‘ई-कॉमर्स’, ‘सेलिब्रिटी मॅनेजमेंट’.. आपल्या नेहमीच्या आयुष्यात फारसे न येणारे हे विषय.  या सर्वस्वी अपरिचित क्षेत्रांत व्यवसायाची कास धरणारी मराठमोळी उद्योजिका प्रीता सुखटणकर.
फॅशन पत्रकारितेपासून आपल्या करिअरची सुरवात करणारी प्रीता आज स्वत:चा ‘द लेबल कॉर्प’हा ‘ई-कॉमर्स’चा ब्रॅण्ड सांभाळत आहे. तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा लेखाजोगा तिनं ‘व्हिवा लाऊंज’मध्ये मांडला. अरुंधती जोशी आणि रोहन टिल्लू यांनी प्रीताला बोलतं केलं.
या ‘ब्रॅण्ड वुमन’सोबत रंगलेल्या गप्पांमधून सेलिब्रिटींचं जग तर समोर आलंच पण त्याचबरोबर वेगळ्या वाटांवरच्या करिअरचे पर्यायही समजले.
२२ जुलैला मुंबईत रंगलेल्या या गप्पांचा हा वृत्तांत..

..अन् तरुणाईला गांभीर्यानं घ्यायला सुरुवात झाली
मी ‘संडे ऑब्झव्र्हर’मध्ये विद्यार्थी पत्रकार म्हणून काम करत होते, तो काळ भारतात नवीन क्षेत्रांच्या उदयाचा होता. तेव्हा सुश्मिता सेन ‘मिस युनिव्हर्स’ झाली आणि त्या विषयावर मी पहिल्यांदा लिहिलं. त्या काळात मीडियामध्ये तरुणांना, तरुण वाचकांना जास्त महत्त्व दिलं जायचं नाही. पण सगळ्याच क्षेत्रात बदल व्हायला लागले आणि तरुणाई प्रकाशझोतात यायला लागली. आमच्याकडेही तरुणाईशी निगडित पुरवणी काढण्याचा विचार जोर धरू लागू लागला होता. माझी सुश्मिताची बातमी गाजली असल्याने मला या तरुणाईच्या पुरवणीचं संपादकपद देण्यात आलं. नव्वदच्या दशकापर्यंत भारतामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये तरुणाईला तितकंसं गांभीर्यानं घेतलं जात नसे. ब्रॅण्ड्स असोत किंवा माध्यमे, तरुणांकडे कोणाचंही फारसं लक्ष नव्हतं. अगदी कॉस्मेटिक ब्रॅण्डच्या संदर्भातच बोलायचं झालं तर लॅक्मेसारखे ब्रॅण्ड्सही त्या काळात तिशीच्या पुढील स्त्रिया ग्राहक डोळ्यांपुढे ठेवूनच उत्पादनं तयार करत होते. माझ्या मते सुश्मिता सेनचं ‘मिस युनिव्हर्स’ होणं हे त्या कालांतराचं प्रातिनिधिक उदाहरण होतं. तिनं हा किताब जिंकला आणि अनेक माध्यमांमधून त्याविषयी बोललं- लिहिलं गेलं. मार्केटिंग कंपन्यांनी आपला मोर्चा तरुणाईकडे वळवला आणि इतर माध्यमांनीहीतरुणांकडे गांभीर्याने पाहण्यास सुरवात झाली.

कुटुंब आणि करिअर यातली ओढाताण हे केवळ स्त्रीच्या मनातलं द्वंद्व असतं. तो केवळ तिच्या मनातला ‘गिल्ट’ असतो. प्रत्यक्षात तसं काही असतंच असं नाही. आपली आकांक्षा काय हे प्रत्येक स्त्रीनं नेमकं ठरवलं की पुढची वाटचाल सोपी जाते.

