हाय,
मी २५ वर्षांची वर्किंग गर्ल आहे. मला खरं तर बेसिक लुक टिप्स हव्या आहेत. मला मेक-अपविषयी फारसं ज्ञान नाही. दररोज ऑफिसला जाताना नेमका काय आणि कसा मेकअप असावा याबाबत मला सांगा. माझं कॉम्प्लेक्शन डार्क आहे. त्यामुळे सगळीच प्रॉडक्ट मला सूट होतात असं नाही. त्यातून मी ऑफिसला बसनं जाते. मेकअप केला तरी या बसच्या प्रवासात ऑफिसला पोचेपर्यंत पार वाट लागलेली असते. उन्हाळ्यात तर घामामुळे ते आणखीनच वाईट दिसतं. आणखी एक.. माझ्या ओठाच्या वर लव आहे. लोक त्याला हसतात, तेव्हा मला खूपच शरमल्यासारखं होतं. मी अप्पर लिप्सचे केस काढावेत का? पण ते करताना दुखेल याची खूप भीती वाटते. मी नेमकं काय करू?वृशाली
प्रिय वृशाली,
तुझी नेमकी काय बिकट अवस्था होत असेल ते मी अगदी समजू शकते. कारण अनेक मुली माझ्याकडे हेच प्रॉब्लेम्स घेऊन येतात. पण तुला फार काळजी करायचं कारण नाही. हल्ली स्कीनकेअर आणि ब्युटी क्षेत्रात इतकी प्रगती झाली आहे की, त्यासमोर तुझे हे प्रॉब्लेम्स अगदी क्षुल्लक आहेत. तुझ्या चेहऱ्याकडे बघून हसणारे लोकांची टीका तुला झेलावी लागणार नाही हे नक्की.
अप्पर लिप्सवरची लव ही तुझी मोठी समस्या आहे, असं तुझ्या पत्रावरून वाटतं. नुसता मेकअप करून वरवरचं समाधान करण्यापेक्षा या समस्येची मुळातून विल्हेवाट लावली पाहिजे.
अनावश्यक केसांपासून सुटका करून घेण्यासाठी काही घरगुती उपाय केले जातात. लिंबू, हळद, ओटमील, मेथ्या, बार्ली आदी पदार्थ वापरून घरगुती ब्लीच करता येऊ शकतं. पण तू नोकरी करतेस त्यामुळे तुला या सगळ्या उद्योगाला किती वेळ मिळेल याबद्दल शंका आहे. दुसरा उपाय म्हणजे व्ॉक्सिंग किंवा थ्रेडिंग. हे पारंपरिक उपाय पार्लरमध्ये उपलब्ध असतात. फण तू म्हणतेस तसं ते थोडं पेनफुल असू शकतं. ब्लीचिंग हा न दुखणारा आणखी एक उपाय आहे. पण माझा सल्ला विचारशील तर ब्लीचिंग शक्यतो करू नकोस, असं मी सांगेन. माझ्या दृष्टीनं ब्लीच केलेले केस अगदी विचित्र दिसतात.
अनावश्यक केस काढण्यासाठी क्रीम, एपिलेटर्स आणि लेझर ट्रीटमेंटसारखे काही नवीन उपाय हल्ली आले आहेत. तुला क्रीम्सची अ‍ॅलर्जी वगैरे नसेल तर हेअर रिमूव्हिंग क्रीम हा एक पर्याय असू शकतो. पण क्रीम चांगल्या कंपनीचंच वापरायला हवं. ते थोडं महाग असेल कदाचित पण प्रसिद्ध कंपनीचं चांगल्या प्रतीचं क्रीम वापरणं सेफ आहे. कारण चेहऱ्यावर वापरायचं असल्यानं हलक्या प्रतीचं क्रीम ट्राय करण्याचा धोका पत्करू नकोस. कुठलंही हेअर रिमूव्हिंग क्रीम असलं तरी पहिली पॅच टेस्ट घेऊन मगच ते चेहऱ्यावर ट्राय कर. थोडं क्रीम हाताला लावून जळजळ, आग आणि अ‍ॅलर्जी आली नाही तरच काही वेळानं चेहऱ्याला लावावं. एपिलेटर्सची पद्धत त्याहून चांगली आहे. हे रेझरसारखं काम करतात. फक्त इलेक्ट्रिसिटी लागते. एपिलेटरसुद्धा ब्रॅण्डेडच घे. कारण कमी प्रतीच्या इलेक्ट्रिकल डिव्हाइसनीसुद्धा अपाय होण्याचा धोका असतो. शेवटचा पर्याय आहे परमनंट हेअर रिमूव्हिंगचा. स्किन क्लिनिक किंवा मोठय़ा पार्लरमध्ये हल्ली लेझर उपचार उपलब्ध असतात. पुन्हा पुन्हा एपिलेटर किंवा क्रीम वापरायचा कंटाळा असेल तर
लेझर उपचारांनी अनावश्यक केस कायमचे घालवता येतात.
