यंदा आयआयटी मुंबईच्या मूड इंडिगो या मोठय़ा फेस्टिवलमध्ये ‘ब्रिंग बॅक दॅट स्माइल’ असं म्हणत सर्व वयोगटांतील लोकांसाठी एक इव्हेंट केला.. तणावाशी कसा सामना करता येईल याविषयी. कामाच्या ताणामुळे, रिलेशनशिप प्रॉब्लेम्समुळे, निद्रानाशासारखे विकार लहान वयातच जडतात आणि त्यातून पुन्हा ताणतणावांचा सामना करावा लागतो. शालेय विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात येणाऱ्या ताणाला सामोरं जाण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी, घरगुती हिंसेच्या बळी ठरणाऱ्या महिलांना नवी उभारी देऊन सक्षम करण्यासाठी, वृद्धापकाळात वृद्धाश्रमाची पायरी चढावी लागलेल्या वृद्धांच्या जीवनात आनंद आणि उत्साहाचे रंग भरण्यासाठी आणि अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी विशेष प्रयत्न या उपक्रमातून ‘मूड इंडिगो’दरम्यान कॉलेज युथने केले. ‘क्षण’ आणि ‘आसरा’ या दोन संस्था ‘मूड इंडिगो’शी त्यासाठी संलग्न होत्या.
जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा गाजवला तो टेकफेस्टने. टेक्नॉलॉजीकडे कल असणाऱ्या या फेस्टिवलमध्येसुद्धा अशा प्रकारचे  सोशल इनिशिएटिव्ह घेतले जातात. लाडली नावाच्या संस्थेने टेकफेस्टमध्ये त्यांची ‘रोअर’ नावाची कँपेन घेतली. आजची स्त्री सुरक्षित आहे का, या प्रश्नाशीच ही कँपेन जोडलेली होती. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात एक १०० सेकंदांचा व्हिडीओ बनवायचा, अशी व्हिडीओ मेकिंग कॉम्पिटिशनच ठेवण्यात आली होती. स्पर्धेचे नियम थोडे हटके होते. अत्याचारांसंदर्भातला व्हिडीओ असला तरी त्याच्यात स्त्रीवर अत्याचार होताना दाखवायचे नाहीत, असा नियम होता. पुरुषाच्या दृष्टिकोनातून हा विषय मांडला जावा, असा यामागे उद्देश असावा. या स्पर्धेत देशभरातून अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. चैतन्य इसुकापल्ली दिग्दशिर्त व्हिडीओला प्रथम पारितोषिक मिळालं. त्याच्या व्हिडीओमध्ये एकही मुलगी दाखवलेली नाही आणि महिलांवर होणारे अत्याचार मूकाभिनयाद्वारे समोर येतात. मुलीची जन्मापूर्वीच हत्या करणारा समाज,तरुणपणी तिच्यावर अ‍ॅसिड अ‍ॅटॅक करणारा समाज याविषयी या वेगळ्या फॉर्ममधून भाष्य करण्यात आलंय. दुसरं पारितोषिक मिळालं साहील शिवाईकर दिग्दर्शित ‘तितली उडी’ या व्हिडीओला. स्त्रियांनी स्वत:च्या पायावर उभं राहणं किती गरजेचं आहे हे यामध्ये कलात्मक पद्धतीनं सांगण्यात आलं.
प्रत्येक कॉलेज फेस्टमध्ये असे लहान-मोठे सामजिक उपक्रम होत असतात. सोशल नेटवर्किंगवर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असणारी तरुण पिढी तितकीच सोशली रिस्पॉन्सिबलसुद्धा आहे असं प्रकर्षांने जाणवलं.

एक असा भारत..
टेक फेस्टच्या व्हिडिओ मेकिंगच्या एका इव्हेंटमध्ये भारतातील दोन कॉलेजयुवकांचे अनेक पातळ्यांवरचे सामाजिक संघर्ष दिसले. आपण समाजाचं देणं लागतो या जाणिवेनं पुण्याच्या सिंहगड इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी धुळ्याजवळच्या गावात जाऊन थोडं वेगळं काम केलं. घरगुती फराळ बनवणाऱ्या तिथल्या स्त्रियांना एकत्र आणलं आणि त्यांना व्यवसाय कसा करावा, या बाबतीत कॉलेजमध्ये शिकलेल्या ज्ञानातल्या थोडय़ा टिप्पण्या दिल्या. आज त्या बायका ‘हिरकणी गृहउद्योग’ नावानं एक छोटी संस्था व्यावसायिक तत्त्वावर चालवू लागल्या आहेत. ‘आम्ही फक्त त्यांना एकत्र आणलं आणि एकत्र काम करण्याचा सल्ला दिला’, असं या उपक्रमातल्या चारुल भाकरे आणि चेतन सुलाणे  यांनी सांगितलं.
कॉलेजपलीकडच्या विश्वात सामाजिक बदल घडवणारी मुलं एकीकडे आणि स्वत:च्याच कॉलेजमध्ये जाचक नियमांमध्ये जखडलेले विद्यार्थी याच स्पर्धेच्या वेळी दिसले. उत्तराखंडमधील एका महाविद्यालयात संध्याकाळी ५.३० नंतर मुलींना त्यांच्याच वसतिगृहाच्या आवारात फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मेसमध्ये जातानादेखील त्यांना ड्रेसकोड पाळावा लागतो. लांब कुर्ता आणि स्टोल हे असायलाच हवं, असा तिथे नियम आहे. याला वाचा फोडण्याचं काम नेहा सिजवाली हिने आपल्या प्रेझेंटेशनमधून केलं. दुसऱ्या कॉलेजमध्ये जावंसं नाही वाटलं का, असं नेहाला विचारल्यावर तर ती vn13म्हणाली, ‘मी तर आरामात कॉलेज बदलू शकते. पण इथल्या बाकी मुलींचं काय? मुळात कॉलेज बदलून पळ काढण्यापेक्षा इथल्या लोकांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे .’
मुक्त वातावरण, मुला- मुलींसाठी समान नियम यासाठी इथल्या लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे आणि तोच माझा प्रयत्न आहे.    
– नेहा