शास्रीय गायनातील ताना ज्या नजाकतीने या गळ्यातून उतरतात, त्याच हळुवारपणे सुगमसंगीतील भाव त्यांच्या स्वरांतून उमटतात. एखाद्या गाजलेल्या मैफलीतले त्यांचे स्वर कानी रुंजी घालत असताना त्याच स्वरातील टीव्ही मालिकेच्या शीर्षक गीत आपले लक्ष वेधून घेते. त्या स्वरांमागचा चेहराही आपल्या परिचयाचा असतो..तो असतो देवकी पंडित यांचा. शास्त्रीय गायनातून जाणकार संगीत रसिकांची मान्यता मिळवतानाच चित्रपट, मालिकांच्या पाश्र्वगायनातून सामान्य संगीत प्रेमींच्यादेखील गळ्यातला ताईत होण्याचं कौशल्य देवती पंडित यांना साधलं आहे. या मधाळ स्वरांच्या सम्राज्ञीबरोबर गप्पांची मैफल रंगवण्याची संधी व्हिवा लाउंजच्या निमित्ताने येत्या मंगळवारी मिळणार आहे.
हिंदी- मराठी चित्रपटांसाठी पाश्र्वगायन करताना त्यांना राज्य शासनाचे आणि राष्ट्रीय पातळीवरचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
वयाच्या नवव्या वर्षांपासून त्यांनी स्वरमंचावर गायला सुरुवात केली. गेल्या तीन दशकांपासून संगीतक्षेत्रात वेगवेगळ्या रुपात, वेगवेगळ्या प्रयोगांमधून देवकीताईंची स्वरप्रतिभा रसिकांसमोर येत आहे. शास्त्रीय गायनाची त्यांची ‘बंदिश’ जेवढी गाजली तेवढीच दाद हरिहरनबरोबरच्या ‘हलकासा नशा’ला मिळाली. अशा हरहुन्नरी, अभ्यासू गायिका मंगळवारी व्हिवा लाउंजच्या माध्यमातून रसिकांशी संवाद साधणार आहे.
कधी : मंगळवारी, २९ सप्टेंबर वेळ : सायंकाळी ६.००
कुठे : स्वा. सावरकर स्मारक सभागृह,
शिवाजी पार्क, दादर (प.), मुंबई.
(प्रवेश विनामूल्य, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.)