बाप्पाला सजवायला आपण सारे फॅशन डिझायनरच झालो आहोत. या फॅशनमधली यंदाची एक चांगली गोष्ट म्हणजे इको फ्रेंडली गणपती करण्याकडे तरुणाईचा कल दिसतो आहे. त्यामुळे कागदी मखर सजावटीसाठी अग्रस्थानी आहे. याशिवाय ओरिगामी आणि पेपर क्विलिंगचा सजावटीसाठी वापर हा बाप्पाच्या फॅशनमधील लेटेस्ट ट्रेण्ड आहे.

मूर्तिकारांनीही बाप्पाला मॉडर्न रूप देण्यात कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही; छोटा भीमपासून जय मल्हापर्यंतचा बाप्पाचा हा प्रवास ‘इको फ्रेंडली’ मखरात विराजमान होऊन थांबणार आहे. यंदा बाप्पाच्या फॅशनमध्ये कोणते ट्रेण्ड दिसताहेत त्याचा हा आढावा..
सजावटीच्या सामानाची दुकानं, दागिन्यांची दुकानं सारं काही फुलून गेलंय. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपतीसाठी वेगवेगळ्या प्रकारची वस्त्रं, आरास सज्ज आहे. यंदा इको फ्रेंडली मखर हा ट्रेण्ड आहे. नावीन्य म्हणून प्लास्टिकच्या फुलांची आरास अनेकांनी केल्याचं दिसतंय. विविध आकारांत नवनवीन पॅटर्न्‍समध्ये फुलांची रचना करून मखर सजवता येते. सजावटीसाठी यंदा नव्याने समोर आलेला आणखी एक प्रकार म्हणजे पेपर क्विलिंग. क्विलिंगपासून बनवलेल्या सुंदर कलाकृतींचा वापर करण्याकडे यंदा अनेकांचा कल आहे. वजनाने हलक्या पण तितक्याच सुंदर अशा या क्विलिंगचे लहान लहान गणपती तर ऑनलाइन बाजारातही उपलब्ध आहेत. काही कलाकार तरुण मंडळी अशी सजावट आणि गणेश प्रतिमा तयार करून ओएलएक्स, फेसबुकवरून विक्री करत आहेत. पेपर क्विलिंगच्या सजावटीमध्ये रांगोळी, फुलं, भिंतीवरची सजावट अशा सगळ्याचा गणपती आहे. ज्यांच्याकडे दीड दिवसांचा गणपती आहे ती मंडळी खऱ्या फुलांची आरास, केळीच्या खोडापासून तयार केलेल्या मखरासह सज्ज झाली आहेत. आणखी एक चर्चेत असलेला ट्रेंड म्हणजे वारली पेंटिंग. ही आदिवासी कलाकृती आणि मध्ये बाप्पा असं काहीसं यंदा पाहायला मिळणार आहे.
ही झाली मखराची बाजू. बाजारात गौरी-गणपतीच्या अलंकारांतही यंदा वैविध्य दिसतंय. डिझायनर भिकबाळीपासून ते इमिटेशन ज्वेलरीपर्यंतचे अनेक प्रकारचे दागिने खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी होत आहे. यासोबतच पुणेरी फेटा, खंडेरायाचा फेटा, हिऱ्यांचे पारंपरिक मुकुट बाप्पांसाठी आले आहेत. गौरींच्या सजावटीलाही बहर आला आहे. वेगवेगळ्या प्रकारची आभूषणे, तोडे, कर्णफुले या साऱ्या पारंपरिक दागिन्यांना यंदा डिझायनर टच देण्यात येत आहे.
सायली पाटील – viva.loksatta@gmail.com

वसईच्या स्नेहा विद्वांस आणि पूर्वा फडके आपल्या मैत्रिणींच्या मदतीने ‘ओरिगामी’चे तुकडे जोडून मखर बनवत आहेत. इंटरनेटच्या मदतीने डू इट युअरसेल्फचा फंडा वापरत त्या गणपतीच्या मखराला थ्री डी लुक देत कमळाच्या फुलाची बांधणी केली आहे.