डिझायनर ब्लाऊजचा सध्या ट्रेण्ड आहे. सेलिब्रिटीदेखील हल्ली साडीपेक्षाही ब्लाऊजबाबत चोखंदळ असतात. कशिदाकारी, कुंदन वर्क, मिरर वर्क केलेली ब्लाऊज बाजारात दिसू लागली आहेत. पण त्याच त्या पद्धतीने शिवलेल्या ब्लाऊजपेक्षा डिझाइन्समध्ये शोभतील असे थोडे बदल केले तर साडीतही एकदम वेगळा लुक मिळू शकेल.
एरवी मुलगी कितीही आधुनिक पेहरावात असली तरी दिवाळीसारख्या सणांच्या दिवशी मात्र आवर्जून पारंपरिक वेशात सजायची सगळ्यांनाच हौस असते. म्हणूनच नेहमी जीन्समध्ये वावरणाऱ्या मुली दिवाळीसारख्या सणांना ठेवणीतल्या एथनिक वेअरमध्ये दिसतात. दिवाळीच्या शॉपिंगमध्ये साडी खरेदी झालेली नसेल तर घरातल्याच कुणाची- म्हणजे आईची किंवा ताईची साडी नेसावी लागते. सध्या डिझायनर साडय़ांचा ट्रेण्ड आहे. साडी कशी आहे, डिझायनर आहे की साधी आहे, जरीची आहे की कुंदन वर्कची आहे, बॉर्डरची आहे की जर्दोसीची आहे या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं आहे ती तुम्ही कशी कॅरी करताय ते.. साडी नेसताय कशी हे आजकाल महत्त्वाचं आहे. त्यावर साजेसा ब्लाऊज आहे का, याकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणजे साडी नेहमीची असली किंवा कॉमन असली तरीही जरा वेगळ्या पद्धतीनं नेसली की ती अजून आकर्षक दिसते. डिझायनर साडीवर तर डिझायनर ब्लाऊज हवाच. अनेकदा ब्लाऊजमुळेच साडीचं सौंदर्य खुलून दिसतं.
साडी नेसण्यामध्ये जसे वेगवेगळे प्रकार सध्या दिसताहेत तसे ब्लाऊजच्या फॅशनमध्येही दिसत vv25आहेत. भारतीय सेलिब्रिटीज परदेशी व्यासपीठावर जाताना हमखास साडीमध्ये दिसतात. त्या वेळी त्यांच्या ब्लाऊजच्या डिझाइनबद्दल त्या अधिक चोखंदळ असतात. विद्या बालन, सोनम कपूर यांनी गेल्या वर्षी कान्स महोत्सवाच्या वेळी मिरवलेली ब्लाऊजची फॅशन चर्चेत होती. या वेळच्या फॅशन शोमध्ये अनेक डिझायनर्सनी साडय़ांची कलेक्शन्स सादर केली, त्यामध्येही अशी डिझायनर ब्लाऊज वापरली होती. या वर्षी लॅक्मे फॅशन शोमध्ये सादर झालेल्या फेस्टिव्ह वेअर कलेक्शनमध्ये साडय़ांवरचे ब्लाऊज अधिक लक्षवेधी ठरले होते. साडीला उठाव देण्याचं काम ब्लाऊज करतं. पूर्वीसारखं साडीच्या रंगाला मॅचिंग ब्लाऊजपीस आणला आणि ब्लाऊज शिवलं की झालं, असं होत नाही. ब्लाऊजवरसुद्धा हल्ली डिझायनर्स छान काम करून देतात. भरतकाम केलेली, कुंदर, मोती, आरसे यांनी सजलेली ब्लाऊज हल्ली बाजारात रेडिमेडही उपलब्ध असतात. ब्लाऊजला लटकननं सजवण्याचा ट्रेण्ड हल्ली कॉमन झाला आहे. पण या लटकनमध्ये तुम्हाला नक्कीच वैविध्य आणता येईल. मॅचिंग ब्लाऊजपेक्षा कॉन्ट्रास्ट कलर किंवा वेगळं वर्क असलेल्या अर्दी कलरच्या ब्लाऊजची सध्या फॅशन आहे. मिरर वर्क केलेली कलरफुल ब्लाऊज किंवा गोल्डन वर्क असलेली ब्लाऊज कुठल्याही रंगाच्या साडीवर उठून दिसू शकतात. पण निवडताना साडीच्या काठापदराचा आणि साडीवरच्या वर्कचा विचार करायला हवा. थोडा विचार करून, सेलिब्रिटींची फॅशन बघून ब्लाऊजची निवड केलीत तर तुमचा लुक नक्कीच हटके ठरेल.
वैविध्य कशात?
*  ब्लाऊजची उंची थोडी अधिक ठेवून एक वेगळी फॅशन तुम्ही मिरवू शकता.
* ब्लाऊजमध्ये स्टँड कॉलरची फॅशन आता पुन्हा येत आहे, तिचा वापर वेगळा ठरू शकतो.
* बाह्य़ांच्या लांबीमध्ये नेहमीपेक्षा थोडे वेगळे प्रयोग करता येतील.
* ट्रान्स्परंट टेक्स्टाइलमध्ये ब्लाऊज शिवणार असाल तर फुल स्लीव्हजचा पर्याय योग्य ठरेल, सॅटिन किंवा प्युअर सिल्कमध्ये हा प्रयोग करण्यापूर्वी थोडा विचार करा.
* बंद गळा स्टाइल ब्लाऊजही काही फॅशन शोमध्ये यंदा आवर्जून वापरण्यात आली.
* ब्लाऊजला लावलेल्या लटकनमध्ये थोडी हटके आयडिया आणून तुम्ही वेगळा प्रयोग करू शकता.
* लटकन म्हणून त्याच कापडाचा गोंडा वापरणं ही पद्धत अगदी कॉमन झाली आहे, ती टाळलेली बरी.
* हेवी वर्कची साडी असेल तर ब्लाऊजही तसं असता कामा नये. तुलनेनं कमी वर्क असलेल्या साडीवर भरगच्च वर्क केलेलं ब्लाऊज घालणं जास्त सयुक्तिक ठरतं.