पत्रकारितेची पाश्र्वभूमी
पाहिजे ते इतर काम करण्यासाठी मात्र घरच्यांचा पाठिंबा होता. कॉलेजमध्ये असतानाच स्वत:ला अधिक गुंतवून ठेवण्यासाठी मी ‘संडे ऑब्झव्र्हर’ या नियतकालिकामध्ये काम करू लागले. त्यांच्या तरुणांसाठीच्या पानासाठी मी बातम्या, लेख लिहीत असे. त्या वेळी माझ्यासारख्या नवख्या मुक्त पत्रकाराला  प्रतिशब्द साधारणपणे ५० पैसे मानधन मिळत असे. रोज कॉलेजमधली लेक्चर्स संपल्यावर मी ऑफिसला जाऊन बातम्या करत असे. तो काळ १९९२-९३ चा होता. तेव्हा ‘गुगल’ नावाची जादू नव्हती. त्यामुळे लोकांशी बोलून, मुलाखती घेऊन, चर्चा करूनच माहिती मिळवली जात असे.  संदर्भ मिळवण्यासाठी बराच आटापिटा करावा लागे. लोकांशी बोलायचं कसब तिथेच शिकले. माझ्या मते या गोष्टींचा फायदाच झाला.

सेलिब्रिटी इज अ ब्रॅण्ड
सेलिब्रिटी हे एखाद्या ब्रॅण्डसारखे असतात. ज्याप्रमाणे आपण पेप्सी, कोकाकोलासारख्या उत्पादकांचं ब्रॅण्डिंग केलं जातं, तसाच विचार सेलिब्रिटीजबाबत हल्ली केला जातो. ‘थम्स अप’ ब्रॅण्ड त्याच्या स्ट्राँग चवीसाठी ओळखला जातो, त्यामुळे त्याचा संबंध साहसाशी, धैर्याशी लावला गेलाय. या ब्रॅण्डची प्रतिमा सांभाळणारा सेलिब्रिटीही मग तसाच निवडला जातो. तसंच सेलिब्रिटीची एक ठरावीक इमेज असते किंवा ती असावी, अशी इच्छा असते. त्या इमेजनुसार तो कोणते सिनेमे निवडेल हे ठरवलं जातं. कुठल्या जाहिराती करायच्या, कुठल्या नाही, कुठली इमेज सांभाळायची हे सल्ले सेलिब्रिटी मॅनेजर देतात.

कोण काय म्हणेल, याची चिंता न करता नवी कल्पना धडाडीनं मांडा. अपयशाची भीती बाळगली तर कुठलाच व्यवसाय करता येणार नाही.

मॅनेजर आणि एजंट
पूर्वी मोठय़ा सिनेतारकांच्या सेक्रेटरींविषयी बरंच काही बोललं जायचं; पण हल्ली असा एकच सेक्रेटरी असतो असं नाही. प्रत्येक सेलिब्रिटीकडे एक मॅनेजर आणि एक एजंट असतो. मॅनेजर सेलिब्रिटीचं दिवसभराचं शेडय़ुल आखतो. तो कुठे जाणार आहे, कोणाला भेटणार आहे हे मॅनेजर ठरवतो; तर एजंट त्याला कामं मिळवून देतो. पाश्चात्त्य देशांमध्ये ही दोन्ही कामं करणारी स्वतंत्र व्यक्ती किंवा संस्था असते. भारतात अजूनही अशा प्रकारचं विभाजन पूर्णपणे करण्यात आलेलं नाही. त्यामुळे कित्येक सेलिब्रिटीजकडे मॅनेजर आणि एजंटचं काम करणारी एकच व्यक्ती असते.

टीम वर्क महत्त्वाचं
मी नोकरी सोडून इ कॉमर्सच्या व्यवसायात आले, तेव्हा सर्वात आधी चांगली टीम तयार केली. सेलिब्रिटी निवडतानाही अशांची निवड केली, ज्यांच्याबरोबर मी आधी काम केलं नव्हतं. कारण, ही ओळखीच्या लोकांसोबतच काम करतेय, असा शिक्का मला मारुन घ्यायचा नव्हता.

नावीन्याचा  ध्यास
फॅशन पत्रकारितेमध्येच उतरायचं हे सुरुवातीपासून ठरवलं नव्हतं. फक्त मला इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं होतं. मला इतर कोणी निवडलं नसेल अशा करिअरची निवड करायची होती. तू काय करतेस या प्रशनातं उत्तर ऐकल्यावर ‘हे कधी आम्ही ऐकलं नाही’ असं समोरचा म्हणतो, तेव्हा मला छान वाटतं. अजूनही तोच माझा ध्यास असतो. सुरुवातीपासून मी क्रिएटिव्ह होते. त्यामुळे एकतर डिझाइनर व्हायचं किंवा लेखन करायचं हे माझं पक्कं ठरलं होतं. त्या काळात फॅशनचा अभ्यासक्रम शिकवणारी निफ्ट (ठकाळ) ही एकमेव संस्था होती, तर फॅशनविषयक लिहिणारं एखादंच नियतकालिक होतं. फॅशन आणि लेखन याचा मिलाफ करणारी फॅशन पत्रकारिता मला आपली वाटली. ‘एल’ नावाचं फॅशन मॅगझीन नुकतंच भारतात सुरू झालं होतं, तिथे काम करण्याची संधी मला मिळाली.

