मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- द्रुतगती महामार्गावर अपघातात महाबळेश्वरच्या चौघांचा मृत्यू
- कोल्हापूरची टोल आकारणी कृती समितीच्या चर्चेनंतर- हर्षवर्धन पाटील
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- फेरतपासणीची लांबलचक प्रक्रिया टाळण्यासाठी डीन समितीच्या सूचना
- व्यावसायीकरणामुळे माध्यमे वास्तवापासून दूर -पी. साईनाथ
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
इंटरनेटवर एक बटण दाबलं की काहीही खरेदी करता येतं. फ्लिपकार्टनी तर खूप मोठी सोय केली आहे. पण गैरसोय नसलेली खूप महत्त्वाची सुखसोय त्यामुळे लयास चालली आहे.
मी नेहमीच तिथून जाते. त्यामुळे ओझरतं दर्शन नक्की ठरलेलं. काही काम असो किंवा नसो. बाय डीफॉल्ट उगीचच न्याहाळत जाण्याची सवय लागलेली. त्या दिवशी काहीतरी वेगळी हालचाल जाणवली तिथे- त्यामुळे उत्सुकता चाळवली गेली. आणि मी वाट वाकडी करून दारापर्यंत गेले. आतलं दृश्य पाहून कमालीचा धक्का बसला. आणि बातमी ऐकून तरी सुन्न घेरीच आली. 'दनाई' बंद होणार म्हणे. खार-बांद्रा परिसरातलं सुप्रसिद्ध आणि फार जुनं पुस्तकाचं दुकान. दनाईत जास्त करून इंग्लिश पुस्तकंच असतात, पण पुस्तकाच्या दुकानात जायला मी काहीतरी कारणच शोधत असते. कधी कधी पुस्तकं नाही. तर काही मासिक वगैरे घ्यायला तरी मी आत डोकावयाचे- काउण्टरच्या मागे जाड भिंगाचा चष्मा घातलेले, दक्षिणी अॅक्सेंट असलेले गृहस्थ नेहमी माझ्याशी हिंदी-मराठी चित्रपटांविषयी बोलायचे. कुठली डीव्हीडी घरी आणून पाहिली, त्यावरचं मत, आवर्जून सांगायचे.
माझ्या नवऱ्यासाठी 'दनाई' म्हणजे श्रद्धास्थान! दर आठ-पंधरा दिवसांनी दनाईची चक्कर ठरलेली. मला गमतीनी कधी कधी वाटायचं, वाण्याकडे कसं महिन्याचं किराणा सामान मांडून ठेवतात, तसं दनाईमध्ये नचिकेतचं पुस्तकाचं बिल मांडून ठेवायला पाहिजे. तरीही चढाओढ असल्यासारखी इंग्रजी-मराठी पुस्तकं विकत घेतली जातात आमची. पण दनाईच्या शांत शिस्तशीर पद्धतीनं प्रिंटरवर बिल टाइप होईपर्यंत थांबायचं, परत एकदा वळून सगळ्या पुस्तकांकडे बघायचं. होत असलेल्या अजून एखाद्या मोहाशी तडजोड करायची आणि समाधानानी बाहेर पडायचं. हे ठरलेलं रूटीन. भर गर्दीच्या रस्त्यावर असूनही दनाईचा कोपरा फार पवित्र आणि निवांत वाटायचा. काही वर्षांपूर्वी शेजारी एक फास्ट फूड जॉइण्ट आलं, मग समोर सुपर बझिंग आणि स्टायलिश कॉफीशॉप आलं. पण दनाईची आब आणि रुबाब कधीच कमी झाले नाहीत. अक्षरश: देशविदेशातले वाचक तिथे यायचे. प्रत्येकाला वेगळीच पुस्तकं हवी असायची. काही मित्र-मैत्रिणी भान हरपून पुस्तकावर चर्चा करताना दिसायचे. तर कधी मतं न पटल्यामुळे वाद घालत बाहेर येताना दिसायचे.
