चांगला होस्ट किंवा गेस्ट बनण्यासाठीचे डायनिंग एटिकेट शिकवणारे सदर. फ्रेंच पद्धतीच्या जेवणात स्टार्टर्सना खूप महत्त्व असतं. पाश्चात्त्य पद्धतीच्या जेवणाच्या सुरुवातीला दिले जाणारे हे अ‍ॅपेटायझर्स कसे असले पाहिजेत, ते कसे सव्‍‌र्ह केले जातात आणि त्याचं महत्त्व काय?

पाश्चात्त्य पद्धतीत जेवणाच्या सुरुवातीस ‘अ‍ॅपेटायझर्स’ सव्‍‌र्ह केले जातात. हे पदार्थ थोडे खारट, थोडेसे आंबट आणि कधी कधी तर विशिष्ट प्रकारचे असतात. या पदार्थाचं मुख्य काम भूक चाळवणं हे असतं. कारण नंतर येणाऱ्या अन्य कोस्रेससाठी अजून भूक नको का तयार करायला?
सॅलड आणि अन्य पिकल्ड पदर्थाचा – म्हणजे भाज्यांपासून काही मांसाहारी पदार्थापर्यंत- यात समावेश असतो. आता आपल्याला पिकल्ड म्हटल्याबरोबर लोणचं डोळ्यापुढे येतं. पण पाश्चात्त्य पद्धतीत पिकल्ड म्हणजे विनेगर किंवा मिठाच्या पाण्यात मुरवलेले पदार्थ. हे पदार्थ अगदी छोटय़ा प्रमाणात खाल्ले जातात.
16
फ्रेंच जेवणात स्टार्टर्सना खूप महत्त्व असतं. त्यांना फ्रेंचमध्ये hors d’ oeuvres (ऑदव) म्हणतात. hors d’ oeuvres चा अर्थ जेवणाच्या संदर्भात द्यायचा झाला तर असं म्हणता येईल की, जे मुख्य जेवणाच्या बाहेर आहेत असे छोटे पदार्थ. त्यातल्या त्यात, क्लासिकल hors d’ oeuvres ना तर खूपच उच्च मानलं जातं. यात दुर्मीळ किंवा पिकवायला/बनवायला कठीण असलेल्या पदार्थाचा समवेश असतो. जास्त करून मांसाहारी – कावियार (caviar)) म्हणजे स्टर्जन जातीच्या माशाची गाभोळी (अंडी), ऑयस्टर (oysters) म्हणजे एक प्रकारची मोठी कालवं, स्मोक्ड सामन (smoked salmon -हो, ‘ल’ चा उच्चार होत नाही!) म्हणजे सामन जातीचा धूर दिलेला मासा इत्यादी. हे ऑदव आपल्या पाहुण्यांना सव्‍‌र्ह करणं म्हणजे आतिथ्याचा परमोच्च गाठण्यासारखं आहे! पण आज कावियारसारख्या पदार्थावर अति मासेमारीमुळे बंदी घालण्यात आली आहे. शाकाहारी लोकांसाठी ‘आर्टीचोक’ किंवा ‘अस्परेगस’सारख्या भाज्या विशिष्ट सॉसबरोबर दिल्या जातात. हे पदार्थ खायला त्यांचीच अशी विशिष्ट कटलरी आणि सíव्हस डिशेसपण असतात.
15
आपल्याकडे स्टार्टर्स म्हणून जे काही पदार्थ सव्‍‌र्ह होतात, ते म्हणजे स्टार्टर्सचं मुख्य काम करतच नाही. बरेचदा ‘कॉकटेल स्नॅक्स’च स्टार्टर्स म्हणून दिले जातात. हे बहुधा तळळेले, पोट भरून टाकणारे पदार्थ असतात. त्यांनी कसली भूक चाळवली जाणार आहे? जास्त खाल्ले तर भूक मिटूनच जाते! तसंही आपल्या पद्धतीचं जेवण असताना खरंतर स्टार्टर्सची गरजच नसते. बाहेर चांगल्या ठिकाणी खाताना स्टार्टर्स, सूपनी सुरुवात करून आपली गाडी नान/ रोटी आणि पुलाववर येतेच येते! आधीच्याच दोन पदार्थानी पोट भरलं असल्यामुळे मुख्य पदार्थ ‘साइड रोल’मध्ये गडगडत जातात! असो! शेवटी प्रत्येकाने आपल्या आवडीने ठरवून भोजनाचा आनंद घेणं जास्त महत्त्वाचं आहे; पण खरं कसं असतं हे जाणून घेणंही कधीही चांगलंच!
कावियार (डावीकडे)आणि स्मोक्ड सामन हे फ्रेंच क्लासिक स्टार्टर्समध्ये अग्रणी असतात.