ब्राझील १
शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. प्रत्येक देशाची ओळख त्यांच्या ‘खाने’सुमारीतून आपल्याला होईल. आता दक्षिण अमेरिकेकडे कूच करत आपण ब्राझीलला चाललो आहोत. मुबलक प्रमाणात फळ-फळावळ आणि कॉफीच्या उत्पादनात हा फूटबॉलप्रेमी देश आघाडीवर आहे. ब्राझीलच्या कॉफीची गोष्ट आणि अर्थातच या देशीच्या दोन रेसीपीज..
आजपासून आपण दुसऱ्या खंडात प्रवेश करतोय. आपला पुढला स्टॉपओव्हर आहे ब्राझील. मी ‘क्वीन एलिझाबेथ टू’ नावाच्या क्रूझ लायनरवर काम करत असताना ‘रियो डी जिनेरियो’ चा प्रसिद्ध Statue of Christ The redeemer स्वत:च्या डोळ्यांनी अनुभवला. ३८ मीटर उंचीचा हा हात फैलावलेला येशू जगाला कवेत घेईल आणि म्हणेल, ‘काळजी करू नकोस, मी आहे’ असंच वाटलं.
परतताना माझं आवडतं काम म्हणजे भाजी बाजाराचा फेरफटका! ब्राझीलमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, फळं बघायला मिळाली. फळांमध्ये आपली देशी फळं – पेरू, आंबा, पपई, काजू, फणस अशी असतातच, पण त्याचबरोबर- रांबबुतान, मँगोस्टीन, असाई, कुबुआसूसारख्या अजब नावांचीपण टेस्टी फळं इथे मिळतात. बीन्स, तांदूळ, फळं आणि भाज्या यांचा जेवणात भरपूर वापर होताना दिसतो. शेफगिरी आता रक्तात भिनली असल्यामुळे शांत काही बसता येत नाही. म्हणूनच असा फर्स्ट-हँड अनुभव घेण्यासाठी संध्याकाळच्या वेळी तिथल्या एका कॉफी शॉपमध्ये घुसलो. मालक एक ब्राझिलियन म्हातारा होता. त्याच्याशी अडतखडत संवाद साधला. त्याने मोठय़ा अभिमानाने त्यांची ब्राझिलियन कॉफी प्यायला दिली. कॉफी तर मस्त होतीच, पण त्याने कॉफीबद्दलची जी गोष्ट सांगितली ती जास्त इंटरेस्टिंग वाटली. तो म्हणाला, ‘‘आज ब्राझीलच्या इकॉनॉमीमध्ये कॉफी उत्पादनाचा खूप मोठा सहभाग आहे, पण खरं सांगायचं तर कॉफीच्या बिया या पहिल्यांदा ब्राझीलमध्ये स्मगल करून आणल्या गेल्या. फ्रान्सिस्को, एक पोर्तुगीज अधिकारी काही कामासाठी फ्रेंच गुआना या फ्रेंच वसाहतीत गेला असताना त्याने तिथल्या गव्हर्नरकडे ब्राझीलमध्ये लागवडीसाठी कॉफी बिया मागितल्या; पण गव्हर्नरने स्पष्ट नकार दिला. मग या फ्रान्सिस्को साहेबांनी गव्हर्नरच्या बायकोला पटवलं आणि तिने फुलांच्या गुच्छामध्ये काही कॉफी बिया लपवून त्याला त्या दिल्या. मग या कॉफी बियांचंच पहिलं झाड ब्राझीलमध्ये लावलं गेलं.’’ आता तर कॉफी आणि ब्राझील हे समीकरणच झालं आहे.

