खाबू मोशाय
वेगवेगळ्या प्रकारचे डोसे, फ्रँकी, वडापाव, बर्फाचे गोळे, सँडविचेस हे सर्व खाद्यपदार्थ एकाच जागी आणि तेदेखील चवीला उत्तम मिळण्याचे पश्चिम उपनगरांतले एक ठिकाण म्हणजे पाल्र्याच्या एन. एम. कॉलेजसमोरची ‘खाऊगल्ली’! ही गल्ली म्हणजे रूढार्थाने गल्ली नसली, तरी चवीचवीने भूक भागवण्यासारखे अनेक पदार्थ इथे मिळतात.
वेगवेगळ्या खाद्यपदार्थाच्या चार गाडय़ा एकमेकींच्या बाजूला उभ्या राहिल्या की, पुण्यात ‘चौपाटी’ तयार होते, तर मुंबईत याच संकल्पनेला ‘खाऊगल्ली’ असे नाव आहे. या खाऊगल्लीचा आणि वास्तविक गल्लीचा प्रत्यक्षात काही संबंध असायलाच लागतो असे नाही. म्हणजे एखादी खाऊगल्ली खरोखरच एखाद्या गल्लीत असते, तर एखादी खाऊगल्ली चक्क हायवेच्या शेजारीही आपले बस्तान मांडू शकते. खाबू मोशाय आज तुम्हाला अशाच एका मुख्य रस्त्यावरील खाऊगल्लीत घेऊन जाणार आहे.
पश्चिम उपनगरांतील जगप्रसिद्ध एस. व्ही. रोडवरून विलेपार्ले पश्चिमेकडे एक रस्ता डावीकडे जुहू भागात जाण्यासाठी वळतो. या रस्त्याला लागल्यावर लगेचच उजव्या बाजूला मिठीबाई, एन. एम., गांधी अशी कॉलेजेस आहेत. तर इथे उजवीकडे वळल्यावर लगेचच गर्दी दिसायला सुरू होते. ही गर्दी बहुतांश कॉलेज कट्टेकऱ्यांची असते, पण त्यांच्या हातात वह्य़ा-पुस्तकांऐवजी सँडविचची प्लेट, फ्रँकी किंवा रंगीबेरंगी गोळा दिसतो. हीच ती एन. एम. कॉलेजसमोरची प्रसिद्ध खाऊगल्ली!
मुंबईत साधारणपणे प्रत्येक कॉलेजबाहेर काही ठरावीक दुकानांचा ठिय्या असतो. यात एक स्टेशनरीचं दुकान, एक बोरे-आवळे-चिंचा विकणारी म्हातारी, एक चहावाला आणि खाऊगल्ली म्हणता येईल अशी खाद्यपदार्थाची दुकाने असतातच. एन. एम. कॉलेजही याला अपवाद नाही. ही खाऊगल्लीदेखील अतिशय चोखंदळ आहे. साधारण १०० मीटरच्या अंतरात पसरलेल्या या खाऊगल्लीत सँडविच, फ्रँकी, वडापाव, सोडा, बर्फाचा गोळा, डोसा अशा अनेक खाद्यपदार्थाचा पुरवठा करणाऱ्या अनेक गाडय़ा आहेत. प्रत्येक गाडीवर तेवढेच रुचकर खाद्यपदार्थ मिळतात.
खाबू मोशाय एक गोष्ट नक्कीच सांगेल, अशा खाऊगल्ल्यांमध्ये येताना आपल्याबरोबर किमान दोघांना घेऊन जाणे कधीही श्रेयस्कर! प्रत्येक ठिकाणचे खाद्यपदार्थ टेस्ट करता येतात आणि खर्चही विभागला जातो. या गल्लीत खाद्यजत्रेची सुरुवात वडापावपासून करायला हरकत नाही. साधारण बर्गर किंवा बनपावच्या आकाराचा पाव, त्यात बटर, चटण्या यांचा लेप आणि त्यामध्ये गरमागरम वडा असा वडापाव समोर येतो. मुंबईत इतरत्र मिळणाऱ्या वडापावच्या तुलनेत हा वडापाव थोडासा महाग असला, तरी खिशाला परवडेल असाच आहे. या वडापावची किंमत आहे १५ रुपये!
वडापावनंतर बाजूच्याच गाडीवरील फ्रँकी तुम्हाला नक्कीच साद घालेल. आतापर्यंत कधी फ्रँकीचा आस्वाद घेतला नसलात, तर या खाऊगल्लीतील कोणतीही फ्रँकी खाऊन बघा! किंबहुना ती फ्रँकी तयार करताना बघत राहिलात, तर ती खाल्ल्यावाचून तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. तीच गत इथे मिळणाऱ्या डोशाची! जिनी डोसा, सेट डोसा, ओपन डोसा अशा डोशाच्या अनेक पोटजाती इथे मिळतात.
खाबू मोशायने तुम्हाला याआधी घाटकोपरच्या खाऊगल्लीतील जिनी डोसा खायला घातला होता. एन. एम. कॉलेजच्या खाऊगल्लीत मिळणारा जिनी डोसाही त्याच पठडीतला आहे. डोसा तव्यावर असतानाच त्याचे चार भाग करून ते मस्त गुंडाळले जातात. त्यानंतर हे भाग उभे ताटलीत ठेवून त्यावर चीज किसून ते तुमच्यासमोर ठेवले जातात. या खाद्यप्रकारात चवीपेक्षा प्रदर्शनालाच जास्त महत्त्व आहे, हे आपले खाबू मोशायचे वैयक्तिक मत झाले!
पोट भरले नसल्यास एखादा सँडविच प्रकार ट्राय करायलाही हरकत नाही. त्यानंतर आपोष्णी म्हणून सोडा किंवा बर्फाचा गोळा खायलाच हवा. विशेष म्हणजे हे सर्व पदार्थ शंभर रुपयांच्या आत खाता येतात. त्याशिवाय एन. एम., मिठीबाई अशा कॉलेजमधील मुलांशी आणि विशेषत: मुलींशी थोडीशी ओळख वाढवायला ही खाऊगल्ली कामाला येऊ शकते; पण खाबू मोशायच्या या सल्ल्याबाबत प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीने पावले उचलावीत. काही विपरीत घडल्यास खाबू मोशाय जबाबदार नाही! कारण खाबू मोशाय फक्त खाण्याचे सल्ले देतो, मार खाण्याचे नाही!!!