सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट

 

पिंगाचा वाद
‘बाजीराव-मस्तानी’तील ‘पिंगा’ गाणं आणि चित्रपटाबद्दलच्या आक्षेपांचं प्रमाण वाढतंय. आधी पिंगा गाणं आणि चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज झाल्यावर त्याबद्दल सोशल मीडियावर अनेकानेक प्रतिक्रिया उमटल्या. या चित्रपटातून अयोग्य इतिहास मांडल्याचं सांगत त्याला विरोध करण्यात येतोय. त्यावर बंदी घालण्याची मागणी करणारं ‘बॅन द मूव्ही बाजीराव मस्तानी’ हे पेज फेसबुकवर तयार करण्यात आलंय. शिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये, म्हणून एक ऑनलाइन याचिकाही दाखल करण्यात आलेय. ‘पिंगा’ गाण्यातली वेशभूषा आणि त्यातल्या नृत्यावरही आक्षेप घेण्यात आलेत. चित्रपटातील इतिहासाच्या मांडणीविषयीही काही जणांनी शंका व्यक्त केलेय. काहींनी ‘आधी चित्रपट पाहा नि मग मत व्यक्त करा. अभिव्यक्तिस्वातंत्र सगळ्यांना आहे,’ असा सबुरीचा सल्ला दिलाय. तर काही जण या गाण्यावर आणि एकूणच या वादावर थोडं विनोदी अंगानं ताशेरे ओढताहेत. ‘काशीबाई आणि मस्तानीचं एकदा जोरदार भांडण झालं. बाजीरावाची जाम पंचाईत. काय करावं समजेना. घेऊन गेला दोघींनाही लक्ष्मी रोडवर शॉपिंगला. दोघींनाही सारख्या साडय़ा घेतल्या. मग काय? दोघीही जाम खूश. शनिवार वाडय़ावर येऊन पिंगा केला. हा इतिहास फार कमी जणांना माहितीये. भन्साळी तो लोकांसमोर आणतोय.’ असे बोचरे विनोद त्यातूनच फॉरवर्ड होताहेत.

वर्ड ऑफ द इयर
सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करताना आपण ‘इमोजी’चा वापर अनेकदा करतो. हा वापर एवढा वाढलाय की, त्याची दखल खुद्द ‘ऑक्सफर्ड डिक्शनरी’ला घ्यायला लागलेय. २०१५ मधला ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून ‘ऑक्सफर्ड’नं या शब्दाची (खरं तर भावना व्यक्त करणाऱ्या चित्राची असं म्हणायला हवं) निवड केलेय. अनेक भावभावना इमोजीतून व्यक्त करता येतात. मात्र हा मान ‘फेस विथ टीअर्स ऑफ जॉय’ या ‘इमोजी’ला मिळालाय. एखाद्या पिक्टोग्राफला हा मान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

क्रंची कुरकुरे पिझ्झा फीवर
एका पिझ्झा तयार करणाऱ्या कंपनीनं # क्रंची कुरकुरे पिझ्झाबद्दल तुमची पंचलाइन शेअर करा, असं ट्वीट केलं नि त्याला ट्विटरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. एवढा की हा टॉपिक टॉप ट्रेण्डमध्ये आला. आधीच पिझ्झाप्रेमी अनेक. त्यातही कुरकुरे अॅड केलेला पिझ्झा, असं दिसल्यावर कोणता कुरकुरेप्रेमी मागं राहील.. मग कुणी लिहिलं की, ‘आत्ताच मित्राच्या इन्स्टाग्रामवर मी क्रंची कुरकुरे पिझ्झाचा फोटो पाहिलाय नि मला तो खायचाच आहे.’ कुणी लिहिलं, ‘बाय वन, ट्रिट वन.’ कुणी म्हणालं, ‘गुड ऑफर फॉर फूडी.’ कुणाला वाटलं की, ‘चटपटा स्नॅक. महमाननवाजी का नया ढंग.’ एकुणात क्रंची कुरकुरे पिझ्झाच्या या कॉन्टेस्टमध्ये सगळे जण व्हच्र्युअली तर त्याच्यावर तुटून पडलेले दिसले. खरी चव ट्राय करून बघायला हवी आता एकदा.

