फॅशन करायला सगळ्यांनाच आवडतं. पण फॅशन करण्याच्या नादात कधी कधी फिअ‍ॅस्को होऊ शकतो.  फॅशनच्या बाबतीत कोणचे ठळक मुद्दे विचारात घेतले म्हणजे फजिती टळू शकेल? काय करू नये ते सांगणाऱ्या युक्तीच्या या पाच गोष्टी..
फॅशन करण्याच्या नादात कधी कधी फिअ‍ॅस्को होऊ शकतो. म्हणजे करायला जातो एक आणि ते शोभलं नाही किंवा विजोड दिसलं तर फजितीच होते. जी फॅशन तुम्ही योग्य प्रकारे कॅरी करू शकता, तीच तुमच्यासाठी उत्तम फॅशन असते. कारण तुम्ही काय घालता हे महत्त्वाचे नसून ते कसं घालता हे महत्त्वाचं आहे.
फॅशनच्या बाबतीतील चुका टाळायच्या असतील तर आधी त्यांबद्दल माहिती करून घेणं गरजेचं आहे. स्त्री-पुरुषांकडून होणाऱ्या फॅशन संदर्भातल्या काही कॉमन चुका असतात. अतिउत्साहापायी कधी त्या घडतात किंवा अजाणतेपणातून त्या केल्या जातात. फॅशनच्या बाबतीत कोणते ठळक मुद्दे या चुका टाळू शकतात ते माहिती करून घ्यायला हवे. पाच ढोबळ आणि कॉमन चुका यानिमित्ताने शेअर करते.
अ‍ॅक्सेसरीजचा अतिवापर
अ‍ॅक्सेसरीजचं प्रदर्शन मांडल्यासारखा अतिवापर केव्हाही अयोग्यच. अगदी स्वत:च्याच लग्न प्रसंगासाठीसुद्धा बेसुमार दागदागिने अंगावर वागवण्याची मुळीच गरज नाही. एका फॅशनगुरूनं दिलेला सल्ला- घराबाहेर पडताना न राहवून अंगावर घातलेली ती शेवटची अ‍ॅक्सेसरी काढून टाका. एखादाच ठळक दागिना किंवा अ‍ॅक्सेसरी घाला. मग ते नेकलेस असेल किंवा चंकी कॉकटेल िरग (फुला-पानांच्या आकृत्या असलेल्या अ‍ॅक्सेसरीज सध्या ‘इन’ आहेत.) जर तुम्हाला दागिने घालायला आवडत नसेल तर एखादी फॅन्सी बॅगसुद्धा उत्तम अ‍ॅक्सेसरी म्हणून चालेल. नाजूकसे ब्रेसलेट किंवा छोटय़ाशा रिंग्ज एव्हढय़ाच गोष्टी पुरेशा आहेत. फॅशनच्या नावाखाली खूप दागिने घातलेत तर तुम्ही सजवलेल्या ख्रिसमस ट्रीसारखे दिसाल. आणखी एक- तुमचा ड्रेस किंवा साडी जर िपट्रेड असेल तर कमीत कमी दागिने किंवा अ‍ॅक्सेसरीज घाला, कारण आपल्या कपड्यावरील िपट्र्सच आकर्षणाचा केंद्रिबदू असायला हवीत. तेव्हा एखादं छानसं घड्याळ किंवा आकर्षक िरग (अंगठी) एव्हढंच पुरेसं आहे. एक अतिमहत्त्वाचा नियम म्हणजे नेकलेस आणि लोंबते कानातले कधीही एकाच वेळी घालू नका. खोल गळ्याच्या ड्रेसवर नेकलेस घाला आणि इतर वेळी फक्त िरग्ज घाला.
