वयात आलेल्या तमाम मुलांसाठी एक सूचना वजा सल्ला – ’टॉल, डार्क, हँडसम’ असणं काफी है असं वाटतंय?.. किंवा आपले ‘डोले-शोले’, आणि बिनधास्त अ‍ॅटिटय़ूड मुलींना आकर्षून घेईल असं तुम्हाला वाटतंय का? थोडक्यात, आपल्या  ‘कूल डूड’ इमेजच्या जोरावर आपण मुलींचे ‘प्रिन्स चार्मिग’ बनू शकतो, असं वाटत असेल तर जरा थांबा. हल्लीच्या मुलींच्या मनातले ‘ड्रीम बॉय’ थोडे वेगळे आहेत.
‘त्याची’ एक झलक पाहायला रात्री नेमाने तरुणी टीव्हीसमोर बसू लागल्या, त्याचे एक खटय़ाळ हसू आणि बघणारीचा कलिजा खल्लास होणार हे नक्की. व्यवस्थित सेट केलेले केस, काटेकोरपणे वाढवलेली दाढी, सूट असो किंवा साधा पण नेटका शर्ट/ टी-शर्ट आणि डेनिम कोणताही लूक तितक्याच सहजतेने कॅरी करण्याचं कौशल्य, त्याच्या बोलण्यातला नम्रपणा आणि उर्दू ढब.. हाय अल्ला!  हे वर्णन ऐकून काही मुलींच्या डोळ्यात नक्कीच चमक आली असेल. कारण हे वर्णन आहे, सध्या कित्येक तरुणींच्या मनावर अनभिषिक्त राज्य करणाऱ्या फवाद खान याचं. पाकिस्तानमधून आलेल्या या ‘खूबसूरत’ अभिनेत्याने पदार्पणातच कित्येक तरुणींना आपल्या ‘मदमस्त लुक्स’नी घायाळ केलं आहे. त्याच्या नावाने फेसबुकवर फॅनपेज सुरू झालीत, त्याच्यावर आम्ही का फिदा आहोत, याची कारणं देण्याची शर्यत सध्या तरुणींमध्ये सुरू आहे.
फवाद खानची इमेज ‘कूल डूड’ इमेजपेक्षा अगदी वेगळी. बोलण्यात अदब, मार्दव, जबाबदारीची जाणीव असे मॅच्युअर हिरो हल्ली मुलींना आवडायला लागले आहेत. आजच्या पिढीतल्या अशा काही हिरोजनी तरुणींच्या स्वप्नांमध्ये येणाऱ्या राजकुमाराच्या पारंपरिक चित्राला छेद दिला आहे. मग तो फवाद असो, रणबीर कपूर किंवा शाहीद कपूर असो. मराठीमध्ये पाहायला गेलं तर शशांक केतकर, उमेश कामत किंवा ललित प्रभाकर, या सर्वानी मिळून तरुणींना एक नव्या स्वरूपातील राजकुमारांशी ओळख करून दिली आहे. स्वप्नातील हा राजकुमार आपला नवरा किंवा बॉयफ्रेंड असलाच पाहिजे अशी मुलींची अपेक्षा नसते, पण रात्री ज्याची स्वप्नं पडतील असा तो नक्कीच असला पाहिजे. आपला बॉयफ्रेंड अशाच स्वभावाचा असावा, असं या मुलींना वाटतं.
हल्लीच्या ‘ड्रीम बॉय’ची पर्सनॅलिटी लाऊड नाही. उलट त्यांचं ‘जमिनीवर’ असणंच हल्लीच्या मुलींना भावतंय. नव्या जमान्याचे हे राजकुमार घोडय़ावरून येत नाहीत, त्यांच्याकडे शाही पद नसेल, पण शाही अदब मात्र नक्की असते. राजकुमार असल्याची घमेंड त्यांच्यात नसते पण ती शान मात्र असते. स्वप्नातले हे राजकुमार तुम्हाला स्वर्गाची सफर कदाचित करून आणू शकणार नाहीत, पण तुमच्या जगाला स्वर्ग बनवण्याची त्यांची तयारी असते. बरं.. या राजकुमारावर तुम्ही फिदा होता ते त्याच्या देखण्या रुपावरच असं नाही तर त्याच्या जबाबदार वागण्यावर, त्याच्या नाती जपण्यावर. त्यामुळे तुमच्या स्वप्नातल्या त्याच्याबरोबरच्या जगात तुम्हा दोघांसोबत, त्याचे आणि तुमचे आईवडील, मित्रमैत्रिणी यांचा समावेश झालेला असतो. तो तुमच्या मित्रपरिवारात असा मिसळून जातो, जणू दुधात साखर. असं असूनही त्या सर्वापेक्षा तुम्ही त्याच्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहात, हे तो छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून दाखवून जातो. या तरुणींच्या स्वप्नातील राजकुमाराचं प्रतिनिधित्व फवाद खानसारखे राजकुमार करतात.
या राजकुमारांच्या शरीरयष्टीपेक्षा त्यांचं वागणं, बोलणं तरुणींना जास्त भावतं. मुंबईची तेजल फवादबद्दल सांगते, ‘मला त्याचं व्यक्तिमत्त्व आवडतं. पण महत्त्वाचं म्हणजे त्याच्या आवाजाची मी फॅन आहे. त्याच्या आवाजमध्ये एक विशिष्ट ढब आहे. मार्दव आहे. तो बोलताना प्रत्येकाला आपलंसं करतो. त्याच्या आवाजातला मृदूपणा मला जास्त भावतो.’       
एक काळ होता जेव्हा तरुणी हिरोंच्या बॉडीवर फिदा होत्या. पण आता मात्र मुलींसाठी ही दिखाऊ पर्सनॅलिटी क्षणभंगुर असते. तो कसा राहतो, त्याच्या नायिकेशी कसा वागतो, हे आमच्यासाठी महत्त्वाचं असल्याचं तरुणी सांगतात. स्वभावाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, अभिनेत्री सोनम कपूरच्या म्हणण्याप्रमाणे रणबीर कपूरच्या लूक्समध्ये कदाचित एका गुडी गुडी बॉयफ्रेंडचा चार्म नसेल, पण त्याच्या स्वभावामुळे तो कित्येकींच्या मनावर राज्य करतोय.     उर्वरित पान २ वर
मुंबईची अम्रिता बाफनाही रणबीरबाबत हेच सांगते, ‘त्याच्या बोलण्यात विनम्रता दिसून येते. तो डाऊन टू अर्थ आहे. त्याच्या वागण्यात बॉईश चार्म आहे, तो मला आकर्षित करतो. आईवरची त्याची माया मला भावते.’
मराठीमध्येसुद्धा अशा चार्मिग प्रिन्सची कमतरता नाही. सध्या तरुणींचा लाडका बनलेला ‘श्री’ म्हणजेच शशांक केतकर या स्पर्धेत सर्वात आघाडीवर आहे. ‘त्याच्या स्वभावामधला विनम्रपणा मला भावतो. तो साकारत असलेली भूमिका असो किंवा त्याची मुलाखत, प्रत्येक वेळी तो समोरच्याशी बोलताना तितकाच विनम्र असतो. माझ्या स्वप्नातील राजकुमाराच्या संकल्पनेला तो साजेसा आहे’, स्वप्नाली सांगते. विशेष म्हणजे या राजकुमारांमधल्या फवाद, उमेश, शशांकचं लग्न झालेलं आहे. रणबीरचं स्टेटसही कतरिनाशी ‘कमिटेड’ आहे, पण असं असलं तरी त्यांच्यावरील तरुणींची निष्ठा काही कमी होत नाही. उलटपक्षी त्यांची पत्नी किंवा गर्लफ्रेंडसाठी असलेली निष्ठा त्यांना जास्त आकर्षित करते. फवादच्या बाबतीतच म्हणायचं झालं, तर तो ज्या आत्मीयतेने त्याच्या बायकोबद्दल बोलतो, अध्र्या मुली त्यावरच घायाळ होतात. तृषिता गाडगीळ सांगते, ‘उमेशच्या अभिनयाबाबत मी त्याची चाहती आहेच, पण तो ज्या प्रकारे प्रियाशी वागतो, त्याने तिला तिचे निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य दिलं आहे, त्याचे हेच गुण मला जास्त भावतात.’
थोडक्यात सांगायचं तर, आजची तरुणी आयडियल बॉयफ्रेंड किंवा स्वप्नातील राजकुमाराबाबत बोलतानासुद्धा त्याच्यातील जबाबदारपणा, विनम्रता, कोणालाही जिंकून घ्यायची वृत्ती, खटय़ाळपणा याकडे जास्त लक्ष देते. त्यामुळे आतापर्यंत आपण फक्त ‘कूल डूड’ बनून कॉलेजचे प्रिन्स चार्म बनू शकतो, अशी स्वप्नं पाहणाऱ्या मुलांसाठी फवादसारख्या हिरोंची लोकप्रियता नक्कीच वेकअप कॉल ठरणारी आहे.