क्लासिकल म्युझिक बॅण्ड आणि तोदेखील फक्त स्त्रियांचा.. या दोन गोष्टी ‘सखी’च्या निमित्ताने एकत्र येताहेत. ‘सखी’ची मूळ कल्पना कौशिकी चक्रवर्तीची. या बँडमध्ये दोन मराठी कलाकारही आहेत.स्त्रीला तिच्या नेहमीच्या माता, भगिनी आणि पत्नीच्या भूमिकेपासून थोडं वेगळं करीत तिच्याकडे एका निखळ मैत्रिणीच्या नात्यातून बघायला ‘सखी’ हा ‘ऑल वुमेन’ म्युझिक बॅण्ड सांगणार आहे. सेलिब्रेटिंग वुमनहूड म्युझिकली, अशी याची थीम आहे.म्युझिक बॅण्ड असं म्हटलं की, आपल्यासमोर नकळत उभा राहतो, रॉक म्युझिक कॉन्सर्टचा माहौल.. तो गिटारिस्ट, भव्य-दिव्य सेट, रंगीबेरंगी चकचकाट आणि अतरंगी पेहराव केलेली तरुणाई! परंतु याच प्रचलित कल्पनेला धक्का देणारा एक नवीन म्युझिक बॅण्ड लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. भारतातला पहिला ‘ऑल वुमेन’ शास्त्रीय संगीताचा बॅण्ड..‘सखी’!‘संगातातून स्त्रीत्व साजरं करण्यासाठी..’ अशी ‘सखी’ची ओळख बॅण्ड मेम्बर सांगत आहेत. मुळात ‘सखी’ची कल्पना आहे प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्तीची! या बॅण्डचा विचार खूप पूर्वीपासूनच त्यांच्या मनात होता. पण ८-९ महिन्यांपूर्वी कामाला नेमकी सुरुवात झाली. या बॅण्डमध्ये कौशिकीजींसोबत बासरीवादक देबोप्रिया चॅटर्जी, व्हायोलिनिस्ट नंदिनी शंकर, पखवाजवादक महिमा उपाध्याय, तबलावादक सावनी तळवलकर आणि कथक नृत्यांगना भक्ती देशपांडे या कलाकार आहेत. ‘सखी’ या शब्दाबरोबर आपल्याला आठवते कृष्णसखी द्रौपदी. स्त्रीच्या आई, बहीण आणि पत्नी या तीन नात्यांबद्दलच खूप बोललं जातं. स्त्रीत्वाचे गोडवे गाताना हीच नाती कायम आठवतात. पण या पलीकडे जाऊन स्त्रीला निस्सीम किंवा निखळ मत्रिणीमध्ये दाखवण्याचं काम ‘सखी’ म्युझिक बॅण्डमार्फत आपल्याला पाहायला मिळेल. ‘सखी’तून स्त्रीत्व किंवा ‘वुमनहूड’ साजरं केलं जाणार आहे, असं ‘सखी’मधली सावनी तळवलकर सांगते.खरं तर संगीत हे जेंडर स्पेसिफिक नसतं, परंतु काही वाद्य पारंपरिक ढाच्यात ‘मॅस्कुलिन’ समजली जातात. ‘सखी’मध्ये मात्र बासरी, तबला, व्हायोलिन किंवा अगदी पखवाज या सगळ्याच वाद्यांचा ताबा मुलींकडे आहे. या सगळ्या कलाकारांचं वैशिष्टय़ म्हणजे या सर्व जणी सोलो परफॉर्मर म्हणून यापूर्वी रसिकांसमोर पुढे आल्या आहेत, परंतु सखीच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहेत. त्याचप्रमाणे सर्वच कलाकारांची त्या त्या कलेतली ही दुसरी किंवा तिसरी पिढी आपल्याला सखीमध्ये पाहता येणार आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे संगीताचा दर्जा, त्याची समज, त्यातलं सौंदर्य, संस्कार आणि कलेवरची श्रद्धा या सगळ्यांची सर्वच कलाकारांना उत्तम जाण आहे. एखादी गोष्ट जेव्हा स्त्री-रूपात सामोरी येते तेव्हा त्यामागे एखादा संघर्ष असलाच पाहिजे असं नाही. स्त्रीत्वाचं लेबल लागलं की, काही तरी रिबेलिअन किंवा वर्चस्ववादाच्या विरोधात असणार असं बऱ्याचदा गृहीत धरलं जातं. परंतु सखी बॅण्डमधून फेमिनिझम किंवा स्त्रीवादाची भूमिका मांडली जाणार नाहीय हे विशेष. या संदर्भात विचारलं असता नृत्यांगना भक्ती सांगते, ‘कोणत्याही सामाजिक मुद्दय़ाचा अंतर्भाव ‘सखी’च्या विचारामागे नाहीये. ‘सखी’मध्ये आम्ही निव्वळ संगीत साजरं करतोय. यातून स्त्रियाच श्रेष्ठ वगैरे असा विचार नाही. संगीत स्त्री-पुरुष असा भेद मुळात करीतच नाही. नंदिनी शंकर सोडल्यास आम्हा साऱ्यांचे गुरू हे पुरुष आहेत, त्यामुळे आम्ही स्त्रिया श्रेष्ठ आहोत हे आम्हाला यातून अजिबात सांगायचं नाहीये. संगीत हे कोणत्याही जन्माला आलेल्या माणसापेक्षा मोठं आहे आणि आम्ही त्याला आमच्या गुरूंच्या, आजवरच्या शिक्षणाच्या मदतीने व्यक्त करतोय.. साजरं करतोय.’‘सखी’मध्ये आपल्याला भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत आणि नृत्य पाहायला-ऐकायला मिळणार आहे. यामध्ये शास्त्रीय संगीतासोबतच संस्कृत आणि देवीची स्तोत्रं यांचा अंतर्भाव होतो. ‘सखी’ची संकल्पना आजच्या पिढीची आहे, कारण आजची पिढी खूप सहजपणे मत्री साजरी करते. शास्त्रीय संगीत ऐकणाऱ्या सर्वाचाच आनंद ‘सखी’च्या या रूपाने द्विगुणित होईल. येत्या २० जानेवारीला कोलकात्यात ‘सखी’चा पहिला परफॉर्मन्स होणार आहे आणि ‘सखी’चा आवाज भारतीय शास्त्रीय संगीतातील अनुनाद ठरावा यासाठी खूप खूप शुभेच्छा!‘सखी’मध्ये आम्ही निव्वळ संगीत साजरं करतोय. यातून स्त्रियाच श्रेष्ठ वगैरे असा विचार नाही. संगीत स्त्री-पुरुष असा भेद मुळात करीतच नाही.- भक्ती देशपांडे