इंडिया व्हस्रेस पाकिस्तान मॅच चालू होती.. कधी नव्हे ते इशानच्या घरात सगळे एकत्र आणि शांत बसून मॅच पाहत होते! पण ताई मात्र टीव्हीसमोर यायलाच तयार नाही (का तर म्हणे तिने दोन्ही इिनग पाहिल्या की इंडिया हरते!) त्यामुळे का असा प्रश्न कोणाला पडला नाही. लगेच दादा म्हणाला, फ्रिजमध्ये दही ठेवलंय ना? (आता का, हा प्रश्न विचारायची गरज नाही) क्रिकेट हा धर्म असणाऱ्या अनेकांचे असे आपापले नियम असतात, नॉम्र्स असतात आणि ते वर्ल्ड कपदरम्यान जरा अधिकच भक्तिभावाने पाळले जातात!खुद्द क्रिकेटर्ससुद्धा अशा काही श्रद्धा पाळताना आपापल्या दिसतात! मग हातातले धागेदोरे किंवा गळ्यातली लॉकेट्स हे त्याचेच पुरावे! क्रिकेटचा बादशहा सचिन तेंडुलकरसुद्धा खेळताना त्याच्या डाव्या पायात आधी पॅड बांधायचा किंवा मग आपल्याला हातातल्या काळ्या बंधनामुळे बॅटिंग परफॉर्मन्स सुधारतो, असं युवराज सिंगला वाटतं! धोनीच्या जर्सीवर असणारा ७ हा लकी नंबर किंवा विराटच्या ग्लोव्हज्च्या आतून असलेला ब्लॅक रिस्ट बॅण्ड! आपल्या सगळ्यांनाच कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी अशा श्रद्धांची गरज भासतेच!
मॅचदरम्यानच्या श्रद्धा काय काय असू शकतात याचा एक अंदाज देण्यासाठी आम्ही कॅम्पसमध्ये थोडी चौकशी केली. आपापल्या क्रिकेटच्या धर्मभावना जपण्यासाठी या काळात तर सगळेच आघाडीवर दिसले. पुण्याच्या कल्याणीला वाटतं की, ‘मी हॉस्टेलच्या चौथ्या पायरीवर बसून मॅच नाही पहिली की आपली टीम हरते.’ सुहासिनीच्या घरी इंडिया- पाकिस्तान किंवा इंडिया – ऑस्ट्रेलिया मॅच चालू असली की घराचा मुख्य दरवाजा बंद करीत नाहीत. कोणी बाबांना दाढी करू देत नाही तर कोणाची आई किचनमधून बाहेर येताना विकेट गेली की आईला सतत आत-बाहेर करायला लावते! कोणी एकच इिनग पाहते तर कोणी इंडिया हरते म्हणून मॅचच पाहत नाही!
आता आपली टीम उपांत्यपूर्व फेरीत गेलीय तर अशा अशा श्रद्धांना ऊत येईल. जी टीम बेस्ट परफॉर्मन्स देईल ती जिंकेल हे आपल्या सगळ्यांनाच माहीत असते पण तरीही असा वेडेपणा करण्यापासून आपण स्वत:ला रोखू शकत नाही. पण या अशा क्रिकेट श्रद्धा खेळामध्ये वेगळाच फ्लेवर अ‍ॅड करतात एवढे मात्र नक्की! त्यामुळे जोवर खेळ आहे तोवर हा मॅडनेस फिवर आणि या श्रद्धा कायम राहणार एवढे मात्र नक्की!