय हो शोभा! असा आग्रह जुन्या पिढीतील आपल्या आजीचा असतो. तरुण मुलींना मात्र टिपिकल साडीपेक्षा काहीतरी वेगळं हवं असतं. या खणांच्या साडय़ांना एका वेगळ्या रंगाढंगात ‘तेजाज्ञा’ने पुढे आणलं आहे.’ खणाच्या कापडाबरोबर त्यांनी वेगवेगळी कॉम्बिनेशन्स आणली आहेत. कॉटन फॅब्रिक- खण, चंदेरी -खण किंवा जॉर्जेट ब्लाउज -खणाची साडी यासारखी विविध कॉम्बिनेशन ‘तेजाज्ञा’मध्ये दिसतात. नवरात्रीसाठी ९ दिवसांच्या ९ साडय़ा लवकरच ‘तेजाज्ञा’ आपल्यापुढे घेऊन येणार आहे, असंही तेजस्विनी सांगते.

सोशल मीडियाद्वारे विक्री
‘तेजाज्ञा’च्या साडय़ा साधारण ४५०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यावर या साडय़ा उपलब्ध आहेत. लवकरच ‘तेजाज्ञा’ची वेबसाइट आपल्या भेटीस येणार आहे आणि भविष्यात ‘तेजाज्ञा’ची बुटिक आपल्याला पाहावयास मिळतील, असंही या दोघी विश्वासानं सांगतात. ‘सर्वच स्त्रियांना आपले कपडे इतरांपेक्षा वेगळे असावे, युनिक असावे असं वाटत असतं आणि समारंभांच्या वेळी आपण नेसलेल्या पारंपरिक साडीसारखीच साडी दुसऱ्या कुणी नेसलेली आढळली तर अगदी मूड जातो. नव्या खरेदीतला आनंदच संपतो. म्हणूनच आम्ही ‘१ स्त्री १ साडी’ असं ‘तेजाज्ञा’चं सूत्र ठेवलेले आहे. आम्ही डिझाइन केलेली प्रत्येक साडी वेगळी असते आणि त्याची पुनरावृत्ती होत नाही. त्यामुळेच आपल्या लुकमध्ये नावीन्य मिळू शकतं,’ असं तेजस्विनी सांगते. प्रत्येक ग्राहक हा वेगळा असतो आणि हल्लीच्या आधुनिक आणि फॅशनेबल जगात ग्राहकही चोखंदळ होत आहेत. तेव्हा या ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यासही तेजस्विनी आणि अभिज्ञा करत आहेत. अभिज्ञा भावे म्हणाली, ‘‘ तेजाज्ञा’आमच्यासाठी केवळ ब्रॅण्ड नाही तर आमचा छंद जोपासण्याचं माध्यम आहे. विविध सणांचा विचार करून आम्ही साडय़ा डिझाइन करत असतो. शिवाय कुठल्या ऋतूत कुठलं मटेरिअल वापरायचं याचाही विचार आम्ही करतो. ‘तेजाज्ञा’ला मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादामुळे आता आम्ही इतरही काही कपडय़ांची निर्मिती करू असं दिसतंय.’
प्रियांका खानविलकर – viva.loksatta@gmail.com