काही पुरुषांना ‘बप्पी लाहिरी’ स्टाइल सोन्याचे भरपूर दागिने घालायची हौस असते, पण रिलॅक्स फ्रेंड्स! पुरुषांनी दागिना म्हणून लग्नातली अंगठी घालावी, बाकी काहीही घालण्याचा मोह टाळावा. त्यापेक्षा क्लासी रिस्टवॉच (पण सोनेरी नव्हे), टाय किंवा उंची वॉलेट, कफलिंग्ज असे बरेच ऑप्शन्स आहेत. पण पुरुष आणि दागिने.. नो वे! ते फक्त बॉलीवूडमधल्या खलनायकालाच शोभून दिसतात.
‘मेकअप’चा अतिवापर
जितके कमी तेवढे उत्तम हा नियम ‘मेक-अप’च्या संदर्भातही लागू होतो. पूर्ण चेहरा रंगवण्यापेक्षा, आपल्या चेहऱ्याचा एखादा विशिष्ट भाग ‘मेक-अप’ने उठावदार करणं उत्तम. उदाहरणार्थ तुमचे डोळे विशेष सदर असतील तर ते तुम्ही काजल पेन्सिलने अधिक मादक दाखवू शकता. मग अशा वेळी ओठांचा रंग मंद राहायला हवा. किंवा जर तुमचे ओठ जास्त आकर्षक असतील तर चमकदार लाल रंगाने तुम्ही फक्त ओठ उठावदार दाखवू शकता आणि त्या वेळी चेहऱ्याच्या अन्य भागांवरील मेक-अपचा भर कमी करून डोळ्यांसाठी फक्त मस्कारा वापरू शकता. तोंडावर मेक-अपचे थर चढवणं टाळायला हवं. जर तुम्ही स्वत:च नववधू असाल तर ठीक, अन्यथा डोळे कृत्रिम पापण्यांनी सजवू नका.  जर तुमचे दात पिवळसर असतील तर ऑरेंज रंगाची लिपस्टिक लावणे टाळा, कारण त्यामुळे दातांचा पिवळेपणा अधिकच दिसून येतो. तसंच डोळ्याभोवती काळी वर्तुळं असतील आणि तरीही तुम्हाला डोळ्यांना स्मोकी लूक आणायचाच असेल तर आधी चांगल्या प्रतीचा कन्सिलर वापरून काळी वर्तुळं झाकून टाका.
पुरुषांकडे पाहताना स्त्रियांचं प्रथम लक्ष जातं ते त्यांच्या पादत्राणांकडे. तेव्हा पुरुषांनी आपले शूज आणि चपलांकडे विशेष लक्ष द्यायला हवं. दुकानांतून यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मुख्य म्हणजे तुमची फूटवेअर पेहरावाला साजेशी असायला हवीत. उदाहरणार्थ जीन्स, टीशर्ट या ड्रेसवर कोल्हापुरी चपला अगदी विचित्र दिसतील. हं, पण जीन्सवर कुर्ता असेल तर कोल्हापुरी चपला चालतील. तसंच फॉर्मल ट्राउजर्सवर बोट शूज किंवा लेदर सँडल्स- नॉट अ‍ॅट ऑल! तेव्हा मित्रांनो, उत्तम प्रकारचे, योग्य आकाराचे आणि मापाचे काळे आणि तपकिरी (ब्राऊन) शूज तुमच्या फॉर्मल कलेक्शनमध्ये असणे आवश्यक आहे. वापरातले मोज्यांचे जोड नेहमी स्वच्छ धुतलेले असतील याचीही खबरदारी बाळगणं गरजेचं आहे.
अंतर्वस्त्रांची चुकीची निवड  बहुतांश महिला अंतर्वस्त्रांचे महत्त्व लक्षातच घेत नाहीत. तुम्हाला माहीत आहे का? योग्य अंतर्वस्त्रामुळे तुम्ही जास्त सडपातळ दिसू शकता. फॅशनच्या नियमांनुसार चुकीच्या साइजची अंतर्वस्त्रं वापरणं हे अती मेकअप करण्याइतकंच चुकीचं आहे. तसंच अंगासरशी बसणाऱ्या बॉडी हिगग ड्रेसच्या आत बॉडीशेपर घालणे इज अ मस्ट. लो वेस्ट जीन्सच्या आत हाय वेस्ट पँटीज नॉट अलाउड. मत्रिणींनो, बाहेर डोकावणाऱ्या ब्रा स्ट्रॅप्स, पँटी लाइन्स, बॉडीशेपर लाइन्स असे अंतर्वस्त्रांचं प्रदर्शन तुमच्या फॅन्सी लूकचा पार बोऱ्या वाजवतात. तेव्हा चांगल्या प्रतीच्या अंतर्वस्त्रांवर खर्च हा करायलाच हवा. तुमची अंतर्वस्त्रं ही तुमच्या शरीराचाच भाग असल्याप्रमाणे दिसायला हवीत. उदा. स्ट्रॅप्ड ड्रेसच्या आत स्ट्रॅपलेस ब्रा हवी किंवा स्किनी ट्राउजर्स किंवा स्कर्ट्सच्या आत थॉन्ग्ज घालायला हवेत.
वयानुरूप कपडय़ांची निवड नसणे
– उच्च अभिरुची दर्शवणारे थोडेफार कपडे सोडले तर आपल्या कपडय़ांच्या कलेक्शनमधले बरेचसे कपडे आपल्या वयाला न शोभणारेच असतात. फ्रीलवाले स्कर्ट किंवा पोलका डॉटेड शॉर्ट्स वयाच्या तिशी-पस्तिशीपर्यंत घातल्या तर समवयस्कांमध्ये चेष्टा होतेच, शिवाय फॅशनच्या दृष्टीनेही ते फारच चुकीचे दिसते. तीच गोष्ट अ‍ॅक्सेसरीजची. प्लॅस्टिकचे, कृत्रिम खडय़ांचे स्वस्तातले कानातले पन्नाशीच्या बाईला शोभत नाहीत. त्यांनी सौम्य मोत्याचे किंवा खऱ्या रत्नाचे इअर रिंग्ज घालायला हवेत. थोडक्यात काय, वयाची चाळिशी पार केल्यानंतर गुडघ्याच्या वर जाणारे स्कर्ट किंवा ड्रेसेस घालू नयेत. अन्यथा तुम्ही सर्वाच्या कुचेष्टेचा विषय ठरता.
तीच गोष्ट पुरुषांची. बहुतेकदा तरुण दिसण्यासाठी बरेच चाळिशी पार केलेले पुरुष, कॉलेज तरुणांप्रमाणे फिटिंगचे, विविध िपट्र्सचे टीशर्ट्स घालतात आणि फार विचित्र दिसतात, तसेच जर वयामुळे पोट सुटलेले असेल तर अंगासरशी बसणारे टीशर्ट्स घालणे अगदी बेढब दिसते.
प्रसंगानुरूप पेहराव नसणे
 एखाद्या लग्न समारंभासाठी जीन्स घालणे किंवा पिकनिकला जाताना साडी नेसणे दोन्हीही चूकच. एखाद्या मुलीला भेटायला जाताना जर कोणी मुलगा कुर्ता-पायजमा घालून आला तर ते किती अयोग्य दिसेल? एकूण काय, आपले कपडे प्रसंगानुसारच असले पाहिजेत. आजकाल बऱ्याच पार्टीजमधून ड्रेस कोड आधीच ठरवलेला असतो. त्यामुळे आपल्याला फार विचार करावा लागत नाही. फक्त ठरलेला ड्रेस कोड मात्र पाळणे महत्त्वाचे. कॉफी शॉपमध्ये डेटवर जात असाल तर मस्तपकी जीन्स आणि टी शर्ट तो बनता है बॉस! अर्थात तुम्ही ड्रेसेसच्या बाबतीत नवनवीन प्रयोग नक्कीच करू शकता. फक्त ती फॅशन खूपच ऑड दिसत नसली म्हणजे झालं.
फॅशनच्या बाबतीतील या खटकणाऱ्या चुकीच्या गोष्टी आपण पाहिल्या. आता कुठेही जाताना थोडं काळजीपूर्वक फॅशन करून जाणार ना!
अनुवाद – गीता सोनी
viva.loksatta@gmail.com