ब्राझिलियन चिकन स्टार्टर
साहित्य : कणकेसाठी – चिकन स्टॉक पावडर – २ टी स्पून, दूध – ४ कप, बटर – १ टेबल स्पून, कणीक – ४ कप, मदा – आवश्यकतेनुसार.
सारणासाठी साहित्य : व्हेज स्टॉक पावडर – २ टी स्पून, गरम पाणी – २ कप (चहाचे), बोनलेस चिकन – ५०० ग्रॅम, तेल तळण्यासाठी, बारीक चिरलेला कांदा – १, ठेचलेल्या लसूण पाकळ्या – २-३, मीठ – चवीनुसार, काळी मिरी पूड – चवीनुसार, बारीक चिरलेली पार्सली – २ टी स्पून, चीझ – ६ टेबल स्पून, फेटलेलं अंड – १, ब्रेड क्रम्स – ५ टेबल स्पून
कृती : एका पॅनमध्ये दूध, चिकन स्टॉक पावडर आणि बटर एकजीव करून घ्या. नंतर ते उकळून घ्या. मंद आचेवर ठेवून त्यात कणीक टाकून
चमच्याने एकजीव करा. एका परातीत मदा टाकून त्यात गरम केलेलं कणकेचं मिश्रण घालून त्याला थंड करा. दुसऱ्या एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा, लसूण शिजवून घ्या. नंतर त्यात चिकनचे तुकडे टाकून परतून घ्या. मीठ आणि काळी मिरी पूड टाका. मग पार्सले आणि चीझ टाकून मिश्रण एकजीव करा. मिश्रण थंड होऊ द्या. मगाशी थंड केलेल्या कणकेचे लहान गोळे करून लाटून त्यात चिकनचे मिश्रण भरून घ्या आणि फेटलेल्या अंडय़ाने आणि बेड क्रम्सने कोटिंग करून गरम तेलात, तांबूस रंग येईपर्यंत डीप फ्राय करून घ्या. तयार ब्राझिलियन चिकन स्टार्टर गाíलक मेयोनीज सॉससोबत सव्र्ह करा.

स्वीट पामोनहास
साहित्य: अमेरिकन कॉर्न उकडून घेतलेले – १०० ग्रॅम, कॉर्नफ्लोअर – अर्धा कप, नारळाचे दूध – २ कप, साखर – ३ कप, मेल्टेड बटर – ३ टी स्पून, किसलेला नारळ – १ कप, मीठ – अर्धा टी स्पून, मक्याची पाने ४, बेकिंग पावडर – अर्धा टी स्पून
कृती: उकडून घेतलेल्या कॉर्नची पेस्ट करून घ्या. कॉर्नच्या पेस्टमध्ये इतर साहित्य घालून मिश्रण एकजीव करून घ्या. मक्याच्या पानांचे पॉकेट बनवून त्यात मिश्रण भरून पॉकेट बंद करून घ्या. स्टीमरमध्ये पाणी उकळून त्यात पामोनहासचे पॉकेट ४५ मिनिटं स्टीम करा. पोमोनहासच्या पाकिटाला पिवळा रंग येईपर्यंत स्टीम करा. मक्याची पाने काढून पोमोनहास थंड करून त्यावर किसलेला नारळ टाकून सव्र्ह करा.

आजची सजावट : काकडी आणि गाजराचे फूल
हॉटेलमध्ये असतं तसं सॅलड कार्व्हिंग आपल्यालाही करता आलं तर.. असं नेहमी वाटतं. ते वाटतं तितकं अवघड मुळीच नाहीय. हा कोपरा खास त्यासाठीच..
साहित्य :१ काकडी, १ गाजर, साते स्टिक
कृती : प्रथम काकडीचे जाड चकत्या कापून त्याचा अर्धा भाग करा आणि त्याच्या बिया काढून टाका.
२. मग गाजर सोलून त्याच्याही जाड चकत्या कापून त्याला फुलाच्या आकारात कट करा.
३. नंतर काकडी आणि गाजर साते स्टिकला (बार्बेक्यू स्टिक्ससारख्या दिसतात.) लावून फूल तयार करा.