नचिकेत बर्वे हे आजच्या फॅशन डिझायनर्समधलं महत्त्वाचं नाव. एलिगन्स नि ग्लॅमरचा अप्रतिम मेळ त्याच्या कलेक्शनमध्ये आहे.  बॉलीवूडच्या सेलिब्रेटींपासून समाजातील विविध स्तरांवर त्याच्या ब्रॅण्डचे चाहते आहेत. नचिकेत बर्वे नावाच्या या ब्रॅण्डचा उलगडलेला प्रवास.
ब्रॅण्डेड फॅशन केवळ रॅम्पपुरती मर्यादित न ठेवता ती सामान्यांपर्यंत पोहचावी, यासाठीही हा तरुण डिझायनर प्रयत्न करतो. पारंपरिक डिझाइन्स आणि पॅटर्नचा वेस्टर्न डिझाइन्सशी मेळ साधत तो नवनवीन कलेक्शन सादर करतो. ‘हे जीवन सुंदर आहे’ हे त्याचं साधंसोप्पं नि तितकंच जोरकसपणं येणारं तत्त्व त्याच्या कलेक्शनमधून सहजगत्या दिसतं.. म्हणूनच नचिकेत बर्वे ब्रॅण्ड आज वेगळ्या वलयासह ओळखला जातो. नचिकेतला फॅब्रिक, टेक्स्चर नि स्ट्रक्चरचा खूपच चांगला सेन्स आहे. त्याच्या वैशिष्टय़पूर्ण डिझाइन्समुळं समकालीन डिझायनर्समध्ये तो उठून दिसतो. नचिकेतचा लहानपणापासूनच कलेकडं ओढा होता. त्याचे कुटुंबीय डॉक्टर असल्यानं घरात या क्षेत्राशी संबंधित असं कुणीच नव्हतं. त्याला पहिल्यापासूनच क्रिएटिव्ह गोष्टी करायला आवडायचं. ड्रॉइंग-पेंटिंग वगरे आवडायचं. नचिकेत सांगतो की, ‘‘मला फॅशनची अमुकएका कारणामुळं गोडी लागली असं काही सांगता येणार नाही. माझ्या एका बहिणीला फॅशनमध्ये इंटरेस्ट होता. ती काही मासिकं-पुस्तक आणायची. मीही पुस्तकं वाचायला लागलो. टी.व्ही.वरचा व्हिडीओ फॅशन प्रोग्राम पाहायला लागलो. त्यातून मला ही गोडी लागली असावी. कॉमर्समध्ये पदवी घ्यायचं ठरवून मी न्यूझीलंडला गेलो. पदवी घेताना माझं मन पुन्हा एकदा कलेच्या नि ओघानंच नावीन्याच्या दिशेनं ओढ घेऊ लागलं. कारण मला बेसिकली इंटरेस्ट होता तो फॅशनमध्येच. फॅशनमधलं हे करिअर कसं आकारेल, याबद्दल सारासार विचार करून याच क्षेत्रात यायचा निर्णय मी घेतला.’’  
 त्यानं अहमदाबादच्या ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझायिनग’मध्ये (एनआयडी) प्रवेश घेतला. या संस्थेतून ‘अ‍ॅपारेल अ‍ॅण्ड अ‍ॅक्सेसरीज डिझाइन’मध्ये पोस्ट-ग्रॅज्युएशन केलं. पुढं त्याला फ्रेंच शासनाकडून शिष्यवृत्ती मिळाली. पॅरिसमधील संस्थेत त्याला फॅशनच्या सखोल अभ्यासाची संधी मिळाली.
तिकडं त्यानं एका फ्रेंच ग्रुपबरोबर इन्टर्नशिप केली. त्यानंतर अबू जानी नि संदीप खोसलाबरोबर त्याचं फायनल प्रोजेक्ट केलं. मग ‘एनआयडी’मध्ये सहा महिने शिकवलं. नीरू कुमार या टेक्स्टाइल डिझायनरबरोबर काम केलं. त्याच सुमारास ‘लॅक्मे फॅशन वीक’चा ‘जनरेशन नेक्स्ट प्रोग्राम’ अनाउन्स झाला, तेव्हा त्यालाही अप्लाय करावंसं वाटलं. तिथं त्याचं सिलेक्शन झालं नि तोच त्याचा पहिलावहिला ब्रेक ठरला. कारण फॅशन वीकमध्ये टॅलेन्ट दाखवल्यावर पुढचा मार्ग थोडासा सुकर होतो. तो सांगतो की, ‘सुरुवातीला मला यातल्या व्यावहारिक गोष्टींची फारशी कल्पना नव्हती, पण नंतर तेही जमलं. एक ‘व्हिजन’ असेल तुमच्या ब्रॅण्डला, तर मग तुमच्याकडं बायर्स यायला लागतात. क्लायंटस् मिळू लागतात, तेही सर्व प्रकारचे. फॅशन वीकच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहचता येतं.’
‘लॅक्मे’साठीचं नचिकेतचं पहिलं कलेक्शन पहिल्यांदा पाहिलं ते जया बच्चन यांनी. फॅशन विश्वात त्यानं टाकलेलं हे पहिलं पाऊल होतं.. पहिल्या शोआधी त्याला एक फीडबॅक हवा होता. तो जयाजींनी प्रांजळपणे दिला. फॅशन विषयातील त्यांची जाणकारी नि जगभरातील ट्रेण्ड्सच्या माहितीमुळं त्यांचा फीडबॅक नचिकेतसाठी खूप महत्त्वाचा होता. हाच त्याचा स्टाìटग पॉइंट होता.. त्यानंतर तो नियमितपणं ‘लॅक्मे फॅशन वीक’, ‘विल्स इंडिया फॅशन वीक’मध्ये शो करू लागला. ‘ब्युनोस आयर्स फॅशन वीक’, ‘लंडन फॅशन वीक’, ‘फ्लोरिडा फॅशन वीक ’मध्ये त्याच्या कलेक्शनची खूप तारीफ झाली. त्याला ‘मारी क्लेअर’चा ‘बेस्ट यंग फॅशन डिझायनर’चा पुरस्कार मिळाला. ‘ब्रिटिश कौन्सिल’चा ‘यंग फॅशन आंत्रप्रेन्युअर ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला. सोनम कपूर, दीपिका पदुकोण आदी आघाडीच्या सेलेब्रेटी त्याचं कलेक्शन सादर करतात. ही अचिव्हमेंट एका रात्रीत घडू शकत नाही. त्यासाठी डिझायिनगचं काम चांगलं नि सातत्यपूर्ण असावं लागतं, जे नचिकेतचं होतं नि आहेही.
 मराठी डिझायनर म्हणून या क्षेत्रात कोणता फरक जाणवला, यावर तो म्हणतो की, ‘आपण महाराष्ट्रीय माणसं साधी असतो. वी आर व्हेरी सटल. दिखाऊपणा हा आपल्या संस्कृतीत नाहीये. दुसरीकडं बऱ्याचशा कम्युनिटीजमध्ये ‘जो दिखता है, वो बिकता है’ अशी मानसिकता असते. अशा प्रकारच्या संस्कृतीत असतो तो एक प्रकारचा भपकेबाजपणा.. मिरवणं.. जे आपल्याकडं नाहीये. पण यामुळंही तसं पाहायला गेलं तर एक प्रकारचा फायदाच होतो. कारण कमालीची शिस्त, प्रामाणिकपणा-सचोटी, कष्टाळूपणा हे सारे सद्गुण आपल्यात असतातच नि त्यांचा आपल्याला सकारात्मक पद्धतीनं वापर करता येतो. आता ग्लोबलायझेशनच्या जमान्यात किती तरी आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्स आपल्याकडं येताहेत. अशा वेळी क्लायंटला स्टोअरमध्ये जाऊन प्रॉडक्ट घ्यायचं असेल तर ते फक्त प्रॉड्क्टस बघतील. मग तुम्ही इंडियन आहात, आफ्रिकन आहात, की आसामचे आहात, की मराठी आहात, त्यामुळं त्यांना काही फरक पडत नाही. कोणीही कस्टमर डिझायनर कोण आहे, हे न बघता प्रॉडक्ट्स बघतो.’
