सिनेमातल्या फॅशनचा लगेच ट्रेण्ड बनतो; सेलेब्रिटींची फॅशन सगळ्यांनाच फॉलो करावीशी वाटते; पण चंदेरी पडद्यावरचं किंवा फॅशन रॅम्पवरचं हे स्टाइल स्टेटमेंट प्रत्यक्षात कसं मिरवावं यासाठी हा कॉलम.
‘फ्यूजन ड्रेसिंग’ ऐकायला जितकं छान, आकर्षक वाटत असतं, कॅरी करायला तितकंच कठीणही ठरू शकत. कपडय़ांचं टेक्श्चर, रंग, एम्ब्रॉयडरी, फ्लो या सगळ्याची काळजी फ्यूजन ड्रेसिंग करताना घ्यावी लागते. पण एकदा हे सर्व व्यवस्थितपणे जुळून आलं की मोहीम फत्ते.. ड्रेसिंगचं, स्टाइलचं कौतुक होणार हे नक्की! स्वरा भास्करच्या या फ्यूजन ड्रेसिंग स्टाइलकडेच पाहा ना. बॉलीवूडमध्ये प्रवेश केल्यापासूनच स्वराच्या अभिनयाइतकंच तिच्या ड्रेसिंग स्टाइल आणि फॅशनचंही कौतुक होतंय. एरवी बॉलीवूड नायिकांच्या सोफेस्टिकेटेड, एलिगंट पण साचेबद्ध लुकला फाटा देत स्वरानं प्रयोगशील आणि मॉडर्न लुकला आपलंसं केलं. ही स्टाइल ती उत्तमरीत्या कॅरीसुद्धा करते. या फोटोत दिसणारी स्वराची स्टाइल याची पावती देते. कॉटन सिल्कच्या नारंगी वन पीस ड्रेसवर थ्रेड वर्क केलेलं जॅकेट मस्त जुळून आलंय. डिझायनर अनिता डोंगरेच्या कलेक्शनमधील हा वन पीस ड्रेस मुळातच सुंदर आहे. बिहारमधील एका कार्यक्रमादरम्यान स्वरानं या ड्रेससह तिचा एकूण लुक सुंदर कॅरी केला. लुकचा प्लस पॉइंट तिची कंटेम्पररी ज्वेलरी आहे. सोबत न्यूड शेडचे प्लम्प शूज सगळं जुळून आलंय.
कसा कॅरी कराल?
स्वराच्या लुकचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो तिच्या ड्रेसच्या कापडाची निवड. कॉटन सिल्क कापडाला कॉटनचा थोडासा कडकपणा असतोच पण सिल्कची चमकही असते. त्यामुळे पार्टीवेअरमध्ये काही वेगळं ट्राय करायचं असेल, तर हे कापड उत्तम आहे. तसंच या कापडाचा सुटसुटीतपणा लुकला एक एलिगन्स देतो आणि प्रॅक्टिकॅलिटीदेखील देतो. इथे जॉर्जेट, नेट कापड तितकंसं जुळून आलं नसतं. स्वराने नारंगी रंगाच्या असिमेट्रिकल ड्रेससोबत एम्ब्रॉयडर जॅकेट घातलं आहे. त्यासाठी तिने गडद लाल, नारंगी अशा एकाच वर्गातील रंग निवडले आहेत. फ्यूजन ड्रेसिंगमध्ये अशा प्रकारे रंगांशी खेळायचं स्वातंत्र्य मिळतं. नेहमी कॉन्ट्रास्ट किंवा ठरलेलं कॉम्बिनेशन निवडायचं बंधन नसतं. फ्यूजन ड्रेसिंगमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडते, ज्वेलरी आणि अॅक्सेसरीज. थोडी हटके, बोल्ड ज्वेलरी तुमचा लुक उठावदार करते. नेहमीच्या नेकपीसबरोबरच इअरकफ, बाजूबंद, कमरपट्टा अशा हटके ज्वेलरीची निवड या लुकसाठी तुम्ही नक्कीच करू शकता. प्रसंग काय, ऑकेजन काय हे मात्र इथे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. शूजची निवड काळजीपूर्वकच करायला हवी. बेसिक शेडमधील प्लम्प, कोल्हापुरी चप्पल, मोजडी असे फुटवेअर ट्राय करायला हरकत नाही.
viva.loksatta@gmail.com