‘आईशप्पथ..विसरलोच! माझी अटॅक करायची वेळ झालीये..’ असं म्हणून चिन्मयने ऐन रंगलेल्या गप्पांमधून कल्टी मारत त्याच्या क्लॅश ऑफ क्लॅन्सच्या गावात एन्ट्री केली.  श्वेताने एकदा व्हॉट्सअ‍ॅप केलं, ‘मला ना आता वेळ नाहीये; माझा गहू आता तयार झाला असेल. तो काढून तू माझ्या फार्मव्हीलच्या शेतात स्ट्रॉबेरी पेरशील का?’ असं सांगून श्वेतानं तिचा फेसबुकचा आयडी आणि पासवर्ड सोपवला देखील. कॅण्डी क्रश खेळणाऱ्याच्या फेसबुकवरच्या लाइफ मागणाऱ्या रिक्वेस्टचा कंटाळा येऊन एकानं त्यांना ब्लॉक केलंय. ‘क्रिमिनल केस’च्या मिस्ट्रीचे ‘फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट’ कधी येतील याची वाट बघणारे महाभागही आसपास सापडतात. ते रिपोर्ट बघून या व्हच्र्युअल जगातल्या सी.आय.डी ऑफिसर्सना केस सोडवायची असते ना!
या डायलॉग्जमध्ये आणि प्रसंगांमध्ये अजिबात अतिशयोक्ती नाही. विरोधी क्लॅनवर अ‍ॅटॅक करणारे योद्धे, ट्रॅक्टर विकत घेणारे शेतकरी, अवघड केसेस सोडवणारे सीआयडी ऑफिसर्स म्हणजे ते गेम खेळणारी तरुणाईच असते. इतका जीव ओतून खेळणारी तरुणाई आपल्या आसपास नक्कीच तुम्हाला दिसली असेल किंवा तुम्हीदेखील त्याचा एक भाग असालच. या ‘गेमाड’पंथीय लोकांचा हे ऑनलाइन किंवा मोबाइल गेम्स म्हणजे आयुष्याचा एक भाग झालेला असतो. त्यात ते आपलं काम अगदी चोख बजावत असतात. जीव ओतून खेळत असतात ते कधी योद्धा होतात तर कधी शेतकरी..! टाइमपास म्हणून खेळायला सुरुवात केलेल्या एखाद्या गेममध्ये मन गुंतत जातं आणि त्याची जणू सवयच लागते.
गेमिंग हा आता एक लाइफस्टाइलचा भाग झालाय. लहानापासून ते मोठय़ांपर्यंत प्रत्येक जण या गेमच्या विश्वात रमतात. हल्ली बऱ्याच ऑनलाइन आणि ऑफलाइन गेम्समध्ये काही वेळेची बंधनं किंवा टाइम ब्रेक असतातच. त्या टाइम ब्रेकनंतर अलार्म होतो, मग त्या वेळी आवर्जून तो गेम खेळला जातो. गेम खेळणाऱ्यांना याची इतकी सवय झालेली असते की दुसरं एखादं काम करताना त्यांच्या बॅक ऑफ द माइंड कुठे तरी त्या गेमविषयी विचार चालूच असतात.
गेम खेळणं इतकंच त्यात नसतं बरं का! क्लॅश ऑफ क्लॅन्स सारख्या खेळात तर हा खेळ खेळणारे आपल्याच क्लॅनच्या इतर प्लेयर्सशी मुद्दाम ओळख काढतात. मग त्यांच्याशी संपर्क साधून व्हॉट्सअप ग्रुप बनवून, भेटून मग गेमची स्ट्रॅटेजी ठरवणारे नि त्यानुसार खेळणारे क्लॅन्सचे ग्रुपही आहेत. हा गेम मग त्यांच्या मैत्रीचा दुवा बनतो. व्हच्र्युअल जगातले क्लॅनमेट्स प्रत्यक्ष आयुष्यातही मित्र होतात. कॅण्डी क्रश, पेट रिक्युजसारख्या गेममध्ये ‘लाइफ’ मिळवण्यासाठी अधीर झालेले तर मोबाइलच्या घडय़ाळाची वेळच पुढे नेण्याची शक्कल लढवतात. या गेम्सची वाढती क्रेझ पाहता लोक स्वत:च्या काल्पनिक जगात रमायला लागली नाहीत म्हणजे झालं..!
कोमल आचरेकर -viva.loksatta@gmail.com