वडिलांची शिस्त आणि जडणघडण
मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये माझं पदवीपर्यंतचं शिक्षण झालं. लेक्चर्स बंक करायला माझ्या घरून कधीच परवानगी नसायची. लहानपणापासून मी कोणालाही माझा आदर्श मानलं नाही, पण माझ्या वडिलांच्या जडणघडणीचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. मी रुपारेलमध्ये असताना ‘चुकूनही शिवाजी पार्कच्या कट्टय़ावर दिसायला नाही पाहिजे,’ अशी धमकीवजा सूचना त्यांनी मला दिली होती. लहानपणापासूनच नृत्य, खेळाचे वेगवेगळे क्लासेस मला लावले होते. तेव्हा या सर्वाचा राग यायचा, पण आता पटतयं की त्यामुळेच मी टीमवर्क, शिस्तपूर्ण वर्तणूक हे गुण शिकू शकले.

व्यवसायाची मराठी मानसिकता
आपण महाराष्ट्रीय लोक कोण काय म्हणेल याकडे खूप लक्ष देतो. अल्पसंतुष्ट असणं हेच आपल्याला शिकवलेलं असतं. माझ्या लहानपणी दादरला ‘प्रकाश’, ‘दत्तात्रय’ या हॉटेल्समध्ये संध्याकाळी पाच ते सात या वेळात साबुदाणा वडा मिळत असे. तो खायला अनेक लोक  यायचे. मला अजूनही असं वाटतं, जर तुम्हाला ग्राहक आहे, तर संपूर्ण दिवस वडा का नाही ठेवायचा? मी नेहमी माझ्या ऑफिसमधल्या मुलींना सांगत असते, स्वत:ला मर्यादा घालून घेऊ नका. तुमच्या मनात येईल ते आव्हान स्वीकारा. व्यवसाय करण्याबाबत तर आपल्या मराठी माणसाच्या मनात न्यूनगंड आहेच. मी जेव्हा स्वत:चा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं, तेव्हा पहिल्यांदा हे माझ्या आईला बोलून दाखवलं. तिनं पाठिंबा दर्शवला पण तिच्यासाठी तो धक्काच होता. व्यवसायात पडणं हा तिला मोठा धोका वाटत होता. मी चांगली नोकरी सोडून व्यवसायात उतरते आहे हे तिच्या मनाला फारसं पटलं नव्हतं. पण हेच जेव्हा मी माझ्या राजपूत सासू- सासऱ्यांना सांगितलं, तेव्हा ‘आम्ही विचारच करत होतो, तू कधी स्वत:चा उद्योग सुरू करणार ते..,’ असं म्हणत त्यांनी माझं कौतुक केलं. हा विचारसरणीतला फरक आहे.

ब्रॅण्डिंगच घडवते सेलिब्रिटी
सेलिब्रिटी म्हणजे केवळ सिनेमात काम करणारे कलाकारच नसतात, तर आज या व्याख्येमध्ये खेळाडू, शेफ अगदी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात झळकणाऱ्या लोकांचा समावेश होतो. पर्यायाने या लोकांचं मॅनेजमेंट करणं हाही सेलिब्रिटी मॅनेजमेंटचा एक भाग आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ब्रॅिण्डग ज्या पद्धतीनं झालं त्यावरून राजकीय क्षेत्रातही ब्रॅिण्डग किती महत्त्वाचं आहे, याचा अंदाज सर्वानाच आला होता. मोदी वापरतात तसे त्यांचे खास स्टाईलचे कुर्ते विकून त्यांच्या डिझाइनरने भरपूर नफा कमावला. राजकारण आणि फॅशन याचा काही संबंध नसतो, हा गैरसमज मोदींनी यंदा मोडून काढला. संजीव कपूर यांचा शेफ ते सेलिब्रिटी हा प्रवासही ब्रॅिण्डगचं उत्तम उदाहरण आहे. परदेशातही सेलिब्रिटी शेफ – मार्था स्टुअर्टचं उदाहरण यासाठी दिलं पाहिजे. तिची लोकप्रियता केवळ तिच्या उत्तम ब्रॅण्डिंगमुळे टिकून होती. ती तुरुंगात जाऊनही तिची लोकप्रियता कमी झाली नव्हती.