संस्कारी जेम्स बॉण्ड
‘स्पेक्टर’ या बॉण्डपटातील काही दृश्य आणि संवादांना सेन्सॉर बोर्डानं कात्री चालवण्याच्या घटनेवर सोशल मीडियात विशेषत: ट्विटरवरून टीकेची झोड उठवण्यात आली. या चित्रपटातील किस सीन्स कापण्यात आल्याचे कळल्यावर चित्रपटसृष्टीतल्या दिग्गजांसह सामान्य प्रेक्षकांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यामुळं #स्पेक्टर आणि #संस्कारी जेम्स बॉण्ड हे हॅशटॅग टॉप ट्रेण्डमध्ये राहिले. एवढय़ा टिप्पणीनंतरही अनेक जेम्सप्रेमींनी तो पाहिला नि तो चाललाही.
पर्सन ऑफ द इयर
दरवर्षी जाहीर करण्यात येणाऱ्या ‘पर्सन ऑफ द इयर’च्या नामांकन यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या वर्षीही समावेश करण्यात आलाय. ‘टाइम’च्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या या यादीत मोदी यांच्यासह ‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाई, ‘रिलायन्स’चे मुकेश अंबानी यांनीही नामाकनं मिळवली आहेत. या यादीसाठी वाचक आणि संपादकीय अशा दोन मतचाचण्या घेतल्या जातात. त्याचा निर्णय डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात जाहीर होईल. जगभरातले नेते, कलाकार, इंटरनॅशनल कंपन्यांचे सीईओ अशा ५८ जणांचा या यादीत समावेश आहे. त्यात बराक ओबामा, क्षी जिनपिंग, मलाला युसुफजाई, हिलरी क्लिंटन आदींचा समावेश आहे.

हिवाळा मुबारक
थंडीचा मोसम सुरू झालाय, असं म्हणता म्हणता मध्येच अवकाळी पाऊसही रिमझिमतोय. तरीही कॅलेंडरवरचा महिना प्रमाण मानून सोशल मीडियावर थंडीवरचे मेसेजेस फॉरवर्ड होऊ लागलेत. उदाहरणार्थ, ‘पुढील काही दिवस तुमची काही चूक नसतानासुद्धा तुमचे ‘थोबाड’ फुटू शकते.. थंडी पडते आहे.. काळजी घ्या..’ किंवा ‘थंडी वाढत चाललीय. त्यामुळे आंघोळीचे खालील प्रकार वापरता येतील. १- काकडीस्नान – या प्रकारात पाण्याच्या थेंबांना आपल्यावर शिंपडून स्नान केले जाऊ शकते. २. नळ नमस्कारस्नान – यात तुम्ही नळाला नमस्कार करण्याने आंघोळ झाली असे समजण्यात येईल. ३. जलस्मरणस्नान – हे उच्च कोटीचे स्नान असून अंथरुणात राहूनच पाण्याने आंघोळ करतोय या स्मरणानेच आंघोळ झाली असे होईल. ४- स्पर्शानुभूतीस्नान – या प्रकारात आंघोळ केलेल्या व्यक्तीला स्पर्श करून ‘त्वं स्नानम् मम् स्नानम्’ म्हटल्याने आंघोळ झाली असे मानण्यात येईल.’ किंवा ‘हा असाच सारखा जर वेळी-अवेळी पाऊस पडत राहिला तर.. काही वर्षांनी आपल्यापेक्षा लहान असलेली मुलंसुद्धा म्हणतील- आम्हीपण तुमच्याएवढेच पावसाळे बघितलेत..’

सत्तापालट
बिहारमधल्या सत्तापालटामुळं नितीशकुमार, लालूप्रसाद यादव आणि कुटुंबीय पुन्हा एकदा चर्चेत आलेत. शपथविधीच्या वेळी लालूंचा मुलगा तेजप्रतापची शपथ घेताना उडालेली भंबेरी आणि त्यावर सोशल मीडियातून झालेली टीकाटिप्पणी चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळं ‘क्या गुजरेगी उस कढर/कअर अफसरों पर गालिबम्’! वो जब नौवीं फेल तेजप्रताप को सेल्युट मारेगा’.. असे मेसेज फिरत होते. तर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गळाभेटीची सोशल मीडियावर खिल्ली उडविली गेली. भ्रष्टाचारावर आवाज उठविणारे केजरीवाल पाहा, लालूंची कशी भेट घेताहेत, लालूंच्या भ्रष्टाचार मिठीत केजरीवाल..’ अशा प्रकारची जोरदार टीका ट्विटरवर अनेकांनी केली. ‘केजरीवालांना लालूंचा भ्रष्टाचार दिसला नाही का? या भेटीचं कारण काय? केजरीवाल यांचा लढा दिखाऊ आहे का?’ असे सवालही उपस्थित केले गेले.

दिलवाले नि अलबेला..
काजोल-शाहरुख खानच्या ‘दिलवाले’ची बहुत चर्चा सोशल मीडियावर होतेय. त्यामुळं #दिलवाले, #वेटिंग फॉर दिलवाले रिलीज, #गेरूआ हे हॅशटॅग ट्रेण्डिंगमध्ये झळकताहेत. गेरूआ या गाण्याला नेटकरांनी भरभरून दाद दिलेय. गीता बालीच्या लुकमधली #विद्या बालन हाही नेटकरांच्या चर्चेचा विषय ठरला होता. शेखर सरतांडेल दिग्दर्शित ‘एक अलबेला’ या भगवानदादांच्या जीवनावर आधारित चित्रपटात विद्या गीता बालीची भूमिका साकारतेय. सोशल मीडियावर विद्याच्या या फोटोचं कौतुक केलं जात असून चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढतेय.