मिसळ, भेळ वगैरे पदार्थ आपल्याकडे चावट पदार्थ म्हणून ओळखले जातात आणि कदाचित म्हणूनच ते जास्त लोकप्रियही आहेत. उसळ, फरसाण, कांदा, शेव आणि यांवर झणझणीत र्ती.. नुसत्या आठवणीनेही तोंडाला पाणी सुटते आणि डोळ्यांसमोर लाल-लाल रश्शाने भरलेली मिसळ दिसायला लागते. खाबू मोशायची तबियत बहेलवणाऱ्या खूप कमीच मिसळी आतापर्यंत खाबू मोशायसमोर आल्या. त्यातलीच एक शहापूर गावातली.. ‘सुस्वाद’ची मिसळ-भाकरी..

खाबू मोशाय सहसा एखाद्या पदार्थाच्या प्रेमात पडत नाही; पण एखाद्या ठिकाणचा नेमका पदार्थ त्याला आवडला, तर तो पदार्थ पुन:पुन्हा खाण्यासाठी तो वाट्टेल त्या वेळी तिथे कडमडायला तयार असतो. असंच एक कडमडण्यासाठी योग्य ठिकाण खाबू मोशायला सापडलं, मुंबईपासून ८० किलोमीटर दूर.. आसनगावजवळच्या शहापूर गावात! कडमडण्यासाठी निमित्त होतं झणझणीत मिसळीचं आणि आतापर्यंत मिसळीची जोडीदार म्हणून कधीच पानात न पडलेल्या तांदळाच्या लुसलुशीत भाकरीचं!
त्याचं झालं असं, खाबू मोशाय खाण्याचाच नाही, तर फिरण्याच्या बाबतीतही शौकीन! यंदाच्या पावसाळ्यात खाबू मोशाय शहापूरजवळच्या गोठेघर प्रकल्पाला भेट द्यायला गेला. (भेट वगैरे द्यायला खाबू मोशाय काय राष्ट्रपती आहे का, हा प्रश्न इथे बिनबुडाचा आहे. खाबू मोशायही एखाद्या ठिकाणाला भेट देत असतो.) सोबत त्याचा जीवश्चकंठश्च मित्र बाबू खवय्या होताच. तर खाबू आणि बाबू दोघे एकत्र असल्यावर मग खवय्येगिरी झाली नसती, तरच नवल!
भल्या पहाटेची (खाबू मोशायची पहाट कधीच भली नसते. पहाट म्हणजे साडेसहा वगैरे) कसारा गाडी पकडून दोघे आसनगाव स्थानकात उतरले. तिथून शहापूरसाठीच्या शेअर रिक्षा पकडून रिमझिम पावसाचा शिडकावा अंगावर घेत शहापूर एसटी स्टँडजवळ पोहोचले. सकाळी लवकर उठल्याने दोघांच्याही पोटात कडाडून भूक लागली होती. अशा वेळी खाबू मोशाय सरळ एसटी स्टँड गाठतो आणि दिवसातल्या कोणत्याही प्रहरी मिळणारा वडापाव चेपतो, कारण गावोगावच्या एसटी स्टँडवरचा वडा खाबू मोशायला कधीही आवडतो. किमान आतापर्यंत तरी खाबू मोशायची निराशा झाली नाही; पण त्या दिवशी मात्र खाबू मोशायला एसटी स्टँडपासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर उपजिल्हा आरोग्य केंद्राच्या बाजूलाच असलेले सुस्वाद उपाहारगृह दिसले.
या उपाहारगृहाची ठेवण कोणीही प्रथमदर्शनी प्रेमात पडेल, अशी बिलकूल नाही. त्यामुळे प्रथमदर्शनी प्रेमावर जसा द्वितीय दर्शन हा उतारा असतो, तसंच प्रथमदर्शनी नावडीवरही तो असावा! खाबू-बाबूची जोडगोळी त्या ‘सुस्वाद’मध्ये प्रवेश करती झाली आणि झटक्यात या दोघांच्याही नाकांचा ताबा एका झणझणीत गंधाने घेतला. ऑक्सिजन-कार्बन डायऑक्साइड वगैरे भानगड नाकाबाहेर हद्दपार झाली आणि या गंधाने दोघांनाही झपाटलं. हा गंध मिसळीच्या र्तीचा ही गोष्ट खाबू मोशायच्या चाणाक्ष नाकाने बरोब्बर हेरली आणि टेबलाशी आलेल्या पोऱ्याला खाबू मोशाय दोन मिसळींची ऑर्डर देऊन मोकळा झाला.