कल्पना मनात ठेवू नका
कुठलीही नवी कल्पना मनात ठेवू नका. कोण काय म्हणेल, कसं होईल वगैरे विचार न करता ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा. अपयश कुणाला चुकलं नाहीय. पण त्याची भीती बाळगून बसलात तर मात्र हाती काहीच लागणार नाही. नवीन व्यवसायात पडताना ही धडाडी हवीच.

सध्याचा काळ कलाक्षेत्रात येणाऱ्यांसाठी उत्तम काळ आहे. पोकळ ब्रॅण्डिंगपेक्षी कण्टेंट महत्त्वाचा, हे आता सगळ्यांना उमगलं आहे.


असुरक्षित भवताल

व्यवसाय करायचा तर अपयशाला घाबरून चालणार नाही. ते तर रोजच सहन करावं लागतं. मला त्याचं फारसं काही वाटत नाही. सगळ्यात जास्त भीती कसली वाटली असेल तर हल्लीच्या असुरक्षित वातावरणाची. शक्ती मिलच्या प्रकरणाने मी हादरून गेले होते. मी माझ्या करिअरची सुरुवात केली, तेव्हा काम संपवून रात्री तीनला टॅक्सी करून घरी जाण्यात काहीच वाटत नसे. आमच्या ऑफिसचं वातावरण कॅज्युअल आहे. इथे मुली शॉर्ट स्कर्ट्स घालून येतात. पूर्वी मला त्याचं काही वाटत नसे, पण आता जेव्हा त्या कुठे जात असतील, तर मी त्यांना कुठे जाताय, किती वाजतील? हे विचारते. त्यांचं म्हणणं असतं ‘आम्ही योगा करतो, जीमला जातो, दिसायला चांगले आहोत मग आमच्यावर कपडय़ांची बंधनं कशाला?’ पण कंपनीची संचालिका म्हणून हे तपासणं ही माझी जबाबदारी आहे, असं मला वाटायला लागलंय. समाजातलं स्पिरिट मेलंय आता. त्यामुळे तुमच्या सुरक्षेची काळजी तुम्हीच घेतली पाहिजे. सतत तुमचा फोन चाज्र्ड ठेवा, संपर्कात राहा, हे सांगण्याची गरज पाच वर्षांपूर्वी नव्हती.

गुणीजनांना सुगीचे दिवस
सध्याचा काळ चित्रपटसृष्टीसाठी किंवा कुठल्याही कलाक्षेत्रासाठी उत्तम काळ आहे. एक काळ असा होता, जेव्हा तुम्ही ‘मिस इंडिया’ आहात, परदेशी मॉडेल आहात तर, हिंदीची शिकवणी लावून सहजपणे अभिनेत्री होऊ शकत होतात. पण आता चित्र पालटलं आहे. सध्या तुमच्यामधल्या प्रतिभेलाच महत्त्व दिले जाते. गायन असो, अभिनय असो किंवा दिग्दर्शन, खऱ्या अर्थाने मेहनती आणि हुशार माणसं आली आहेत. केवळ चांगली दिसतेय, म्हणून काम मिळणं बंद झालंय. कण्टेण्ट महत्त्वाचा आहे, हे आता सगळ्यांना चांगलं उमगलं आहे.

