हॉटेलात एकटंच बसून आपल्या आवडत्या डिशवर कधी ताव मारलाय? ‘बघायचाच आहे’ कॅटेगरीतला सिनेमा एकटीनं जाऊन बघितलाय? मूड आला म्हणून एकटंच समुद्रावर फिरायला गेलायत? अकेले अकेले कहाँ जा रहे हो.. या प्रश्नानं भरलेल्या नजरा नेहमीच एकटं भटकणारीच्या वाटय़ाला येतात. एकटीला जायला ऑकवर्ड वाटतं, भीती वाटते, लोक काय म्हणतील असा प्रश्नही सतावतो. पण असं एकटं एन्जॉय करणाऱ्या अनेक मैत्रिणी सध्या दिसताहेत. त्या म्हणतात ‘अकेले अकेले’चे अनुभव खूप काही देऊन जातात. तुम्हीही हे जरूर करून बघा.. मजा येते असं एकटं एन्जॉय करायला.
‘..ऑर्डर के लिये बाद में आऊँ? और कोई आनेवाला है?’ एकटय़ा मुलीला हॉटेलात पाहून वेटरनं ऑर्डर घेण्यापूर्वी हमखास विचारलेला हा प्रश्न. हॉटेलात एकटीच बसून समोरच्या फेवरेट डिशवर यथेच्छ ताव मारत असताना एक गोष्ट जाणवत असते, ती म्हणजे आजूबाजूच्या टेबलवर बसलेल्यांपकी काही जण आपल्या पुढय़ात काय वाढलंय हे पाहण्यापेक्षा आपल्याकडे अधूनमधून कटाक्ष टाकत असतात. दार ढकलून आत येणारा प्रत्येक जण येऊन आता हिच्याच टेबलवर जाऊन बसणार का, या उत्सुकतेने दारातून आलेली प्रत्येक व्यक्ती दुसरीकडे स्थानपन्न होईपर्यंत तिच्याकडे पाहत राहतात. असं निरीक्षण करणाऱ्यांची गंमतच वाटते आणि आपण वेगळं काही केलं असं उगाचच वाटून जातं.
vv30मनात आलेली एक छोटीशी इच्छा किंवा आवडीची गोष्ट कोणाची वाट न पाहता, कोणाला सोबतीला न घेता एकटीने पूर्ण केली आणि त्याचा आनंद लुटला.. एकटं असण्याची ‘मज्जा’ अनुभवलेली असते इतकंच! यात असं जगावेगळं काही नाहीय ना! नाटकाला जाणं, सिनेमा पाहणं, चौपाटीवर फिरणं, शॉिपग करणं, हॉटेलात जाणं यात काही फार वेगळं नाही. आणि एकटंच आलोय किंवा सोबत कुणीच नाही असा संकोच वाटून घेण्यापेक्षा तो एकटीचा अनुभव एकदा तरी अनुभवण्यासारखा आहे. हल्ली मुली या अकेले अकेले..च्या नजरांकडे फार लक्ष न देता एकटं एन्जॉय करू लागल्यात.
असाच अनुभव घेणारी ऐश्वर्या गंधे म्हणाली की, ‘मला वाटलं एखादी गोष्ट करावी, तर मग मी ती करते. त्यासाठी कंपनीची गरज लागतेच असं नाही. प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न असतो. ‘बालगंधर्व’ सिनेमा मी एकटीने जाऊन पहिला आणि मी तो खूप एन्जॉय केला.’ रात्री एकटीच कशी जाणार असं म्हणून सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो खरा, पण मग सकाळचा किंवा दुपारचा सिनेमाचा शो चांगल्या थिएटरमध्ये जाऊन नक्कीच बघू शकतो. मत्रिणींना वेळ नाही, मला आवडतात त्या प्रकारचे सिनेमे त्यांना बघायला आवडत नाहीत किंवा त्यांना त्यात इंटरेस्ट नाही म्हणून आपण आपलं मन मारायची किंवा आपल्या आवडीला मुरड घालायची काय आवश्यकता आहे? त्यापेक्षा थोडासा वेगळा विचार करून स्वत:च स्वत:ला ट्रीट द्यायला काय हरकत आहे?
अकेले अकेले फिरणारी आणखी एक मैत्रीण विनिता पाटणकर म्हणाली, ‘खांद्यावर बॅग आणि पायात शूज चढवले की मी कुठेही फिरायला मोकळी असते. मग सोबत हवीच असं नाही. सीएसटी, फोर्ट आणि दक्षिण मुंबईच्या त्या बाजूला फिरायला मला जाम आवडतं. एकटं फिरताना शांततेत कोणाच्या बडबडीशिवाय काही गोष्टी न्याहाळता येतात. काही नव्या जागा सापडतात आणि खूप आनंद मिळतो.’
कांचन मोरे ही ठाण्याला राहणारी मैत्रीण म्हणते, ‘मी बऱ्याचदा हॉटेलमध्ये आणि मूव्हीलादेखील एकटी गेलेय. सुरुवातीला विशेषत पहिल्यांदा एकटीनं सिनेमा पाहिला तेव्हा थोडी मनात धाकधूक होती. लोकं काय म्हणतील वगैरे.. पण नंतर लक्षात आलं, काही फरक पडत नाही. एकटं फिरल्यानं माझा कॉन्फिडन्स वाढला. आय वाँट टू एंजॉय हा एकच फंडा डोक्यात ठेवून मी जाते. स्वतच्या सुरक्षेची काळजी घेऊन शक्यतो गर्दीच्या वेळेला, सुरक्षित आणि परिचित ठिकाणीच एकटी जाते.’
हॉटेलात, नाटक-सिनेमाला एकटं जाण्यात काहीच वावगं नसतं, पण त्याचं होतं असं की, मुलगी आहे, मग तिने सोबत कोणाला तरी घेऊन जावं, असा इतरांचा समज असतो. लहानपणापासून फारशी सवयच नसते मुलींना असं एकटं बाहेर जाण्याची, एकटं एन्जॉय करण्याची. असं कसं एकटं जायचं? असा बागुलबुवा निष्कारण कुरवाळत बसतो आपण. मुलींना असलेली भीती असेल किंवा एकटीनं गेलं तर बोअर होईल, नाही तर आपण स्वत:चीच कंपनी एन्जॉय करू का, असे प्रश्न मनात रुंजी घालत असतील कदाचित. पण एकटं असल्यामुळे कुणाच्या बरोबर असण्याचं दडपण येत नाही. काहीसं स्वच्छंदीपणे फिरता येतं. कंटाळा आला, परत येता येतं. कुणी काही बोलणारं नसतंच बरोबर. आपल्या वागण्यावर कोणाचं बंधन नाही की कोणी जज्ज करणारं नाही. आपल्या आवडीनुसार आणि कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय सर्व काही करता येत. आपली अशी स्पेस मिळण्याची तीच तर सुरुवात असते.
दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग संपला, असं आपल्या संतांनी सांगितलेलंच आहे. त्यामुळे एन्जॉय अलोन. पण याचा अर्थ एकलकोंडे व्हा असा मुळीच नाही. तुमच्या मनात अमुक करायचं राहून गेलं. कारण सोबत कुणी नव्हतं किंवा किती वेळ वाट बघायची हा वैताग, अडून राहिल्याची भावना यापेक्षा ‘मी माझाच एकांत एन्जॉय केला’ ही भावना एक वेगळं स्पिरीट देऊन जाईल. कोण जाणे एकांताच्या सफरीत आत्मशोधाचा नवीन मार्ग सापडेल आणि स्वत:चाच नवीन पलू उलगडून तुमच्यात दडलेली एक नवीन व्यक्ती समोर येईल.

 vv32 मी बऱ्याचदा हॉटेलमध्ये आणि मूव्हीलादेखील एकटी गेलेय. सुरुवातीला विशेषत पहिल्यांदा एकटीनं सिनेमा पाहिला तेव्हा थोडी मनात धाकधूक होती. लोकं काय म्हणतील वगैरे.. पण नंतर लक्षात आलं, काही फरक पडत नाही. एकटं फिरल्यानं माझा कॉन्फिडन्स वाढला. आय वाँट टू एंजॉय हा एकच फंडा डोक्यात ठेवून मी जाते.
कांचन मोरे

एकटीनं केलेली भटकंती असो की ट्रेकिंग, शॉपिंग असो की मूव्ही.. असे ‘अकेले अकेले’चे अनुभव आमच्याशी शेअर करा. आमच्या viva.loksatta@gmail.com या पत्त्यावर तुमच्या फोटो आणि संपर्कासह जरूर पाठवा.