शरीरातील अनावश्यक घटक आणि विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला डिटॉक्सिफिकेशन म्हणतात. उन्हाळ्याचा हंगाम नैसर्गिक डिटॉक्ससाठी आदर्श असतो. या हंगामात घेतलेच पाहिजेत असे पाच डिटॉक्सिंग घटक कोणते?
शरीरातून नको असलेली द्रव्ये नैसर्गिकपणे बाहेर टाकून देण्यासाठी उन्हाळा ऋतू फायद्याचा आहे. उन्हाळ्यात घामावाटे मोठय़ा प्रमाणावर ही द्रव्ये बाहेर जाऊ शकतात. उन्हाळ्याच्या दिवसांत तहान जास्त लागत असल्यामुळे पाणीही मोठय़ा प्रमाणावर प्यायले जाते आणि ते डिटॉक्स म्हणजे निर्विषिकरणाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. या हंगामात खूप ताजी फळे आणि भाजीपाला मिळतो. त्याचा उपयोगही शरीर स्वच्छ करण्यासाठी होऊ शकतो. पण आपल्या काही सवयी ही नैसर्गिक डिटॉक्सची प्रक्रिया अडचणीची करू शकतात. शरीरात असलेल्या अतिरिक्त साखर, रसायने आणि अल्कोहोल बाहेर टाकण्यासाठी काही नैसर्गिक उपचार करता येतील.
माणसाचे यकृत पुरेशा प्रमाणात अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट्स निर्माण करत असते. अ‍ॅण्टिऑक्सीमुळे शरीरातल्या फ्री रॅडिकल्सवर मात करता येते. पण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यामुळे आणि कृत्रिम रासायनिक पदार्थ खाण्यात आल्यामुळे जास्त अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट्स असलेले पदार्थही जेवणात असणे आवश्यक झाले आहे. अशा पदार्थाना हल्ली डिटॉक्स फूड म्हणायची पद्धत आहे. या ऋतूत डिटॉक्स फूडच्या सेवनाने हेल्दी आणि रिफ्रेशिंग वाटते.

पाच नैसर्गिक डिटॉक्स
१. ‘समर डिटॉक्स’साठी कलिंगड हे सर्वात चांगले फळ आहे. कलिंगड अल्कली प्रवृत्तीचे फळ आहे. सिट्रलाइन या अमायनो अ‍ॅसिडचा हा मोठा स्रोत आहे. या सिट्रलाइनमुळे अमोनिया आणि इतर विषारी द्रव्ये शरीरातून बाहेर टाकण्यास मदत होते. कलिंगडमध्ये मोठय़ा प्रमाणावर पोटॅशियमदेखील असते. त्यामुळे आजकाल आपल्या जेवणात वाढलेल्या सोडियमयुक्त पदार्थाच्या दुष्परिणामांनादेखील आळा बसतो. मूत्राशयाचे कार्य सुधारते आणि मूत्रपिंडाच्या आजारांपासून तुम्ही दूर राहता.
२. काकडीदेखील डिटॉक्सिकेशनच्या प्रक्रियेत मदत करते. काकडीमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी असते. याचा उन्हाळ्यात उपयोग होतो. शिवाय यात अगदी कमी कॅलरीज असतात. अर्धा कप काकडीचे काप खाल्ले तर केवळ आठ कॅलरीज पोटात जातात.
३. लिंबू हे सर्वात उपयुक्त फळ आहे. आपल्या लिव्हरसाठी अगदी चांगले. युरिक अ‍ॅसिड आणि इतर विषारी द्रव्ये लिंबात विरघळतात. लिंबू शरीरात गेल्यावर अल्कलाइन गुणधर्म दाखवते. त्यामुळे शरीराची पीएच लेव्हल राखण्यास मदत होते.
४. पुदिना ‘नॅचरल कूलंट’ आहे. शरीराला आवश्यक थंडावा देण्याचे, पचनक्रिया सुधारण्याचे, पोट साफ करण्याचे हे नैसर्गिक औषधच आहे.
५. ग्रीन टीमध्ये भरपूर अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट्स असतात. ग्रीन टीच्याबरोबरीने पाणी पिणे आवश्यक आहे.
(ओरिफ्लेमच्या न्यूट्रिशन एक्स्पर्ट सोनिया नारंग यांनी दिलेल्या माहितीवर आधारित)
डिटॉक्स फूडसोबत करायचे इतर उपाय
* दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून ते प्यावे.
* या दिवसात पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. पुरुषांनी दिवसाला किमान ३ लिटर आणि स्त्रियांनी किमान २.२ लीटर पाणी पिणे आवश्यक आहे.
* डिटॉक्स फूडच्या स्मूदी करून प्यायलात तर बेस्ट समर कूलर ठरेल (उदाहरणार्थ मेलन स्मूदी – कलिंगड किंवा खरबुजाचे तुकडे करून, बिया काढून टाकाव्यात. एका ब्लेंडरमध्ये सोललेल्या कलिंगडाच्या फोडी, एक सेंटिमीटर आल्याचे तुकडे आणि बर्फाचे चार खडे घालून ब्लेंड करावे.).
* या सीझनमध्ये मिळणाऱ्या ताज्या भाज्या उकडून किंवा परतून खाव्यात. त्यामुळे जीवनसत्त्वे जाणार नाहीत.
* डिटॉक्सिफिकेशनसाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. लहान मुलांप्रमाणे गाढ झोप लागली तर, शरीरातील प्रत्येत पेशीला पुरेसा ऑक्सिजन पुरवला जातो. यामुळे प्रत्येक अवयव व्यवस्थित कार्यरत राहतो. त्वचा आणि डोळे चांगले राहतात.