काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे कपडे वॉर्डरोबमध्ये मस्ट. त्यातही उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाच्या कपडय़ांची चलती असते. पण या ब्राइट व्हाइटला आणखी उठाव देण्यासाठी काही रंगीत फॅशन फंडे..

सध्या अनेक जणांचा ओढा काळ्या आणि पांढऱ्या रंगाकडे दिसून येतोय. कपडय़ांमध्ये हे दोन रंग सदाबहार आहेत. अर्थात रंगांच्या संज्ञेत सफेद आणि काळा हे दोन स्वतंत्र रंगच नाहीत. सर्व रंगाचे प्रकाशकिरण प्रीझममध्ये एकत्र आल्यावर त्यातून पांढरा रंग तयार होतो. याच्या अगदी विरुद्ध म्हणजे रंगांच्या अभावाने झालेली पोकळी हा काळा रंग. आपल्या वॉडरोबमध्ये मात्र या दोघांचं स्वतंत्र अस्तित्व असतं. असलंच पाहिजे.
कुठल्याही शरीरयष्टीला आणि स्कीनटोनला काळा रंग सहज शोभून दिसतो. तसंच काळ्या कपडय़ांमध्ये ‘वा! बारीक दिसतेयस’अशी कौतुकाची पावतीही लगेच मिळते. म्हणून काळा रंग सगळ्यांचा लाडका असतो. पांढऱ्या रंगाचे तितके लाड होत नाहीत. कपडय़ांच्या साबणाच्या जाहिरातीमध्ये लख्ख सफेद कपडे घालणारी नायिका एका बाजूला आणि एरवी सफेद रंगाचे कपडे घालताना ‘जाड तर दिसत नाही ना’, ‘रंग मळकट दिसतोय का’, ‘कुठे डाग लागला तर’ असे असंख्य प्रश्न डोळ्यासमोर येतात. यंदाच्या उन्हाळ्यात डिझायनर्सनी या सफेद रंगाच्या बाजूने बहुमताचा ठराव पास केलाय. त्यामुळे या रंगाचेही ‘अच्छे दिन’ आलेत.
तसं पाहायला गेलं तर पांढऱ्या रंगाचे बरेच नखरे आहेत. पण एकदा या रंगाशी गट्टी जमली, की काही काळजी नाही. एरवी समर कलेक्शनमध्ये पेस्टल रंगांचा भाव वधारलेला असतोच. पण यंदा पांढऱ्या रंगाने रॅम्पवर बाजी मारलेली दिसतेय. आतापर्यंत केवळ फॉर्मल्समध्ये पांढरा शर्ट, एखादा कुर्ता- लेगिंग्स इथंपर्यंत या पांढऱ्या रंगाचं वॉडरोबमध्ये अस्तित्व होतं. पण आता स्कर्ट्स, डे ड्रेस, साडय़ा, जॅकेट्स, पलाझोपासून थेट गाउनपर्यंत पांढऱ्या रंगाची जादू पसरलेली आहे. रेड कार्पेट इव्हेंट्समध्ये ‘व्हाइट इज न्यू ब्लॅक’ मानला जाऊ लागला आहे. पांढऱ्या रंगाचे कपडे घालताना तुमच्या शरीरयष्टीचा विचार सर्वप्रथम करायला हवा. लूझ फिट कपडे सर्व बॉडीटाइपला शोभून दिसतात. खांदे रुंद असतील तर रुंद गळा, बोट नेकलाइन वापरू नका. पांढऱ्या ड्रेससाठी इलॅस्टिक किंवा बेल्टने वेस्टलाइन अथवा बस्टलाइन हायलाइट केली तर चांगलं दिसेल. अशा व्हाइट ड्रेसची लेन्थ फार जास्त नसावी.
सडपातळ शरीरयष्टी असल्यास अतिढगळ ड्रेस घातल्यास तुम्ही अजून बारीक दिसू शकता. पांढऱ्या कपडय़ांना कडक इस्त्री करणं गरजेचं असतं. त्याच्यावर पडलेल्या चुण्या लगेच नजरेत येतात. तसंच धुतानाही त्यांची विशेष काळजी घावी लागते. पांढरा रंग स्टाइलमध्ये आहे हे खरं, पण तो आणखी स्टायलिश कसा करायचा यासाठी काही टिप्स..

10
11

छायाचित्रांतला तपशील :
१. ब्लॅक अँड व्हाईट ही क्लासिक थीम आहे.
२. व्हाइट बॉटम्स आणि कलफुल टॉप्स हे हिट कॉम्बिनेशन आहे.
३,४. न्यूड आणि सफेद शेड्स नक्कीच पेअर करू शकता. फक्त लुकला ग्लॅमरस टच येण्यासाठी एखादी मेटालिक ज्वेलरी वापरा.
५. ‘व्हाइट ऑन व्हाइट’ वर कलरफुल हॅन्ड बॅग्स किंवा स्लिंग बॅग्स वापरा. जेणेकरुन लुक उठावदार दिसेल.
६. लूझ फिटच्या डे ड्रेसमध्ये जाड दिसण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा ड्रेसचे बेल्टने वेस्टलाईन ला विभाजन करा. जेणेकरून शरीराचा आकार निश्चित होईल.
व्हाइट टिप्स :
* पांढरा स्कर्ट, डेनिम, पलाझो या वापरून बघा. एरवी आपण बॉटम्ससाठी यांच्यासाठी डार्क रंग पसंत करतो. पण या उन्हाळ्यात हा प्रयोग आवर्जून करा. या स्कर्ट किंवा डेनिम्ससोबत खाकी, पेस्टल रंगाचे शर्ट किंवा टॉप शोभून दिसतात. डेनिम कलरचा शर्टसुद्धा छान दिसेल.
* फॅशनचा सेफ गेम खेळायचा असेल तर राखाडी रंग पांढऱ्या रंगासोबत वापरा. यामुळे लुक सिंपल पण एलिगंट दिसतो. तसंच हे दोन्ही रंग हायलाइट होत नाहीत. त्यामुळे ते एकमेकांना बॅलन्स करतात. तुम्ही ब्राइट शेडसुद्धा पांढऱ्या रंगासोबत वापरू शकता. पण ब्राइट शेडचा कपडा हायलाइट होणार, हे लक्षात असू दे. त्यानुसार पांढरा रंग टॉपसाठी वापरायचा की बॉटमसाठी ते ठरवा.
* सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ‘व्हाइट ऑन व्हाइट’ हा यंदाचा मुख्य ट्रेंड आहे. पांढऱ्या स्कर्टसोबत पांढरा टॉप नक्कीच वापरून पाहा. पण तुमचा लुक साधा असू दे. याला उठाव आणण्यासाठी ब्राइट रंगाची स्लिंग बॅग, नेकपीस वापरा.
* ‘व्हाइट ऑन व्हाइट’वर न्यूड शेड शूज किंवा हिल्स चांगले दिसतात.
* सफेद टॉपसोबत कधीही सफेद ब्रा घालू नका. ती टॉपच्या आत उठून दिसते आणि ते वाईट दिसतं. त्याएवजी न्यूड शेड ब्रा वापरा.
* पांढऱ्या कपडय़ांसोबत सिल्व्हर किंवा चंकी ज्वेलरी छान दिसते. पारंपरिक झुमके, मीनाकारी ज्वेलरी, मोत्याचे दागिनेसुद्धा सफेद रंगावर उठून दिसतात.
* पांढरा सूट, जॅकेट स्मार्ट दिसतात. फॉर्मल्समध्ये व्हाइट वेस्ट, जॅकेट नक्कीच वापरून बघा.