vv04‘फिटनेस फ्रीक’ अभिनेत्री बिपाशा बासूने व्यायामाचं महत्त्व पटवून देणारे काही व्हिडिओज प्रसिद्ध केले. सोशल नेटवर्किंग साईटवर ते हिट आहेत. तिच्या ‘रुटीन एक्सरसाईज’च्या डीव्हीडीदेखील लोकप्रिय आहेत. तिने आतापर्यंत अशा तीन डीव्हीडी प्रसिद्ध केल्या आहेत. पुढच्या वर्षांपर्यंत ती आपल्या फिटनेस ‘ब्रॅण्ड’अंतर्गत हेल्थ क्लब सुरू करणार असल्याचीही बातमी फुटली आहे. पण अद्याप बिपाशाकडून याबाबत अधिकृत  घोषणा होणं बाकी आहे. एका चित्रपटाच्या निमित्ताने बिपाशाला भेटायची संधी मिळाली. तेव्हा जाणून घेतलेला तिचा फिटनेस फंडा..         
‘मॉडेल म्हणून कारकीर्द सुरू केल्याने मला आपली मानसिक शांतता किती आणि कशी महत्त्वाची आहे, याची पुरेपूर जाणीव आहे. व्यायामाने शरीराची काळजी कशी घ्यावी आणि याचा आपल्या कारकिर्दीसाठी कसा उपयोग होतो याचीही कल्पना मला करिअरच्या सुरुवातीलाच आली होती. तेव्हा जे माझ्या मनात रुजले ते मला कायम उपयोगी पडले. आपल्या मनाची आणि शरिराची काळजी ही पहिली प्रायोरिटी असंच मी नेहमी स्वतला बजावत आलेय’, बिपाशा मनमोकळेपणानं बोलत होती.
आपल्या शरीराची काळजी हा व्यक्तिगत गरजेचा भाग मानला पाहिजे, असं बिपाशाचं मत आहे. ‘सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी असे दोन वेळा आपण दात घासतो, तसाच दिवसातून किमान एक तास आपण स्वत:साठी वेळ काढावाच आणि त्यात व्यायाम व योगा करावं, असं मला वाटतं’, ती सांगते. ‘ स्वत:वर प्रेम करायला शिकलं पाहिजे, म्हणजे मग हे सगळंच व्यवस्थित होतं. मी, माझं, मला, माझ्यासाठी ही भावना मनात घट्ट रुजवायला हवी. म्हणजे बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. शेवटी सगळं काही आपल्या चांगल्या तब्येतीवरच तर अवलंबून असतं ना!’- इति बिपाशा.
व्यायामाला वेळ नाही, अशी अनेकींची तक्रार असते. पण स्वतसाठी वेळ काढणं, स्वतवर प्रेम करणं कसं आवश्यक आहे, हे सांगताना बिपाशा सांगते, ‘व्यायामामुळे शरिराबरोबर मनही प्रसन्न राहतं, चेहरा छान खुलतो, तो फ्रेशनेस दिवसभर टिकतो. शरीर प्रमाणबद्ध राहिल्यामुळे तुम्हाला सर्व प्रकारची वस्त्रं शोभून दिसतात, तुम्ही आकर्षक राहता, त्यातूनच तुमचा आत्मविश्वास वाढता राहतो.. असं सगळं एकावर एक अवलंबून आहे.. आणि मी तर अशा क्षेत्रात आहे, जिथे ‘आकर्षक दिसणं’ ही पहिली गरज असते.’

व्यायामाचं सूत्र
बिपाशानं स्वतच्या व्यायामाबद्दलची माहिती शेअर करायला सुरुवात केली, त्याला आता बरेच दिवस झाले. ‘त्यातून फिटनेस लाईफस्टाईलचा प्रसार करायला मी लव्ह युवरसेल्फ नावानं डीव्हीडी प्रसिद्ध केली.  पूर्वीपेक्षा आजच्या समाजात उत्तम शरीरसंपदा, चांगलं दिसणं-सजणं याबाबत अधिक जागरूकता आहे, हे खरंय. उपग्रह वाहिन्या, मॉल, इंटरनेट या माध्यमांमुळेही हे शक्य झालं आहे’,  ती सांगते. तिच्या स्वतच्या फिटनेस रूटीनबद्दल विचारल्यावर तिनं सांगितलं, ‘माझ्या एकतासाच्या व्यायामाचं गणित पक्क आहे. ट्रेडमिल २० मिनिटे, सायकलिंग २० मिनिटे आणि क्रॉस ट्रेनर १० मिनिटे. आठवडय़ातून सहा दिवस हे कराव, असं मला वाटतं. कधी कधी तर मला दिवसातून दोनदा व्यायाम करावासा वाटतो. योग्य व्यायाम आणि योग्य सवयी याबाबत स्वयंशिस्त असणं गरजेचं आहे’, बिपाशा फिटनेसचं रहस्य उलगडताना म्हणाली.

डाएट
‘तशी मी बॅलन्स्ड डाएट घेणारी आहे. ‘प्लेअर’ चित्रपटाच्या वेळी मी डाएटचा नवीन मंत्र अंगीकारला. मीठ फक्त गरजेपुरतं, गोड खाणं जवळपास नाहीच आणि जंकफूडपासून दूर, हे माझे बेसिक नियम आहेत. रोज किमान आठ ग्लास पाणी मी पितेच. हिरव्या भाज्या, डाळ, रोटी, अंडी आणि मासे हे व्यवस्थित खाते. चिकन सूप, ग्रिल्ड मशरूम्स व उकडलेलं अंडं यांना प्राधान्य देते. व्यायाम करण्यासाठी लागणारी ताकद यातून मिळते. अन्यथा व्यायामाचा उलटा परिणाम होऊ शकतो. त्याशिवाय सर्व प्रकारची फळं माझ्यासोबत असतातच. हे सर्व पचवण्यासाठी आमच्या सोसायटीच्या पार्कमध्ये चालणं, धावणं हे सुरू असतंच’, ती सांगते.

स्वतसाठी वेळ
चांगलं दिसायचंय, तर फिट राहायला हवं. फिट राहण्यासाठी  स्वतवर थोडी मेहनत घ्यायला पर्यायच नाही. स्वतसाठी वेळ काढायलाच हवा. बिपाशानं तिचा हेल्दी लाईफस्टाईलचा आणि फिटनेसचा फंडा ऐकवला.