पण प्रकरण एवढय़ावर भागलं नाही. पोऱ्याने ताबडतोब, ‘मिसळ पावाबरोबर, की भाकरी आनू,’ असं विचारलं. मिसळीबरोबर भाकरी हा कॉम्बो खाबू मोशायने आतापर्यंत कधीच ट्राय केला नव्हता. त्यामुळे भाकरीबरोबर मिसळ लागते कशी, हे पाहण्यासाठी खाबू मोशायने कुतूहलानेच ‘भाकरी’ असं उत्तर दिलं. थोडय़ाच वेळात मस्त लालजर्द र्तीने भरलेली एक प्लेट, बाजूला चटणीची वाटी, मिरची आणि लुसलुशीत भाकरी असा ऐवज एका ताटलीत खाबू मोशायच्या समोर आला.
खाबू मोशायने काहीशा साशंकपणेच भाकरीचा एक तुकडा मिसळीत बुडवला आणि तोंडात टाकला. आहाहाहाहाऽऽऽऽ. त्या चवीच्या आठवणीनेही तोंडाला पाणी सुटतं. भाकरीची साधीच चव आणि मिसळीचा तिखटपणा यांचं अद्वैत असं फक्कड जमून गेलं, की बस्सं! या मिसळ-भाकरीची जन्मकहाणी काय, या कुतूहलाने खाबू मोशायने हॉटेलच्या काऊंटरवर बसलेल्या इसमाला बोलतं केलं.
हा इसम म्हणजे सोमनाथ अळशी, अर्थात हॉटेलचे मालक. सोमनाथरावांनी १९७६ मध्ये हे सुस्वाद सुरू केलं. इथली मिसळ फक्त शहापुरातच नाही, तर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्या वेळी गावात पाव फारसे बनत नव्हते आणि शहापूर भागात भाताचं पीक अगदी दाबजोर. त्यामुळे मग मिसळीबरोबर भाकरी मिळायला सुरुवात झाली. पुढे पाव मिळणं तेवढं दुरापास्त राहिलं नाही, तरीही सोमनाथरावांनी मिसळीबरोबर भाकरीची संगत तुटू दिली नाही. ३८ र्वष जुन्या हॉटेलमध्ये त्या जुनेपणाच्या सगळ्या खुणा सापडतात. हॉटेल कळकटच आहे; पण त्या कळकटपणाला या मिसळ-भाकरीचा अभिमान आहे.
बरं, या मिसळीची किंमत किती असेल? अवघी २० रुपये! आजकाल मुंबईत साधा वडापाव १३-१५ रुपयांखाली येत नाही. तिथे मिसळीला फक्त २० रुपये! वर भाकरी घेतलीत, तर एका भाकरीचे आठ रुपये. ज्यांना मिसळीमध्ये पाव बुडवून खाण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी दोन रुपयांत पावही मिळतो; पण इथे येऊन मिसळ-भाकरी खाण्याची मजा काही वेगळीच. बरं, ही मिसळ तिखट असली, तरी अजिबात बाधत नाही, हे खाबू मोशाय त्याच्या आणि बाबू खवय्याच्या अनुभवावरून सांगू शकतो.

कसे जाल? रेल्वेने जाणार असाल, तर मध्य रेल्वेवरून कसारा किंवा आसनगाव लोकल पकडा. आसनगाव स्थानकात उतरल्यावर पूर्वेकडे उतरून शहापूरला पंडित नाक्याला जाणाऱ्या रिक्षा पकडा. एसटी स्टँडच्या इथे उतरून उपजिल्हा आरोग्य केंद्र कुठाय, असे विचारा किंवा मग अळशीची मिसळ कुठे मिळते, असं विचारलं, तरी शहापुरातलं पोरही तुम्हाला ‘सुस्वाद’च्या दारात आणून सोडेल.