आता मेकअपबद्दल बोलू या. डस्की स्किन टोनला योग्य शेड मिळवणं महत्त्वाचं असतं. फाउंडेशनची चुकीची शेड निवडली तर चेहरा पांढराफटक आणि पेल दिसू शकतो. फाउंडेशनचा उपयोग गोरं दिसण्यासाठी नसून आपला ओरिजिनल अंडरटोन उठून दिसण्यासाठी, त्वचा नितळ दिसण्यासाठी केला जाणं अपेक्षित आहे. त्वचा उजळून दिसण्यासाठी लाइट टेक्शरचं फाउंडेशन वापर. डार्क स्किनसाठी लिक्विड आणि क्रीम बेस्ड फाउंडेशनचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. फाउंडेशन लावताना ते त्वचेमध्ये व्यवस्थित ब्लेंड व्हायला हवं. नाहीतर त्याचे थर दिसतात आणि ते अगदी वाईट दिसतं. त्वचेवर काही व्रण किंवा डाग असतील आणि ते मेकअपनं झाकायचे असतील तर त्या भागावर कन्सिलर वापरणं चांगलं. ऑरेंज आणि रेड बेस्ड कन्सीलर डार्क लाइन्स कमी करण्याचं काम करतात. कन्सीलर लावल्यानंतर पावडर लावून ते सेट केलं पाहिजे. रोज कामाला जाताना ब्लश, लिप लाइनर्स, लिप स्टिक्स, मस्कारा असं सगळं लावायची काहीच आवश्यकता नाही. बेसिक मेकअप म्हणजे लिप बाम किंवा लाइट लिपस्टिक, बेसिक काजळ किंवा आय लाइनरची बारीकशी रेघ पुरेशी आहे. डस्की स्किनसाठी लाल शेडमधल्या लिपस्टिक चांगल्या दिसतात. या रंगाच्या बरगंडी आणि ब्राऊन शेड तुझ्या स्किनटोनला चांगल्या दिसतील. खूप भडक किंवा ग्लॉसी लिपस्टिक मात्र कामाच्या ठिकाणी नको. लिप ग्लॉस वापरलास तर तो पिंक किंवा कोरल शेडमधला वापर. त्यापेक्षा डार्क नको. आय मेकअपमध्ये डार्क स्किनटोनसाठी आय श्ॉडोज खरोखर जादू करतात. फक्त आयशॅडो व्यवस्थित लावता आली पाहिजे.
सकाळी केलेला मेकअप दिवसभर तसाच राहणं ही अवघड गोष्ट आहे खरी. विशेषत: उन्हाळ्यात तर आणखी अवघड आहे. शक्य असेल तर महत्त्वाच्या ऑकेजन्सना एसी बस किंवा मेट्रोनं प्रवास कर. जमलं तर प्रवासादरम्यान चेहरा झाकून घेता येतो का ते बघ. नाहीतर सोपा उपाय म्हणजे, ऑफिसला पोचल्यानंतर चेहरा धुऊन मग मेकअप करणं. ते शक्य नसेल तर वर सांगितल्याप्रमाणं कुठलातरी उपाय शोधायला हवा. फाउंडेशनच्याऐवजी सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझरचा उपयोग करून बघ. मेकअपचे खूप सारे थर देण्याचं उन्हाळ्यात तरी टाळायला हवं, कारण थर वाढतील तेवढा उकाडा वाढेल. शक्यतो वॉटरप्रूफ मेकअप कर. तशी प्रॉडक्ट्स बाजारात उपलब्ध असतात. काजळाची जाड रेघ किंवा डार्क आयलाइनर टाळ. कारण जरासा घाम आला तरी काळा रंग डोळ्याखाली पसरण्याचा धोका असतो. सगळ्यात महत्त्वाचं.. कायम पर्समध्ये ब्लॉटिंग पेपर ठेव. घाम आला तर तो तिथल्या तिथे टिपून घेता येईल. दररोजच्या धकाधकीत यातल्या काही टिप्स नक्की कामी येतील, अशी आशा करते.
ऑल द बेस्ट!

तुमचे प्रश्न पाठवा
तुमच्या फॅशनविषयीच्या शंका आमच्याकडे पाठवा. फॅशन स्टायलिस्ट मृण्मयी मंगेशकर त्यांना या सदरातून उत्तर देतील. सब्जेक्टलाईनमध्ये फॅशन पॅशन लिहायला विसरू नका. आमचा आयडी- viva.loksatta@gmail.com