आजच्या काळातही आपण मुलींच्या कपडय़ावरून जजमेंटल होतो. तिनं काय घालावं, कसं राहावं याबाबतीत सल्ले देणारे तिच्या स्वातंत्र्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत नाहीत का?
देशाच्या ६७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मधुरा मैत्रिणीबरोबर बाहेर चालली होती. ‘अगं आता साडेसात वाजून गेले. या वेळी कुठे चाललीस?’ बाबांच्या या प्रश्नावर आजी, आजोबा, मोठा भाऊ, आई सगळ्यांनी आपापली जजमेंट्स दिली.. ‘सातनंतर असं बाहेर हिंडणं मुलीच्या जातीला बरं नव्हे’..‘अगं कपडे तरी बघ कसे घातलेस ते.. हे असं घालून जाणार आता बाहेर?’.. ‘ए.. हे काय? इतकं भडक लिपस्टिक? नक्की चालली आहेस कुठे चेहरा रंगवून?’..‘जपून हा बाळा, हल्ली कुणाचा भरवसा?’ हे असे किंवा यातले काही संवाद ऐकले की, नक्की आपल्या देशातल्या मुली स्वतंत्र आहेत का? असा प्रश्न पडतो.
‘मुलींचे कमी कपडे आणि मोकळे वागणे बलात्काराला आमंत्रण देतात.’ स्त्री-पुरुष समानतेचे गोडवे गाणाऱ्या आपल्या देशात आज स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षांनी हेच बोलले जात असेल तर हे मुलींच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या विरोधात नाही का? आपल्या आजूबाजूचा समाज सेफ राहिला नाही, हे वास्तव आहे. घरात, घराबाहेर, शाळा, कॉलेज कुठेच मुली सुरक्षित नाहीत त्यामुळे आमच्या पालकांना, हितचिंतकांना वाटणारी काळजी स्वाभाविक आहे. पण बलात्कार होईल, छेडछाड केली जाईल म्हणून मुलींच्या ड्रेसिंग स्टाइलवर किंवा त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधन घालणे कितपत योग्य आहे? स्त्री-पुरुष समानता असताना मुलींनी कोणते कपडे घालावे अथवा घालू नये याविषयी बोलताना त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असायला हवा हे मुलांनासुद्धा शिकवायला हवे. स्लिव्हलेस, हॉट पॅण्ट, बॅकलेस, मिनी स्कर्ट, वनपीस घालणारी मुलगी ‘फारच अ‍ॅडव्हान्स आहे’ असे लेबल लावले जाते. अंगप्रदर्शन हा त्यामागचा उद्देश नसून त्यामागे कम्फर्टेबिलिटीसुद्धा असू शकते, असा विचार केला जात नाही आणि साधे पारंपरिक कपडे घालणारी काकूबाई असा अंदाज कपडय़ावरूनच लावला जातो. मुलींबाबत आपण किती पटकन जजमेंटल होतो.. तेही त्यांच्या कपडय़ांवरून. म्हणजे तिनं काय घालावं,काय नाही याचा विचार आता समाज करणार.
स्त्री ही कोणतीही निर्जीव वस्तू नाही. तिला हवे तसे राहण्याचा, दिसण्याचा, वागण्याचा आणि असण्याचा पूर्ण हक्क आहे. स्वातंत्र्याविषयी प्रत्येकीच्या स्वत:च्या अशा कल्पना असतात आणि त्याविषयी आग्रहही असतात. फॅशन हे मुलींच्या फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशनचे माध्यम आहे. विविध रंग, स्टाइल्स, ज्वेलरी, हेअरस्टाइल, मेकअप यातून स्वत:ला व्यक्त केले जाते.  राहणीमानावरून एखादीविषयी समज अथवा गरसमज करून घ्यायला नकोत. जरा कानोसा घेतला तर  ‘डोण्ट बी जजमेंटल, अंडरस्टँड द ह्य़ुमनबिइंग इनसाईड’असे सांगणारे अनेक आवाज आपल्याला ऐकू येतील.

स्वातंत्र्य दिनाची ‘फिअरलेस गिफ्ट’
एका शॉपिंग साइटवर मुलींसाठी स्वातंत्र्यदिनाची एक वेगळी ऑफर देण्यात आलीय. स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘लाईमरोड.कॉम’तर्फे मुलींना पेपर स्प्रे भेट देण्यात येत आहे. १३ ते १५ ऑगस्टदरम्यान मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून ही ऑफर मिळू शकेल. ‘लाईमरोड.कॉम’च्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुची मुखर्जी यासंदर्भात म्हणाल्या, ‘स्त्रियांच्या सुरक्षेविषयी खूप काही बोललं जातं, पण प्रत्यक्षात उपाय मात्र खूप कमीजण सुचवतात. आम्ही मात्र या माध्यमातून एक चळवळ, एक कँपेन सुरू करू इच्छितो. प्रत्येक स्त्रीला घटनेनं स्वतंत्रपणे जगण्याचं स्वातंत्र्य दिलंय. स्त्रीच्या ‘फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन’चा आदर करायला हवा. तिला बंधनात जगायला शिकवण्याऐवजी आम्ही तिच्या हाती स्वसंरक्षणाचा एक उपाय देऊ इच्छितो. निर्भीडपणे जगण्याची, स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी ही चळवळ आहे.’
लाईमरोड या ई कॉमर्स कंपनीची स्टाईल डायरेक्टर अभिनेत्री नेहा धुपिया आहे. तिनंदेखील या ‘फ्रीडम फ्रॉम फिअर’ या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. भारतीय स्त्रियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना ती आता आपली सुरक्षा आपल्या हाती घ्या, असा सल्ला देते.

एखादा संदेश लिहिलेला टॉप घालून काहीही न बोलता ‘ती’ तिच्या कपडय़ाच्या माध्यमातून बरेच काही सांगून जाते तर दुसरी तिच्या शरीरावर कोरलेल्या टॅटूतून तिचं ‘ओपन माइंड, फ्री सोल’ दाखवू पाहते. मिक्समॅच कानातले, बोल्ड नेलपेंट, कपडे हा मुलींच्या चाकोरी मोडून वागण्याचा, वैयक्तिक स्वातंत्र्याचाच एक भाग आहे.

आपल्या भावना कळवा..
आजच्या जमान्यात मुलींना हे ‘फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन’ खरोखर मिळतं का? की आपण अजून बंधनात जगतोय असं वाटणारे प्रसंग येतात? हाती ‘पेपर स्प्रे’सारखं आयुध आवश्यक वाटतं का? ते हाती आलं तर खरंच सुरक्षित वाटेल का? १३ ते २५ वयोगटातील मुलींना आवाहन.. तुमचे असे ‘स्वातंत्र्या’चे अनुभव आम्हाला कळवा. तुमचं नाव, वय आणि राहण्याचं ठिकाण यासह २०० शब्दांत लिहून पाठवा – viva.loksatta@gmail.com  या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ‘फ्रीडम’ असं लिहा.