प्रसिद्धीचं आभासी वलय
प्रत्येक सेलिब्रिटीकडे त्याचा स्वत:चा एजंट, मॅनेजर आणि सेकट्ररी असतोच. त्याचसोबत त्याचा एक पब्लिसिस्टसुद्धा असणं हल्ली गरजेचं आहे. त्या सेलिब्रिटीच्या घडामोडी माध्यमांना पुरवण्याचं काम हे पब्लिसिस्ट करतात. त्यामुळे कोणत्याही सेलिब्रिटीबाबत ज्या गोष्टी तुम्ही बातम्यांमध्ये ऐकता त्यातल्या ९० टक्के बातम्या या पब्लिसिस्टने तयार केलेल्या असतात. सेलिब्रिटीची ब्रॅण्डव्हॅल्यू वाढवण्यासाठी केलेला हा खाटाटोप असतो. उदाहरण घ्यायचं झालं, तर एखाद्या नटीला पुढची ‘झीनत अमान’ म्हणून लोकांसमोर आणायचं असेल, तसं ठरवलं गेलं असेल, तर पब्लिसिस्ट तिचा लुक, स्टाईल, हेअरकट झीनत अमानसारखा असेल याची खात्री घेतो. या बाह्य़प्रतिमेबरोबरच ती नटी कोणते चित्रपट निवडते तेही महत्त्वाचं ठरतं. कारण तुम्ही जर तिला झीनत अमान म्हणून सादर करणार असाल, तर ती चित्रपटामध्ये सतीसावित्रीच्या भूमिका करू शकत नाही. तसंच, गरज पडल्यास तिचे एखाद्या खेळाडूशी अफेअर असल्याच्या चर्चा पसरवल्या जातात. कित्येकदा त्या खेळाडूला माहितही नसतं की, आपल्या पाठीमागे इतकं सर्व चाललं आहे. ही सगळी प्लॅन्ड पब्लिसिटी असते. व्यवसायाचा भाग म्हणून हे करावं लागतं.
सगळ्या मुलींची टीम
माझ्या ऑफिसमध्ये बहुतेक सगळ्या जागांवर स्त्रिया आहेत आणि त्याचा मला अभिमान आहे. घरची जबाबदारी आणि काम – करिअर ही वाटते तेवढी तारेवरची कसरत नसते. मला वाटतं, ते तुमच्या मनातलं द्वंद्व असतं. मला ११ महिन्यांची मुलगी आहे. मी बाहेर गेले तर ती काही मला मिस करणार नाहीय. पण तुमच्या मनातच तो गिल्ट असतो. ही तुमची तुमच्याशी चाललेली लढाई असते. तुम्हाला काय हवं आहे आणि तुमची आकांक्षा काय आहे, हे एकदा ठरलं की सोपं होतं. अमूक एका गोष्टीचा आपण ‘त्याग’ करतोय, हे प्रत्येकाच्या वाटण्यावर असतं. एक स्त्री म्हणून मी अमूक एक काम करू शकत नाही, असं मात्र मला कधीच वाटलं नाही. मला वाढवताना पालकांनी ही भावना कधी मनातही येऊ दिली नाही. मी आणि माझी बहीण आपापल्या करिअरमध्ये चांगलं काम करतो आहोत. तुम्ही करताय ते एंजॉय करता आलं पाहिजे, हे खरं.

‘एम टीव्ही’मधला प्रवास
‘एल’ नियतकालिकात मी लेखनाचं काम करायचे तसं फोटोशूटवरही माझं लक्ष असायचं. त्यामुळे स्टायलिंगचा अनुभवसुद्धा गाठीशी होता. एकदा ‘एम टीव्ही’च्या कार्यकारी निर्मातीची मुलाखत घेत असताना तिने मला त्यांच्या कार्यक्रमाच्या काही भागांचं लेखन करण्याविषयी विचारलं. तिथून स्क्रिप्टिंगला सुरुवात झाली. त्या योगाने कार्यक्रमाच्या सेटवर जाणं झालं. त्या वेळी व्हीजे संवाद नीट बोलते आहे का, तिचे कपडे चांगले आहेत की नाहीत, तिचं वागणं-बोलणं याबद्दल मनातल्या मनात निरीक्षणं सुरू झाली आणि त्याच वेळी मला कार्यक्रमांच्या दिग्दर्शनाबद्दल विचारण्यात आलं. ‘एम टीव्ही’मध्ये मी ‘स्टाइल चेक’, ‘स्टाइल अवॉर्ड्स’ आणि फॅशनसंदर्भातल्या इतर काही कार्यक्रमांचं दिग्दर्शन केलं. त्या वेळी भारतात कॉस्मेटिक्स आणि फॅशन ब्रॅण्ड्स येऊ पाहत होते. याच धर्तीवरच्या या कार्यक्रमांना प्रचंड प्रसिद्धी मिळू लागली. त्या वेळी कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार त्याला साजेसे चेहरे निवडण्याची जबाबदारीसुद्धा आमच्यावर असायची. आज ज्याप्रमाणे रघूला ‘रोडीज’चा चेहरा म्हणून ओळखलं जातं, त्याप्रमाणे प्रत्येक  कार्यक्रमाला त्याच्या योग्य चेहऱ्याची गरज असते. माझ्याकडे हे चेहरे शोधण्याचं काम आलं. नवीन टॅलेण्ट शोधायचं हे काम मग रोजचं झालं. रोजच्या रोज असंख्य लोकांच्या व्हिडीओ क्लिप्स आमच्याकडे येत असत, त्यातून निवड करावी लागे.

