डाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय. पण घोडं अडतं, ते प्रत्यक्ष आचरणात आणताना!

शेजारची प्राजक्ता कितीतरी जाडी झालीय हल्ली. तिचं वजन सारखं वाढतंय. ती परवा सांगत होती, तिचा चेहरा सकाळी खूप सुजतो. खरं तर बिचारीला वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठय़ा घालायची इतकी आवड आहे, पण त्यासुद्धा तिला वापरता येत नाहीयेत हल्ली. बोटंदेखील सुजल्यासारखी होतात म्हणाली. ती आजकाल नवे कपडे विकत घ्यायला माझ्याबरोबर येतच नाही. कॉम्प्लेक्स येतोय तिला बहुधा. काय प्रॉब्लेम झालाय तिला कळत नाहीय. ही गोष्ट मी आईच्या कानावर घातली.
माझं आणि आईचं प्राजक्ताविषयी बोलणं झालं, त्याच दिवशी दुपारी आईने सुनेत्रा मावशीला फोन केला. मी तिथेच होते त्या वेळी. आई खूपच कमी बोलली फोनवर, पण फोन बराच वेळ चालला होता. अर्धा-पाऊण तास आई गप्पपणे ऐकत होती, याचं मला आश्चर्यच वाटतं आणि कुतूहलही! अर्थात जास्त चौकशी अंगाशी शेकली असती. शेवटी त्यांची बोलण्याची गाडी रक्त-तपासणीपर्यंत आल्याचं माझ्या लक्षात आलं. आता दोन दिवसांनी – ब्रेक के बाद पुढची स्टोरी कळणार तर.. अर्थात रक्त तपासणीचा निकाल लागायला दोन दिवस लागणार होते ना!
दोन दिवसांनी आईनं आपणहून सांगितलं. प्राजक्ताला हायपोथायरॉइड झाला आहे. मी मनात चुकचुकले. आईने तिला लगेच गोळ्या सुरू केल्या होत्या. तरी, दुसऱ्या दिवशी प्राजक्ताला आणि सुनेत्रा मावशीला आईनं घरी बोलावलं. ‘अगं १२ दिवस उपास केलेस तरी केवळ हवा-पाण्यानेही तुझं वजन वाढेल, असा हा प्रकार आहे. थायरॉइडची सक्रियता कमी झाली की, आपलं मेटाबॉलिझम कमी होतं. त्यामुळे आपलं वजन वाढतं. नुसतं डाएट, कमी खाणं हा त्यावरचा पर्याय नाही. पहिली गोष्ट म्हणजे आचरणात नियमितपणा आणणं गरजेचं आहे. वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे अनशापोटी थायरॉइडची गोळी घेणं आवश्यकच आहे..’ आईने सुरुवात तर चांगली केली होती. नंतर ती एकदम योगोपचाराकडे वळली. ती प्राजक्ताला सांगत होती, प्राणायाममधले श्वसनाचे काही व्यायाम नियमित करायचे. उदाहरणार्थ अनुलोम विलोम, दीर्घश्वसन, उज्जयी प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम. योग शिक्षकाकडून हे शिकून घेणं गरजेचं आहे. तसंच नाश्ता वेळेत घेणं, जेवणाच्या वेळा सांभाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
खाण्यामध्ये प्राजक्ता शाकाहारीच आहे. तिनं नुकतंच सोयाबीन दूध घेणं चालू केलं होतं. आईने ते पूर्णपणे बंद करायला सांगितलं. म्हणे सोयाबीनमुळे थायरॉइड क्षमता कमी होते. आईने तिचं फ्लॉवर, ब्रोकली, कोबी खाणंही बंद केल्यावर मात्र मला आनंद झाला. मलाही हे तीन पदार्थ आवडत नाहीत. हे सांगून झाल्यावर मग आईने एक सॉलिड टँजण्ट मारला. तिला ध्यान कसं करायचं हे शिकवलं आईनं. वयाच्या सतराव्या वर्षी ध्यान वगरे करायला सांगत होती आई. हे उपयुक्त आहे, हे आई पटवून देत होती. मग झोप बरोबर झाली पाहिजे यावरूनही प्रवचन दिलं. लवकर झोपून लवकर उठणं यावरून एक टोमणा मलाही बसला मध्येच. व्यायाम, ध्यानसाधना, योगसाधना वगरे वगरे आणि योग्य वेळा सांभाळून पौष्टिक खाणं वगरे सर्व तुम्हाला माहीतच आहे. पण आईने प्राजक्ताला बदाम, अक्रोड, दूध, अंडी, रंगीबेरंगी भाज्या आणि फळं फार महत्त्वाची असल्याचं सांगितलं.
थोडक्यात थायरॉइड हा एक ठरावीक विशिष्ट रोग नाही, की केवळ गोळ्या घेतल्या नि बरा झाला. थायरॉइडच्या आजारावर मात करायची असेल तर सारासार विचार करून लाइफस्टाइलमध्येच बदल करायला हवा. थोडक्यात मला जशी हाताळण्याची गरज आहे तसं थायरॉइड हाताळणं गरजेचं आहे. नरमाई पण जरासा नियमितपणाचा धाक! प्राजक्ताने हे सगळं ऐकलं आणि ती रडायला लागली. आई संभ्रमात, सुनेत्रा मावशी हैराण.. आता काय झालं? प्रत्येक वयात आलेल्या मुलीला वाटणारा प्रश्न तिने विचारला- ‘हे मलाच का झालं?’ या प्रश्नाला खरंच उत्तर नव्हतं. आईनं तेच सांगितलं. थायरॉइड का होतो, कोणाला होतो, कसा होतो, केव्हा होऊ शकतो या सगळ्याची चर्चा मात्र माझ्या आणि प्राजक्ताच्या डोक्यावरून गेली. आईने व सुनेत्रा मावशीने तिच्याकडून प्रॉमिस घेतलं – शिस्त आणि चिकाटीने या थायरॉइडशी सामना करण्याचं!

loksabha election 2024 Priority is given to local issues in the campaign in Marathwada
मराठवाड्यातील प्रचारात स्थानिक मुद्द्यांनाच प्राधान्य
lokmanas
लोकमानस: मोदींचे ‘गेमिंग’बद्दलचे मत धक्कादायक
ganesh naik thane lok sabha
ठाणे हवे आहे, पण धनुष्यबाण नको; गणेश नाईकांपुढे नवे सत्तासंकट
supriya sule interview
बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ सामना; सुप्रिया सुळेंसमोरील आव्हान मात्र वेगळंच