शाळेत असेपर्यंत या दिवसांची स्वप्नवेल्हाळपणं वाट बघणं आणि ते दिवस संपल्यावर स्मरणरंजनात रमणं.. कॉलेजचे दिवस असतातच असे जादूई. अकरावीची अ‍ॅडमिशन प्रोसिजर संपून आता या जादूई जगात पाऊल ठेवायला नवी बॅच उत्सुक आहे. त्यासाठी खास कॉलेजच्या तयारीचं शॉपिंग सुरू आहे. आता नो युनिफॉर्म, आवडीचे रंगीबेरंगी कपडे घालता येणार, असा विचार करत असाल तर मात्र एक मिनिट थांबा. हल्ली अनेक कॉलेजमध्ये ड्रेस कोड असतो माहिती आहे का? काय असतो हा ड्रेस कोड, का असतो आणि विद्यार्थ्यांचं त्याविषयी मत काय आहे?                                               
ड्रेस कोड च्या नावानं
शाळेतून कॉलेजमध्ये पाऊल टाकताना पहिली भावना असते मोकळेपणाची. आता आपण मोठे झालो, स्वतंत्र झालो ही. कॉलेजला शाळेसारखा युनिफॉर्म नाही, ही आणखी एक आनंदाची बाब मानली जाते. पण पुण्या- मुंबईच्या अनेक महाविद्यालयांमध्ये ड्रेस कोड आहे. ड्रेस कोड म्हणजे अमूक एका प्रकारचे कपडे घालायला बंदी किंवा ठराविक प्रकारचे कपडे असण्याबाबत आग्रह. याबाबत प्रत्येक कॉलेजचे आपापले नियम आहेत. या नियमावलीत काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना जीन्स वापरण्यावर बंदी आहे. तर काही कॉलेजचा मुलींच्या स्लीव्हलेस टॉप, थ्री फोर्थ पँटवर आक्षेप आहे. शैक्षणिक वातावरण कायम राहावं, कॉलेजमध्ये थिल्लरपणा वाढू नये, यासाठी अशा प्रकारे ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. काही विद्यार्थ्यांना असे नियम आवश्यक वाटतात, काहींना मात्र व्यक्तिस्वातंत्र्यावरचं ते आक्रमण वाटतं.
‘काळ्या किंवा लाल रंगाचे कपडे घालू नका’ हा कोण्या ज्योतिषाने दिलेला सल्ला नाहीये तर पुण्यातल्या एका इंजिनीयिरग कॉलेजने ‘सोशली अ‍ॅक्सेप्टेड ड्रेसकोड’ च्या नावाखाली काढलेला फतवा आहे. पुण्यातील एमआय टी, सिम्बॉयसिस, फग्र्युसन, मॉडर्न आणि बऱ्याच इंजीनियिरग कॉलेजेसमध्ये स्ट्रिक्टली फॉलो केला जात नसला तरी ड्रेसकोड आहे. काही कॉलेज हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींना बाहेर कुठेही जाताना शॉर्ट्स किंवा मिनीज घालण्याची परवानगी नाहीये. कॉलेजच्या पहिल्याच आठवडय़ात कट्टय़ावर ड्रेस कोडविषयीची चर्चा तापली. त्याचाच आढावा..