एडिटोरिअल ई-कॉमर्स आणि त्याच्या टेस्ट मेकर
एडिटोरिअल ई-कॉमर्स साइटच्या माध्यमातून तुम्हाला शॉपिंग करताना एखादा इंटरॅक्टिव्ह लेख वाचल्याचं समाधान मिळतो. शॉपिंग करताना थेट स्टाइलिस्टचा सल्ला मिळतो. सध्या भारतातील ई-कॉमर्स वेबसाइट्सवर एक नजर टाकली तर त्यांच्यामध्ये खूपशी समानता दिसून येते. म्हणून मी ‘द लेबल कॉर्प’ची सुरुवात केली तेव्हा त्याच्यात काही तरी वेगळं करायचं ठरवलं होतं. यातून एडिटोरिअल ई-कॉमर्सची संकल्पना समोर आली. ई-कॉमर्सच्या वेबसाइटमध्ये ‘टेस्टमेकर’ची भूमिका महत्त्वाची असते. टेस्टमेकर म्हणजे अशी व्यक्ती, जी तुम्हाला नेमकं काय सूट होईल हे सांगते. तुम्ही जेव्हा इंटरनेटवर ‘व्हाइट शर्ट’ म्हणून सर्च करता, तेव्हा तुमच्यासमोर हजार पर्याय येतात. पण त्यातून नक्की कोणता निवडायचा याबद्दल गोंधळ असतो. पण हेच जेव्हा मलाईका अरोरा खान तुम्हाला स्वत: एखादा सफेद शर्ट घालायला सांगते, तेव्हा तुम्ही लगेच तो शर्ट विकत घेता. एकूणच ही वेबसाइट एखाद्या मॅगझीनसारखी दिसते. सध्या ‘जबाँग’सारख्या खूप थोडय़ा वेबसाइट अशा प्रकारचे प्रयोग करत आहेत. काही जणांचा स्वत:चा ब्लॉग आहे. पण ‘टेस्ट मेकर’ असलेली पहिली शॉपिंग वेबसाइट भारतात ‘द लेबल कॉर्प’चीच होती.  सुरुवातीला ‘होम लेबल’साठी सुझ्ॉनचा चेहरा निश्चित केला. कारण आम्हाला त्या बॅ्रण्डसाठी सुंदर, क्लासिक चेहरा हवा होता. सुझ्ॉनची देहबोली त्या प्रकारची आहे. तिचं इंटेरिअरमधलं ज्ञानही वादातीत आहे. कॉर्सेट लेबलसाठी सध्याच्या आघाडीतील कोणत्याही नटीचा चेहरा डोळ्यासमोर येत नव्हता कारण, त्यांना त्यांची निश्चित स्टाईल नाहीय. दर चित्रपटागणिक त्यांचे लुक बदलतात. त्यांची प्रतिमाही बदलते.