मला नेहमी दनाईत जायचे डोहाळे लागलेले असायचे. त्या छोटय़ा दुकानात एक मोठ्ठं गोड तळघर पुस्तकांनी खचाखच भरलेलं. आणि एक बेतशीर वरचा मजला होता. अनेकदा बिल होईपर्यंत मी तिथल्या वेताच्या मोडय़ावर टेकायचे. तो मोडा कुणी तळघरात पळवला असेल, तर एका पायावरून दुसऱ्या पायावर भार टाकत ताटकळायला फार बरं वाटायचं. नवीन पुस्तकांवर नजर टाकत, नव्या पुस्तकांचा वास घेत तिथेच रेंगाळावंसं वाटायचं. अमुक एक पुस्तक हवं असेल, तर लगेच नाव नोंदवून घेतलं जायचं. नचिकेतला एकदा मुंबईच्या जुन्या इमारतींवरचं कुठलं पुस्तक हवं होतं- ते लगेच आणून दिलं त्यांनी. एखादं पुस्तक सांगितल्यावरही मिळालं नाही तर फार हताश व्हायची दनाई टीम. नाही हो. मिळतच नाहीए असं हरल्यासारखं सांगायचे.
मी त्या दिवशी गेले तर उरलीसुरली पुस्तकं पुठ्ठय़ाच्या मोठय़ा बॉक्समध्ये भरली जात होती. दुकानाच्या मालक- मिसेस मँगो, ते दक्षिणी गृहस्थ किंवा ओळखीचं कुणीच दिसत नव्हतं. सामान हलवणारे वेगळेच कामगार भराभरा काम करत होते. आपण कपडे भरतोय, भांडी. की पुस्तकं. काहीच फरक पडत नव्हता त्यांना. त्रयस्थपणे नीट पॅकिंग करण्यात गुंतले होते ते सगळे. आधी मला वाटलं दनाईचंच नूतनीकरण होणार असेल. पण चौकशीअंती समजलं. की क्लोज म्हणजे कायमचं शटर बंद होणार आहे आणि तिथे आता कोणा मोठ्ठय़ा डिझायनर की सराफाची शोरूम निघणार आहे. माझ्या गळ्यात तो त्रासदायक, दुखणारा आवंढा आला. आवाज चिरकायला लागला. शेवटचा लॉट घेऊन चाललेल्या तिथल्या माणसांना मी डोळ्यातलं पाणी आवरत. ''खरंच? असं कसं शक्य आहे.'' असं विचारायला लागले, पुस्तकाच्या गठ्ठय़ांना स्पर्श करायला लागले. आपल्याला सांगून कुणीतरी घर लुटून न्यावं- आपल्या डोळ्यासमोर आणि आपल्याला काही करता येऊ नये. तसं मूर्खासारखं रडू यायला लागलं.
किती जणांना मी हा पत्ता सांगितला होता. किती जणांनी मला सांगितला होता. दनाईच्या पुढे, दनाईच्या जवळ; दनाई माहिती आहे का. पुढे आल्यावर दनाई नावाचं पुस्तकाचं दुकान दिसेल. तिथून. छे! किती मित्र-मैत्रिणी या परिसरात राहतात. किती दुकानं आहेत, सिनेमाची ऑफिसं आहेत आसपास. जुन्या झाडांच्या गर्द सावलीत त्या सगळ्यांना दिशा सांगणारा एक अभ्यासू कोपरा आपल्याला अल्विदा म्हणतो आहे. आपलं खूप खूप नुकसान होतंय. न भरून येणारं. असं वाटायला लागलंय. त्या छोटय़ा दुकानात आपण आपल्याबरोबर थोडा वेळ राहायचो, शांत व्हायचो, आपण आपल्याला सापडायचो. दनाईच्या नुसत्या असण्याने त्या गजबजलेल्या संपूर्ण रस्त्यावर एक मोठ्ठा दिलासा नांदत होता. तो पत्ता, तो लॅण्डमार्क. निघून चालला आहे.
मागच्या आठवडय़ात फर्गसन कॉलेजचे माजी प्राचार्य- आमचे बाचल सर गेले. ते कळवायला माझ्या मराठीच्या माधवी वैद्य मॅडमचा एसएमएस आला. माहीत असलेली एक गोष्ट झाली. सर फार र्वष आजारी होते. स्वत: एक चालती-बोलती इन्स्टिटय़ूट आणि प्रोत्साहनाचा झरा असलेले माझे बाचल सर गेले की.. परत न येण्यासाठी. आठवणी आहेत, पण असं काही घडलं की आपल्यातून आपलाच एक अंश संपतो नाही.. काही माणसं आणि पत्ते हरवण्यासाठीच आपल्याला शोधत येतात का?
नचिकेत, चित्रा पालेकर आणि शशिकांत सावंत तुमचं सांत्वन. 'दनाई'साठी...
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















