आज आषाढी एकादशी.. उपास! उपास म्हणजे आत्मशुद्धी असं शास्त्र सांगतं. उपासाच्या दिवशी खाण्यापिण्याची बंधनं पाळणं, एक दिवस पोटाला विश्रांती असा त्यामागचा उद्देश. अध्यात्मिक शांतीही त्यातून मिळवण्याचा प्रयत्न असतो. पण आजकाल उपास फक्त धार्मिक कारणांसाठी केला जात नाही. एक दिवस थोडासा चेंज म्हणून आपल्यातले बहुतेकजण उपास करतात. खाण्यापिण्याच्या वेगळ्या पदार्थांची चैन, असाच या चेंजमागचा अर्थ.
उपवास हे धर्मशास्त्रात एक प्रकारचं व्रत मानलं गेलंय. आत्मशुद्धीचं व्रत. एक दिवस खाण्यापिण्याची बंधनं पाळणं असा यामागचा उद्देश आहे. आजकाल असं काही उपासाचं व्रत पाळलं जात नाही. यातला ‘आजकाल’ हा शब्दसुद्धा खरं तर बरोबर नाही. कारण ‘एकादशी दुप्पट खाशी’ ही म्हण काही आजची नाही. आषाढीच्या उपासासारखीच ही म्हण सुद्धा आपल्याकडे फार पूर्वीपासून चालत आलीय. आजीच्या काळातही ही म्हण होती म्हणे. म्हणजे हे फास्टिंग फॉर चेंज हे काही नव्या पिढीचं डोकं नाही तर.
आपल्यातल्या बहुतेकांसाठी उपास म्हणजे थोडासा चेंज. चेंज कसला खाण्यापिण्याची चंगळंच.. पण थोडय़ा वेगळ्या म्हणजे उपासाच्या पदार्थांची. साबुदाणा वडा, वऱ्याचे तांदूळ, उपासाची मिसळ, उपासाचे बटाटावडे, बटाटय़ाचा चिवडा, रताळ्याचा कीस.. आणखी काही आठवतंय? आपल्याकडे उपासाच्या पदार्थाच्या रेसीपीजची पुस्तकं हातोहात खपतात आणि आज यूटय़ूबवरून या रेसिपी देणाऱ्या लिंकनासुद्धा जास्तीत जास्त हिट्स मिळाल्या असणार यात शंका नाही. आषाढीचा मेन्यू अगदी आठवडाभर आधीपासून ठरवला जातो. बऱ्याच दिवसात साबुदाणे वडे झाले नाहीयत, आता आषाढीला चेपून खाऊ, असं कित्येकांनी ठरवलेलं असणार.
पण मूळात उपासाच्या संकल्पनेत हे सगळं काही बसणारं नाही. उपास काही फक्त हिंदू धर्मात सांगितलेला नाही. सध्या रमजानसुद्धा सुरूच आहे. कोटय़वधी मुस्लीम रमजानचे उपास धरतात. लाखो ज्यू योम कुप्पूरसाठी उपास करतात आणि आषाढीला लाखो मराठीजन उपास करतात. हा महिना संपेपर्यंत श्रावण येतोच. हासुद्धा खरा उपासाचा महिना. उपास नसेल त्या दिवशी पुरणपोळी आणि इतर गोडधोड खाण्याचा.
उपास कशासाठी असं तरुण पिढीला विचारलं तर वेगवेगळी उत्तरं येतील. उपासाचे पदार्थ आवडतात म्हणून उपास करतो, असं उत्तर देणारे अनेकजण सापडले. हेल्थ कॉन्शस यंग जनरेशन फिटनेससाठी उपास धरते. वजन आटोक्यात ठेवण्यासाठी उपास कामी येतो. पण वजन कमी करण्यासाठी उपास करणाऱ्याची अवस्था काही दिवसांनी बघवत नाही हेदेखील खरं. म्हणजे पुलंच्या ‘मी उपास करतो’ या कथेप्रमाणे उपासाची चर्चाच जास्त रंगते, उपासाचे चोचलेच जास्त पुरवले जातात आणि शेवटी वजन कमी होण्याऐवजी वाढलेलंच जाणवतं. दुसरं म्हणजे खरोखर मनापासून उपास करणाऱ्या मुली वजन कमी करण्याच्या नादापायी अशक्त होतात.
तरुण पिढी उपास का करते हे व्हिवा टीमनं शोधायचा प्रयत्न केला. काहींनी त्यांच्या उपासामागं धार्मिकतेचा भागही असल्याचं सांगितलं. तर काहींनी त्यामागं फिटनेसचा विचारही होता. पण रुटीनमध्ये जरा चेंज म्हणून असंच उत्तर बहुतेकांनी दिलं. तर मग या सुखावह चेंजसाठी ‘हॅपी आषाढी’ अशा काही शुभेच्छा द्यायच्या का, अशाच विचारात आम्ही सध्या आहोत.