परंपरेतल्या फॅशनला नचिकेतचा ब्रॅण्ड मानतो. ‘आपली महाराष्ट्रीय साडी.. तिची परंपरा, तिचं माहात्म्य हे खूप युनिक आहे. व्हेरी स्ट्राँग. पण बॉलीवूडच्या प्रभावामुळं आता बॉलीवूडनायझेशन ऑफ फॅशन होतंय. टीव्हीवरच्या मराठी मालिका असोत किंवा आपली लग्नकरय असोत, प्रत्येकाला बॉलीवूड स्टाइलप्रमाणं दिसायचं असतं. ही गोष्ट मला खूपच खटकते. आपल्या संस्कृतीला बाजूला का सारावं? एखाद्या पंजाबी संस्कृतीप्रमाणं का वागावं? यामुळं आपली जी परंपरागत कला-कौशल्यं आहेत, ती मागं पडू लागली आहेत. उदाहरणार्थ – पठणी साडीवर उगाच क्रिस्टल वगरे लावले जातात, याची खरोखरच गरज नाहीये. तुम्ही तुमच्या आज्जीच्या लग्नाचे फोटो बघितलेत, तर त्या मराठमोळ्या वेशातली वधू खूप सुंदर दिसायची. पण आताची वधू फक्त फॅशन फॉलोअर आहे. फक्त फॅशन आहे म्हणून कोणतीही गोष्ट आंधळेपणानं करू नये. लोक खर्च खूप करतात, पण अनेकदा त्या आऊटफिटची क्वालिटी खूपच वाईट असते नि त्या अनुकरणाच्या नादात आपली संस्कृतीही मागे पडतेय, हे आपण वेळीच ओळखायला हवं. माझ्या कामाच्या माध्यमातून आपली संस्कृती-परंपरा जपण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. ’ तो सांगतो.   
 रॅम्पवरची फॅशन किंवा सेलेब्रिटींनी घातलेले पेहराव सामान्यांना घालायला मिळावेत, असं बरेचदा म्हटलं जातं. पण यात फक्त सेलिब्रिटींचाच रेफरन्स कशासाठी? असं तो विचारतो. कारण मग सगळाच कारभार एकमार्गी होतो. प्रत्येक ऑकेजनच्या वेळी सेलिब्रिटी वेगवेगळे पेहराव करतात. सामान्यांच्या रोजच्या पेहरावातही वेगळेपणा आणता येऊ शकतो. सेलिब्रिटी इज ग्रेट इन हिज ओन वे. मग तुम्हाला दीपिका किंवा कतरिनासारखं दिसायची गरज काय? सेलिब्रिटींची नक्कल करून त्यात पाण्यासारखा पसा खर्च करण्यापेक्षा, काही चांगल्या क्वालिटीच्या गोष्टी घ्याव्यात, असं त्याला वाटतं.
 सध्या त्याची बरीच प्रोजेक्ट्स चालू आहेत. सुबोध भावे दिग्दíशत ‘कटय़ार काळजात घुसली’ या त्याच्या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटाचं काम तो करतोय. अठराव्या शतकात घडणाऱ्या या कथानकाच्या संदर्भातलं संशोधनाचं काम सुरू झालंय. एक फíनिशगचं कोलॅबरेशन चालू आहे. एका ज्वेलरी कंपनीबरोबरही तो टायअप करतोय. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ‘फॅशन वीक’चीही तयारी चालू आहे. सगळ्यांना चोवीस तासांतूनच वेळ काढावा लागतो. फक्त वेळेचा आपण कसा सदुपयोग करतो, त्यावर ते अवलंबून असतं, असं नचिकेतला वाटतं.