व्हिवा लाउंजमध्ये मेंदू वैज्ञानिक विदिता वैद्य
स्त्री भावनिक असते, असं सरधोपट विधान नेहमी केलं जातं. पण या भावनांच्याच मुळाशी जात त्या नेमक्या कशा निर्माण होतात याचं संशोधन करणाऱ्या एका स्त्री वैज्ञानिकाशी संवाद साधण्याची संधी पुढच्या आठवडय़ात होणाऱ्या व्हिवा लाउंजच्या निमित्ताने मिळणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्तम कामगिरी करत स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या कर्तबगार तरुण स्त्रियांना आपण ‘व्हिवा लाउंज’च्या निमित्ताने भेटत असतो. त्यांच्या यशोगाथेतून नवी प्रेरणा घेत असतो. मेंदू विज्ञानाच्या सर्वस्वी वेगळ्या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या वैज्ञानिक डॉ. विदिता वैद्य यांना ऑक्टोबर महिन्याच्या व्हिवा लाउंजमध्ये आमंत्रित करण्यात आले आहे. मुळात संशोधनाच्या क्षेत्रात मोठं काम करणाऱ्या भारतीय स्त्रियांची कमी, त्यात विदिता यांचा संशोधनाचा विषय तर अगदी निराळा आहे. म्हटलं तर सर्वसामान्यांनाही आस्था असणारा आणि तरीही जगभरातील विद्वानांना, अभ्यासकांना अजूनही कोडय़ात पाडणारा.. मेंदूच्या कार्याचा. मेंदूमध्ये भावना कशा निर्माण होतात, याचा अभ्यास डॉ. विदिता करीत आहेत. त्या गेली १५ र्वष टाटा मूलभूत विज्ञान संस्थेत संशोधन करत आहेत. त्यांनी मेंदू विज्ञान क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या मोलाच्या संशोधनाबद्दल त्यांना नुकताच प्रतिष्ठेचा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झालाय. विज्ञान क्षेत्रात मोठी कामगिरी करणाऱ्या तरुण शास्त्रज्ञांना भारत सरकारतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.

लहानपणापासून वृक्षवल्ली, साप, बेडूक यांच्यात रमणाऱ्या विदिता यांनी लाइफ सायन्सेसमध्ये पदवी घेतली. त्यानंतर मेंदू विज्ञान क्षेत्रात संशोधन करण्यासाठी अमेरिकेत गेल्या आणि शिक्षण संपवून संशोधनासाठी भारतात परतल्या.
डॉ. विदिता यांच्या अभ्यासाच्या विषयाबरोबरच शास्त्रज्ञ म्हणून काम करतानाचे त्यांचे अनुभव, संशोधन क्षेत्रातील करिअर या विषयावर त्यांच्याशी मुक्त संवाद साधता येणार आहे.

कधी : गुरुवार,  १५ ऑक्टोबर २०१५
वेळ : संध्याकाळी ४.४५ वाजता
कुठे : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह,
शिवाजी पार्क,
दादर (प.), मुंबई</p>