ऑफिसमध्ये साजरी केली जाणारी दिवाळी हा काही नवा ट्रेण्ड नाही. पण हल्लीच्या मिश्र संस्कृतीच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये दिवाळी साजरी करण्याची पद्धत मात्र बदलते आहे.
शाळेत असतानाची दिवाळीची सुट्टी हा नॉस्टेल्जिक होण्याचा विषय असतो अनेकांसाठी. लहानपणी नातेवाईक, घरची मंडळी आणि सोसायटीतल्या मित्रांबरोबर केलेली धमाल आठवत असते. फटाके, किल्लादेखील आठवतो. कॉलेजमध्ये गेल्यावर दिवाळी थोडी बदलते. म्हणजे नातेवाइकांबरोबरच मित्रमंडळींचे प्लॅन्स वेगळे होतात. दिवाळी पहाटेच्या निमित्ताने किंवा नुसताच दिवाळी कट्टय़ावर गप्पांचा फड जमतो. पण एकदा नोकरीला लागल्यावर मात्र हे सगळंच बदलतं. दिवाळीतला एखादा दिवस मिळाली तर सुट्टी मिळते. सुट्टी नसण्याची कॉर्पोरेट जगताची कारणं देखील  तेवढीच  खरी  आहेत.  पण ‘जैसा  दिखता  है,  वैसा  होता  नही’  अशी  थोडीफार  स्थिती  तिकडे  दिसते. ऑफिसमध्येही दिवाळी साजरी होते आणि तितकीच धूमधडाक्यात साजरी होते. मुंबईत काम करणाऱ्या  प्राजक्ता  खानविलकर  हिला  विचारले  असता  ती  म्हणाली,  ‘दिवाळीत  मिळणारा  बोनस  हीच  आमची  खरी  दिवाळी’.
ऑफिसमध्ये  साजरी  केली  जाणारी  दिवाळी  हा  तसा  काही  नवीन  ट्रेंड  नाही.  ही  पद्धत  तशी  पूर्वापार  चालत  आहे.  फरक  फक्त  एवढाच  की,  ही  दिवाळी  ऑफिसमध्ये  साजरी  करण्याच्या  पद्धती  बदलल्या  आहेत.  पूर्वी  ऑफिसमध्ये  लक्ष्मीपूजन  केलं  जात  असे.  त्यामध्ये  महत्त्वाच्या  डॉक्युमेंट्सची,  तिजोरीची  पूजा  केली  जात  असे. परंतु  बदलत्या  काळानुसार  या  सेलिब्रेशनमध्ये  थोडे  बदल  येऊ  लागले  आहेत.  आपल्या  कलीग्सना  खूश  ठेवण्यासाठी  त्यांच्यातला  कामाचा  उत्साह  वाढवण्यासाठी  दिवाळीच्या  चार-पाच  दिवसांत  वेगवेगळे  कार्यक्रम  आखले  जातात.
दिवाळीमध्ये घरात रोषणाईच्या  उधळणीने  होणारी  नव्याची सुरुवात सगळ्यांनाच हवीशी वाटते. त्यानिमित्तानं जगण्यात एक फ्रेशनेस येतो. कामाच्या  ओझ्याखाली  सतत  झुकलेल्या  नोकरदारांनाही दिवाळीसारख्या निमित्तातून स्ट्रेस-फ्री  करणं  ही  कॉर्पोरेट्सची  खूप  मोठी  जबाबदारी  असते. म्हणूनच कॉर्पोरेट ऑफिसमध्येही दिवाळीनिमित्त काही उपक्रम आवर्जून राबवले जातात. दिवाळीच्या  दिवसात  ऑफिसमधला  मूड  एकदम  ‘पार्टी  ऑन  द  फ्लोअर’ टाइप्स असतो. हल्ली कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कॉस्मोपॉलिटन वातावरण असतं. देशाच्या अनेक भागांतून आलेले लोक एकत्र काम करत असतात. त्यांची संस्कृती भिन्न असते, सेलिब्रेशन करण्याची पद्धत निराळी असते. पण सण मात्र एक असतो. अशा मिश्र संस्कृतींचं वेगळं आणि एकत्रित सेलिब्रेशन ऑफिसमध्ये होतं.  हैदराबादच्या  इन्फोसिसमध्ये  काम  करणाऱ्या  शार्दुलने  त्यांच्या  ऑफिसमधल्या  दिवाळीचं वर्णन  केलं.  तो  म्हणाला, ‘आमच्या  ऑफिसमध्ये  रांगोळी  स्पर्धा  असते.  चार-पाच  दिवसांतल्या  एका  दिवशी  ट्रॅडिशनल  डे  असतो.  ऑफिसमध्ये  क्युबीकल  डेकोरेशन  केले  जातात.’ दिवाळीच्या निमित्तानं मग एचआर डिपार्टमेंटकडून स्पर्धाही घेतल्या जातात. बेस्ट ड्रेस्ड पर्सनसाठी, क्युबिकल सुंदर सजवण्यासाठी, रांगोळी काढण्यासाठी बक्षिसं दिली जातात. नेहमीच्या कामापेक्षा काहीतरी वेगळं आणि थोडं आर्टिस्टिक समाधान देणारं हे काम असतं.
दिवाळीच्या  दिवसात  ऑफिसमध्ये  कुटुंबीयांना  आमंत्रण  दिलं जातं.  त्यानंतर  फराळाची  देव-घेव  होते.  फराळाबरोबर  इतरही  पदार्थाची  इथे  रेलचेल  असते.  गिफ्ट्स,  गिफ्ट्स  व्हाऊचर्स  दिले  जातात.  ऑफिस  आणि  तिथले  डेस्क  रंगीबेरंगी  ओढण्या,  कंदील,  लाइटिंग,  पणत्या,  देखावे  यांनी  सजविले  जातात.  रांगोळी  कॉम्पिटीशन्स,  डान्स  कॉम्पिटीशन्स  असतात.  सगळेच  छान  नटूनथटून  आलेले  असतात. वेगवेगळे  गेम्स  आयोजित  करून ग्रुप बाँडिंगचे  सेशन्स  खेळीमेळीने  घेतले  जातात.  असे  गेम्स  खेळत  असताना  तिथे  ना  कोणी  बॉस  असतो  ना  कोणी नोकर. थोडा वेळ गाणी,  डान्स,  खाना-पिना  असं धमाल  वातावरण  करून  ‘कुछ  मीठा  हो  जाए’  म्हणत  मस्त  सेलिब्रेशन  केलं जातं  आणि  दिवाळीचा  आनंद  घेतला  जातो.