दिवाळीसारख्या फेस्टिव्ह सीझनमध्ये साडी मस्ट. हल्ली सेलिब्रिटीसुद्धा एथनिक इंडियन लुक येण्यासाठी साडीच नेसतात. पण जरा वेगळ्या पद्धतीने. सेलिब्रिटी स्टाइल साडी ड्रेपिंगसाठी काही टिप्स-
मरमेड स्टाइल –
* नेहमीच्या सहावारी साडीला पर्याय म्हणून मरमेड स्टाइलचा विचार करता येईल.  साधारणपणे सर्व प्रकारच्या शरीरबांधणीसाठी ही स्टाइल सोयीची ठरू शकते. पण तुमचा बांधा सुडौल असेल तर उत्तमच. साडीच्या खालचा भाग स्कर्टप्रमाणे दिसत असल्यामुळे एक वेगळा लुक येतो.
* साडी नेसण्यापूर्वी शक्यतो तुमच्या हिल्स घालाव्यात, जेणेकरून साडीच्या उंचीचा अंदाज येईल.
* जमिनीपासून ४ इंच वरच साडी नेसावी.
* पदर उजव्या खांद्यावरून पुढच्या बाजूस खाली सोडवा आणि मग तो डाव्या बाजूने मागे घेऊन पुढे सोडलेल्या पदारापाशी आणावा. तिथून थोडा आत घेऊन पदर निऱ्यांपाशी परकरासोबत पिनअप करावा.
* साडीचा पदर पुढच्या बाजूस येत असल्यामुळे नक्षीने भरलेला असल्यास उत्तम.
बटरफ्लाय स्टाइल –
* ही स्टाइल सध्या बॉलीवूड तारकांमध्ये बरीच गाजत आहे. म्हणूनच ‘बॉलीवूड स्टाइल’ म्हणून ही स्टाइल ओळखली जाते. नेहमीच्या सहावारीमध्ये थोडासा बदल करायची गरज आहे.
* नेहमीप्रमाणे निऱ्या खोचा, परंतु साडी नेहमीपेक्षा कंबरेपेक्षा थोडी खाली खोचा.
* पदर बारीक ठेवा.
* पदर नीट राहावा याकरिता ब्लाऊजला मधून पिन लावा.
* बारीक, पातळ पदर आणि भरजरी ब्लाऊज यांची सांगड असल्यास उत्तम.
* ब्लाऊज आकर्षक असावा याची खबरदारी घ्यावी. कारण या प्रकारात साडीपेक्षा ब्लाऊजला अधिक महत्त्व असते.
मुमताज स्टाइल –
* सत्तरीच्या दशकातली स्टाइल सध्या परत आली आहे, हे तर आता नक्कीच झालंय. त्यात या साडी स्टाइलची भरही पडली आहे. मुमताजने ‘ब्रह्मचारी’ या सिनेमामध्ये नारंगी रंगाची या पद्धतीने नेसलेली साडी घातली होती, तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे. या स्टाइलमुळे छान रेट्रो लुक येतो. साडी घट्ट गुंडाळली जात असल्यामुळे शरीराची कमनीयता दिसून येते.
* बारीक बोर्डर असलेली साडी असणे, गरजेचे आहे.
* नेहमीप्रमाणे साडी परकरात खोचावी.
* मग केवळ २ निऱ्या खोचाव्यात.
* त्यानंतर साडी मूळ उंचीच्या ४-५ इंच वर घेऊन ती गुंडाळून खोचत एक वर्तुळ पूर्ण करावे. पुन्हा ४-५ इंच वर घेऊन परत एक वर्तुळ पूर्ण करावे.
* पदर डाव्या खांद्यावरून खाली सोडवा.