आधी सेलिब्रिटी की आधी प्रसिद्धी?
वृत्तपत्रांतल्या पेज थ्रीवर झळकणारे सेलिब्रिटी हा एक वेगळा विषय आहे. सेलिब्रिटी घडवण्यासाठी ‘पेज थ्री’चा जाणीवपूर्वक वापरक केला जातो हे खरंय. ‘पेज थ्री’वर कोणी असावं आणि नसावं याची प्रत्येकाची वेगवेगळी गणितं असतात. काही जणांकडे काम नसलं तरी, सतत पेज थ्रीवर झळकत राहण्यासाठी ते लोकांना पैसे देत असतात. हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असतो. सेलिब्रिटीजना असं पेज थ्रीवर झळकत राहण्यासाठी मॅनेजर एका मर्यादित प्रमाणातच मदत करू शकतो. सतत प्रकाशझोतात राहण्यासाठी तुमच्याकडे तितकी गुणवत्ता असणं आवश्यक असतं. देव आनंदच्या काळात मॅनेजर नव्हते. तेव्हा त्यांची छबी तयार करणारं कोणीच नव्हतं. पण त्यांच्या प्रतिमेला साजेशा भूमिका त्यांना मिळत गेल्या. आज शाहरूख खानच्या बाबतीत बोलायचं झालं, तर तो स्वत: एक हुशार अभिनेता आहे. त्यामुळे त्याने कधी काय करावं हे सांगायला कोणत्याही मॅनेजरची गरज त्याला गरज वाटत नाही. पण शेवटी हाही एक व्यवसाय आहे, त्यामुळे एखाद्यामध्ये गुणवत्ता नसेल, तरी त्याला मोठं करण्याचा प्रयत्न येथे सर्रास होतो आणि हेच मला आवडत नाही.

ई-कॉमर्ससाठी मोठी बाजारपेठ
सध्या भारतात ई-कॉमर्स एका मोठय़ा बाजारपेठेच्या स्वरूपात समोर येत आहे. एकदा मी माझ्या कुरियर बॉयशी बोलत असताना कळलं आज भारतात अशी ठिकाणे आहेत, जिथे स्पीड पोस्ट पोहचत नाही, पण तिकडच्या लोकांकडे ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी क्रेडिट कार्ड मात्र आहे. ही खूप मोठी बाजारपेठ आहे आणि ती सतत वाढते आहे. भारत एकमेव देश आहे जिथे, कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधा आहे. या पाच वर्षांत ही बाजारपेठ अजून विस्तारित होईल. या क्षेत्रासाठी कोणत्याही ठरावीक शिक्षणाची गरज नसते. तुमची एमबीए, मार्केटिंग, फायनान्सची डिग्री इथे चालू शकते. नावीन्यपूर्ण दृष्टिकोन मात्र असायला हवा.

सेलिब्रिटी मॅनेजमेंट
फॅशन जगताचा एक भाग म्हणून सेलिब्रिटीजशी संबंध येत गेला. ‘एल’ मॅगझीननंतर ‘एम टीव्ही’साठी लिहिण्याची आणि त्यानंतर दिग्दर्शन, प्रॉडक्शनची संधी मिळाली. या काळात माझा अनेक सेलिब्रिटींशी संबंध येत होता. त्याच वेळी मी माझा मोहरा सेलिब्रिटी मॅनेजमेंटकडे वळवला. मला खरंतर सेलिब्रिटीजविषयी जास्त ओढा नव्हता. चित्रपटांमधील सेलिब्रिटीजपेक्षा स्पोर्ट्स सेलिब्रिटीजचं मला जास्त आकर्षण होतं. आजही मला टेनिस जास्त पसंत आहे आणि रॉजर फेडरर माझा आवडता खेळाडू आहे. मला सेलिब्रिटीजपेक्षा गुणवत्ता असलेल्या लोकांचं आकर्षण जास्त होतं आणि आहे. म्हणजे सेलिब्रिटीजमध्ये हुशारी नसते असं नाही; पण फोटोग्राफर्स, लेखक यांचं आकर्षण मला जास्त होतं. कदाचित सेलिब्रिटींविषयी आकर्षण नसल्यामुळेच मी चांगली मॅनेजर होऊ शकले. कारण हुरळून न जाता प्रॅक्टिकली मी काम करू शकले. सध्याचे प्रसिद्ध अभिनेते हे पूर्वी मॉडेल्स किंवा व्हीजे होते. त्यांचा माझ्याशी संपर्क आला तेव्हा माझ्यासोबत त्यांच्याही करिअरची सुरुवात होती. त्यामुळे सेलिब्रिटी मॅनेजमेंट म्हणून काम सुरू केलं तेव्हा या सर्वासोबत काम करताना कोणत्याही प्रकारचं दडपण जाणवलं नाही.
सर्व छायाचित्रे : गणेश शिर्सेकर