तुमचं व्यक्तिमत्त्व खुलवते ती फॅशन. तुमच्यातलं वेगळेपण व्यक्त करते ती फॅशन असं अमेरिकेची फॅशन आयकॉन बियॉन्से सांगते. फॅशन महागडीच असली पाहिजे असं नाही. हाय फॅशन आणि स्ट्रीट फॅशन याचं परफेक्ट कॉम्बिनेशन करूनही तुम्ही मोजक्या किमतीत फॅशनेबल राहू शकता. तुमचा ठसा उमटवू शकता, असं फॅशन क्षेत्रातील दिग्गजांचं म्हणणं आहे. फॅशन आणि स्टायलिंग यातला फरक त्यासाठी लक्षात घेतला पाहिजे. फॅशन म्हणजे नेमकं काय आणि क्लासी लुकसाठी नेमकं काय करावं हे जाणून घेण्यासाठी प्रसिद्ध फॅशन डिझायनर श्रुती संचेती आणि प्रसिद्ध स्टायलिस्ट अमित दिवेकर यांना बोलतं केलं. अमित दिवेकर यांनी हॉलीवूड सेलेब्रिटी केट ब्लँकेट, पॉप गायिका शकिरा यांच्यासाठी स्टायलिंग केलेली आहे. काही चित्रपटांसाठीदेखील कॉस्च्युम डिझायनिंग केलं आहे. श्रुती संचेती या इंडियन टेक्सटाइलवर काम करणाऱ्या प्रमुख डिझायनर्सपैकी एक असून त्यांचे स्वतचे फॅशन लेबल आहे.

फॅशन आणि स्टाइल या वेगळ्या गोष्टी
3फॅशन आणि स्टाइल या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माझ्या मते, फॅशन म्हणजे – प्रत्येक सीझनमध्ये फॅशन क्षेत्रातील विविध डिझायनर्स आपल्यासाठी त्यांच्या कलेक्शनमधून काही वेगळे प्रयोग सादर करतात. आपल्यासाठी तयार करतात ती फॅशन होय. या फॅशनमधूनच नवनवीन ट्रेण्ड उदयाला येतात आणि मग ते ट्रेण्ड आपल्याला सगळीकडे दिसायला लागतात. अगदी मोठय़ा ब्रॅण्डेड स्टोअरपासून ते रस्त्यावरच्या दुकानापर्यंत सगळीकडे हे ट्रेण्ड आपल्याला बघायला मिळतात. ज्याला जसं आणि जिथून खरेदी करणं परवडतं त्यांनी ते तसं खरेदी केलं, तरीही तुम्ही फॅशनेबल राहू शकता. तुमचा चॉइस इथे महत्त्वाच ठरतो.एखादं ब्रॅण्डेड जॅकेट, जुनी रिप्ड ब्लू जीन्स, एखादे शूज, चंकी अ‍ॅक्सेसरीज अशा वस्तू वापरून एक क्लासी लुक मिळवता येईल. यालाच स्टायलिंग म्हणतात. फॅशनबरोबर स्टायलिंग व्यवस्थित असेल, तरच एकूण लुक उठून दिसतो. स्टायलिंग करण्याआधी आपल्याला काय शोभून दिसेल, जास्त उठावदार कशा पद्धतीने दिसता येईल याचा विचार केला पाहिजे. तुमचं व्यक्तिमत्त्व, वावर आणि उत्साह यांची लेटेस्ट फॅशन ट्रेण्डशी सांगड घालून तुमची स्वतची खास स्टाइल अधोरेखित करता येईल. ही स्टाइल म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब असेल.
अमित दिवेकर

व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत समन्वय आवश्यक
फॅशन म्हणजे तुमचं व्यक्तिमत्त्व हे बरोबर आहे. तुमचा कल, तुमच्या प्रायोरिटीज, तुमची दृष्टी या सगळ्या गोष्टी तुमच्या फॅशन 4सेन्सवरून व्यक्त होत असतात. तुमच्या राहणीमानावरून, तुमच्या फॅशनवरून नक्कीच तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधता येतो. तुमच्या बाबतची परसेप्शन्स तुम्ही फॅशनच्या मदतीनं बदलू शकता. तुमच्या आवडी-निवडीचं, तुमच्या विचारांचं फॅशन हे प्रतिबिंब आहे, असं मला वाटतं. फक्त मोठमोठे ब्रॅण्ड्स वापरले किंवा डिझायनर वेअर वापरले म्हणजेच तुम्ही फॅशनेबल झालात असं नाही. तुम्ही खरेदी करत असलेली प्रत्येक गोष्ट ब्रॅण्डेड असेल असं नाही. विशेषत कॉलेजच्या वयात तर हे शक्यही होणार नाही. छोटय़ा दुकानांमधून किंवा स्ट्रीट-साइड शॉपिंग करूनही तुम्ही क्लासी लुक मिळवू शकता. मिक्स अ‍ॅण्ड मॅचचं टेक्निक त्यासाठी जमायला हवं. विविध ब्रॅण्ड्स एकत्रित करून तुमचा संपूर्ण लुक कसा तयार करता याला जास्त महत्त्व आहे. तुमचा चॉइस स्मार्ट हवा, म्हणजे हाय फॅशन आणि स्ट्रीट फॅशनचा उत्तम समन्वय साधता येईल. फॅशनेबल राहण्यासाठी किंवा ‘क्लासी लुक’साठी दर वेळी ब्रॅण्डेड लेबलची गरज उरणार नाही.
श्रुती संचेती