च्यायला सरकारला कितीही शिव्या द्या, पण साला एक डिसिझन मस्त घेतलाय यार, थर्टी फस्र्टला आपण च्यायला पहाटे पाच वाजेपर्यंत डोसू शकतो, आपल्याला कोणीही काही म्हणणार नाही यार, झकास, असं म्हणत चोच्याने थर्टी फर्स्टचा मूड क्रिएट केला खरा, पण त्यावर सुप्रियाने वेगळाच विषय मांडला. अरे पहाटे पाच वाजेपर्यंत पिण्याची परवानगी द्यायची सरकारला काय गरज होती, जे काय वाईट प्रकार चालले आहेत, त्याला अजूनच याने खतपाणी मिळेल ना, उलट सरकारने यापेक्षा कडक काही तरी करायला हवे होते, हे सुप्रियाचं संपतं न संपतं तोच अभ्या म्हणाला, अगं सुप्रिया वर्षांचा शेवट, हा पिण्याचा बहाना असला तरी त्याने रिलॅक्स व्हायला होतं यार आणि पाचपर्यंतची परवानगी नसतानाच या साऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्यामुळे या निर्णयामुळे थोडीच या गोष्टींना खतपाणी मिळणार आहे, आता तरी या गोष्टी नको यार, या साऱ्या गोष्टींचा वीट यायला लागलाय, आता फक्त एकच विचार थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन कुठे आणि कसं करायचं याचा प्लॅन करायचा.
सगळ्यांनाच अभ्याचं बोलणं पटलं असावं, पण नेमकं करायचं काय, हे कोणालाच सुचत नव्हतं. त्यामध्ये संत्याने एक दिलासा दिला. अरे यार एक गूड न्यूज आहे थर्टी फर्स्टसाठी, माझ्या घरचे सगळेच गावी जातायत, त्यामुळे आपलं घर तर रिकामे आहे. घाला हैदोस घालायचा तेवढा. असं संत्याने म्हटल्यावर सारेच निर्धास्त झाले. कारण पार्टी कुठे करायची हा प्रश्न होताच. साल्या संत्या, ही सॉलीड गूड न्यूज दिलीस लेका, आता प्लॅन काय करायचं माहितीए का, आपण आपला स्टॉक घेऊ, त्यामध्ये नो डाऊट. पण खाण्यासाठी जास्त पैसे कशाला घालायचे, कारण स्टॉकमध्ये आपले पैसे घुसणारच आहेत. त्यामुळे आपणच करूया आणि या भवान्या गमजा मारतच असतात की, आम्हाला हे बनवता येतं आणि ते बनवता येतं, आता त्यांची परीक्षा आपण घेऊयाच, असं म्हणत अभ्याने मस्त पुडी सोडली, तो काही चुकीचं बोलत नव्हता, हेकट्टय़ाला पटलं होतंच, पण तरीही या भवान्यांनी थोडा विरोध केलाच, च्यायला तुम्ही पिऊन एन्जॉय करणार आणि आम्हाला कामाला लावणार, सॉलीड आयडिया आहे अभ्या तुझी, करायला हरकत काहीच नाही, पण तुमची पण मदत आम्हाला लागेल आणि तुम्ही ती करायलाच हवी. यावर चोच्या म्हणाला, आम्ही पिणार, हे तुला खटकतंय का, मग तूही बस आमच्याबरोबर, असं चोच्याने म्हटल्यावर त्याची विकेट या पोरी काढणार होत्याच, पण अभ्या मध्ये पडला. अरे ऐका माझं, चोच्या च्यायला कुठे पण काय मस्करी करतोस, हे बघा आपण सगळ्यांनी मिळून बनवूया, म्हणजे बघा आम्ही तिघे तुम्हाला बाजारातून आणून आणि काही कापायचं वगैरे असेल तर ते करू, पण त्यानंतर पूर्ण जबाबदारी तुम्हा मुलींची. असं म्हणत अभ्याने सुवर्णमध्य काढला, याला सगळ्यांनी मान्यता दिली.
चला कट्टय़ाचं तर प्लॅनिंग झालं, तुमचंही काही ना काही झालंच असेल. नववर्षांच्या स्वागतासाठी आपण सारेज सज्ज आहोत. मी तुम्हाला या वर्षी दर आठवडय़ाला कट्टय़ावरचे अचाट/ पुचाट विचार तुमच्यापुढे मांडले, ते आवडल्याची कबुली तुम्ही बऱ्यादचा पत्रांच्या माध्यमातून दिलीही. नववर्षांच्या तुम्हा लाडक्या मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा! असाच लोभ असू द्या.