फेसबुकचं पान उघडलं की, मित्रमैत्रिणींच्या भिंतींवर त्यांनी शेअर केलेल्या भविष्यवाणीच्या पोस्ट्सची गर्दी दिसतेय. तुमच्या पार्टनरचं नाव कुठल्या अक्षरानं सुरू होईल पासून वयाच्या ८० व्या वर्षी कोणकोण तुमची मित्रमंडळी असेल.. पर्यंत रंजक भविष्य वर्तवणारी अ‍ॅप्स सध्या हिट आहेत.

वयाच्या ८०व्या वर्षीदेखील तुमचे मित्रमैत्रिणी कोण राहतील? तुमच्या लाइफ पार्टनरच्या नावाची आद्याक्षरं काय असतील? आजपासून दहा वर्षांनी तुमचं फेसबुक स्टेटस काय असेल?.. फेसबुकचं पान उघडलं की, धडाधड मित्रमैत्रिणींनी शेअर केलेल्या पोस्ट समोर येऊ लागतात. हल्ली त्यात या अशा भविष्यवाणी करणाऱ्या पोस्ट्सची भरती होतेय. हे असलं रंजक भविष्य वर्तवणाऱ्या अ‍ॅपची, साइट्सची सध्या आभासी जगात चलती आहे.
विरंगुळा म्हणून अनेक जण तिथे रमताना दिसतात. दहा वर्षांनी तुमचं स्टेटस काय असेल त्यावर तुमचे फ्रेण्ड्स काय कमेंट्स करतील हेदेखील या अ‍ॅप्सकडून वर्तवलं जातं. गंमत म्हणजे या असल्या ‘भविष्यदर्शी’ अ‍ॅपवर रमणारे आणि त्यांनी वर्तवलेलं भविष्य शेअर करणारे केवळ तरुण फेसबुकर्स नाहीत, तर सर्व वयोगटांतल्या नेटिझन्सना थोडी गंमत म्हणून का होईना या भविष्यातल्या गोष्टी जाणून घ्याव्याशा वाटताहेत. यातले प्रश्नही मजेशीर आहेत, त्यामुळे अर्थातच येणारं उत्तरदेखील तितकंच रंजक असतं. तुम्ही हरवल्यावर तुमचे मित्रमैत्रिणी काय करतील, तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्ती कोण हे तुम्हाला फेसबुकवर शेअर होणारी अ‍ॅप सांगतात. तुम्ही कोणत्या सेलेब्रिटीसारखे दिसता, तुम्ही कोणत्या सेलेब्रिटीसोबत आणि काय चॅट कराल, तुम्ही कोणत्या सेलेब्रिटीसोबत रिलेशनशिपमध्ये राहणार आहात याचं ‘भाकीत’देखील नोंदवलं जातं.
हे केवळ इतकंच नाही, तर तुमच्या मते प्रेमाची व्याख्या काय, तुमचं कुणावर प्रेम आहे, तसेच तुमचा लाइफ पार्टनर कोण असेल हेदेखील सांगण्याची किमया यातून साधली जाते. यातून दिल की बात समोर आलीच तर तेवढंच समोरच्याशी बोलायचा चान्स मिळतो. गंमत म्हणजे लहानापासून मोठय़ापर्यंत सगळे हे करताना दिसतात.
तुमच्या स्वभावाचा अंदाज घेण्यातदेखील मग हे मागे कसे राहतील? तुम्ही तुमच्या स्वभावातलं काय बदललं पाहिजे, तुमच्यातला स्ट्रॉग पॉइंट, वाईट सवयी यासोबत रागावल्यावर तुम्ही कोणत्या प्राण्यासारखे दिसता, कोणतं गाणं तुमच्यासाठी लिहलं गेलंय अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात.
या सगळ्यातून मरणाचीदेखील सुटका झालेली नाही. तुम्ही कधी मरणार आणि त्याचं कारण काय असेल, त्यावर तुमच्या मित्रमैत्रिणीची प्रतिक्रिया काय असेल हेदेखील सांगितलं जातं. एखादा खेळ खेळावा त्याच पद्धतीने हे सगळं केवळ मज्जा म्हणून केलं जातं आणि त्याकडे मज्जा म्हणूनच पाहिलं जातं. हे सगळं आपण शेअर करायचं की नाही हे प्रत्येकावर अवलंबून असतं, पण एक टाइमपास म्हणून सगळेच शेअर करून याची मज्जा घेतात. त्यातूनच मग त्यावर मिळणारे लाइक आणि कमेंट्समध्ये चर्चा रंगायला सुरुवात होतात. एखाद्याची टर उडवली जाते, तर काही जणांच्या मनात उगाच लाडू फुटतात, तर काहींना ते अगदीच ‘काहीही’ वाटतं.
एकूणच हा ट्रेण्ड आपल्याला फेसबुकवर पाहायला मिळतोय आणि ही भविष्यवाणी खरी ठरतेय का ते काही वर्षांनी मेमरीजच्या रूपाने पाहणं मज्जेशीर असेल एवढं नक्की. हे गंमत म्हणून केलं जातं, मात्र जर त्याचा वास्तवाशी काही संबंध आढळलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा.