अनोखं स्वागत

व्हिवा लाऊंजमध्ये गौरी शिंदेचं स्वागत झालं तेच टाळ्यांच्या गजरात.. व्हिवाची सेलिब्रिटी संपादिका सोनाली कुलकर्णी हिने ‘नवराई माझी नवसाची, नवसाची गं. आवड तिला चंद्राची, चंद्राची गं..’ या गाण्यावर सगळ्याच प्रेक्षकांना टाळ्यांचा ठेका धरायला लावला आणि आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे जगभरातील महिलांच्या भावनांना हात घालणाऱ्या गौरी शिंदेचं आगमन झालं.

लहानपणीची गौरी…
लहानपणी म्हणायचं तर पुण्यातलं कल्चर असं की अ‍ॅकॅडमिक गोष्टींवर भर दिला जातो. त्यामुळे बॉलीवूड वगैरे गोष्टी फार महत्त्वाच्या नव्हत्या. लहानपणी नाटकं खूप बघितली आहेत. आईवडिलांना खूप आवड आहे. मराठी नाटकं खूप पाहिली. सिनेमा एखादा चांगला आला तर बघायचा. सिनेमाची ओढ फार नव्हती. शाळेत नाटकं बसवली. कॉलनीत गणपतीसाठी नाटकं वगैरे बसवायला पुढे यायचे. त्या वेळी दिग्दर्शन वगैरे शब्दही माहीत नव्हते. हौस म्हणून आम्ही सगळं करायचो. अगदी घरगुती स्वरूपात.. माझ्या वडिलांनी मला जाहिरात क्षेत्राची ओळख करून दिली. दहावीत मला आर्ट्सला जायला लागतात त्यापेक्षा जरा जास्त मार्क मिळाले म्हणून मी कॉमर्सला अ‍ॅडमिशन घेतली. माझ्या मते मी खूप वेळ वाया घालवला कॉमर्स शिकण्यात. तिथे खूप मोकळा वेळ असायचा. त्यामुळे मी समर जॉब करायचाय, म्हणून वडिलांच्या मागे लागले. पण त्यांना माझी क्रिएटिव्हीटी माहीत होती. त्या वेळी मी कविता वगैरे करायचे. त्या अगदी घरातल्या लोकांपुढेच वाचून दाखवल्या होत्या. त्यामुळे वडिलांना माझ्यातला स्पार्क माहिती होता. त्यामुळे त्यांनी मला थोडा धीर धरायला सांगितला आणि त्यांनी मला पुण्यातल्याच एका अ‍ॅड एजन्सीमध्ये ओळख करून दिली आणि मी तिथे ट्रेनी कॉपी रायटर म्हणून जॉइन झाले. ती माझी खऱ्या अर्थाने सुरुवात होती. पुढे मी मुंबईला आले आणि मग पुढचा प्रवास सुरू झाला.

मुंबईतले दिवस
मुंबईची खूप ओढ होती कॉलेजपासून. मी मुंबईला जाणार, हे नक्की ठरवलं होतं. तिथे जाऊन काय करणार, हे ठरलं नव्हतं. पण सांस्कृतिक घडामोडी, करिअरच्या संधी यांचा विचार करता मुंबईत त्याही वेळी खूप काही घडत होतं. मी पुण्यात असताना कॉलेजदरम्यानच जाहिरात क्षेत्राची ओळख झाली होती. जाहिरात क्षेत्रात करिअर करण्याचंही नक्की झालं होतं. त्यामुळे मग पुढची पायरी म्हणून मुंबई गाठणं स्वाभाविकपणे आलंच. मुंबईत मी मास कम्युनिकेशन केलं. एक गोष्ट मला स्पष्ट करावीशी वाटते. माझ्या क्षेत्राबद्दल माझं शिक्षण झालं होतं. त्याबाबतीत मी ड्रॉपआऊट वगैरे नाही. कारण आजकाल आपल्या विषयात ड्रॉपआऊट असलेल्या आणि नंतर त्याच विषयात करिअर करणाऱ्यांबद्दल लोकांना खूप कुतूहल असतं. पण माझ्या बाबतीत कधीच तसं नव्हतं. घरी शिक्षणाचा हट्ट असल्याने माझं शिक्षण अगदी व्यवस्थित पूर्ण झालं. माझे दोन भाऊसुद्धा उच्चशिक्षित  आहेत. मी तेवढं नाही शिकले. पण एका गोष्टीची खंत नेहमी वाटायची की, आपण आर्ट्स नाही घेतलं. माझ्या करिअरमध्ये माझ्या आर्ट्सच्या शिक्षणाचा खूप फायदा झाला असता. त्यामुळे मी कॉमर्स केल्यानंतर साहित्यात एम.ए. केलं. दहावीत थोडेसे मार्क जास्त मिळाले म्हणून कॉमर्स जॉइन केलं.

मुंबई ते न्यूयॉर्क
मुंबईत मास कम्युनिकेशन करत असताना इंटर्नशिप करावी लागली. त्या वेळी मी सिद्धार्थ काक यांच्याकडे इंटर्नशिपसाठी होते. ‘सुरभि’ हा त्यांचा कार्यक्रम त्या वेळी टीव्हीवर चालू होता. त्या वेळी इलेक्ट्रॉनिक मीडियाची ओळख झाली. त्यानंतर मी जाहिरात क्षेत्रात आले. पण त्याही वेळी मनात होतं की, पुढे जाऊन मूव्हिंग इमेजेसमध्येच काम करावं. जाहिरात क्षेत्रात माझी सुरुवात झाली ती कॉपीरायटर म्हणून. त्यामुळे मी लिहीत होते. तिथे खूप अ‍ॅड फिल्म्स बनवतात, त्या सुपरवाइझ करण्यासाठी मी लिंटासमध्ये असताना फिल्म विभागात गेले. तिथे वेगवेगळ्या दिग्दर्शकांची शैली खूप जवळून पाहता, अनुभवता आली. त्या वेळी माझ्या मनात या सगळ्या क्षेत्राबद्दल खूपच जवळीक निर्माण झाली, असं म्हणता येईल. माझ्या जाहिरात क्षेत्राची मी खूप ऋणी आहे. तिथे काम करताना मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या गोष्टींचा उपयोग मला पुढे चित्रपट दिग्दर्शित करताना खूपच चांगल्या अर्थाने झाला. जाहिरात करताना मी थोडा ब्रेक घेतला आणि न्यूयॉर्कला जाऊन फिल्म मेकिंग कोर्स केला. मला आत्मविश्वास नव्हता. वाटायचं की, अ‍ॅड दिग्दर्शित करू या. पण कुठे सुरुवात करणार आणि कोण काम देणार, हा प्रश्न होता. या कोर्समध्ये मी एक लघुपट दिग्दर्शित केला होता. या लघुपटाची निवड बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाली. पुढे जाहिरात क्षेत्रात काम मिळवताना मला या लघुपटाचा खूप उपयोग झाला. काम मिळवण्यासाठी जाताना मी नेहमी हा लघुपट दाखवायचे. त्यामुळेच मला पुढच्या जाहिराती मिळाल्या. या जाहिराती करताना खूप वेगवेगळे अनुभव मिळाले आणि त्या अनुभवांनीच मला खूप शिकवलं.

अभिनयाकडे जावं वगैरे असं काही वाटलं नाही. कोणी, तू एवढी छान दिसतेस वगैरे काही म्हटलं नव्हतं. त्या वेळी माझ्या कुरळ्या केसांना स्टाइल स्टेटमेंट वगैरे नव्हतं. उलट कुरळे केस म्हणजे त्रास वगैरे वाटायचा. केस सरळ करायला काही प्रोडक्ट्सही त्या वेळी नव्हती. पण आता हे केस स्टाइल स्टेटमेंट आहे. आता जरा मी चांगले कपडे घातले म्हणून चांगली दिसते. पण तरीही अभिनयाकडे वळावं, असं कधीच वाटलं नाही.

पालकांचा पाठिंबा महत्त्वाचा
कॉलेजनंतर मुंबईत येण्याचा किंवा फिल्म कोर्ससाठी न्यूयॉर्कला जाण्याचा, दोन्ही निर्णय माझेच होते. ते धाडसी होते, यात वादच नाही. पण माझ्या आईवडिलांच्या पाठिंब्यामुळे मी हे धाडस करू शकले. मला आत्मविश्वास नव्हता. पण धाडस केल्यामुळे हे शक्य झालं. माझ्या आईवडिलांचा खूप पाठिंबा मला मिळाला. माझी आई कोल्हापूरची आहे. तिने मला खूप जपून वाढवलं असलं, तरी ती मनाने खूपच पुढारलेली आहे. तिच्यामुळेच मी एवढी पुढे येऊ शकले. आपण आपल्या आईला नेहमीच समजत असतो. पण आपण ते प्रेम दाखवायला घाबरतो. नेहमी आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, त्यांना ते सांगायला घाबरत असतो म्हणा, किंवा तयार नसतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या आईवडिलांवर प्रेम करत असते. पण काहीशा ‘रिबॅलियस’ स्वभावामुळे आपण आडमुठेपणा करत असतो. आपल्या संस्कृतीतही, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, असं आईबाबांना जाऊन सांगत नाही.

‘इंग्लिश विंग्लिश’चा जन्म
नेमक्या याच भावनेतून इंग्लिश विंग्लिशचा जन्म झाला. बायकांमध्ये जी असुरक्षितता दडलेली असते, ती मला मांडायची होती. इंग्लिश हे माध्यम होतं, ती असुरक्षितता दाखवायचं. माझ्या आईत तो असुरक्षितपणा मी अनुभवला होता. पण मी काही या चित्रपटातली सपना नव्हते. म्हणजे, लहानपणापासून मी माझ्या आईला दुखावलं आहे. त्या वेळी कदाचित मला जाणवलं नसेल ते, पण नंतर वळून पाहताना वाटतं की, आपण किती चुकलो. त्यामुळे या चित्रपटाद्वारे मला माझ्या आईला ‘सॉरी आणि थँक्यू’ दोन्ही म्हणायचं होतं. आपण जे अनुभवतो, आपल्या आजूबाजूला जे काही घडत असतं, त्याचं निरीक्षण करतच असतो. माझ्या मावश्या, आज्जी वगैरे यांनाही खूप यातना झाल्या आहेत. पण त्यांनी त्या कधीच बोलून दाखवलेल्या नाहीत. बायका स्वत:वर प्रेम करतात, हे मी खूप कमी वेळा पाहिलं आहे. त्या दुसऱ्यांसाठीच झटत राहतात. नेहमी इतरांसाठी म्हणूनच काहीतरी करत राहतात. आणि तरीही त्यांना म्हणावा तसा मान मिळत नाही. आपण वाढताना आणि लग्न झाल्यानंतर कळतं की, आईने किती सहन केलं आहे! आदर हा मागून मिळत नाही. लोकांना त्याची जाणीव व्हायला हवी. आई, मावशीही कधी आदर मागत नाहीत. पण आपण ती जाणीव ठेवून त्यांना दाद द्यायला हवी.

सुखाची आस मला..
चित्रपटातली शशी जशी मोकळी आहे, माझ्या प्रत्यक्ष आयुष्यात मीसुद्धा तशीच आहे. मला स्वत:ला दु:ख कुरवाळत बसायला अजिबात आवडत नाही. खूश राहूनच आपण सगळं काही मिळवू शकतो. आपला प्रत्येक तास, मिनीट खूप महत्त्वाचा आहे. तो हसत-खेळत घालवायला हवा. दु:ख वगैरे होतच राहणार. तो आयुष्याचाच भाग आहे. ते धरून ठेवणं योग्य नाही. इंग्लिश विंग्लिशमध्ये काही फार एडिट केलेलं नाही. फ्रेंच कुकसोबत मला शशीचं अफेअर दाखवायचं नव्हतं. ज्या बाईला इतकी र्वष कोणीही सुंदर दिसतेस वगैरे सांगितलेलं नाही. तिला अचानक कोणी सांगितलं की, सुंदर दिसतेस, तर तिलाही चांगलं वाटतं. त्याला आकर्षणच म्हणायला हवं, असं काही नाही. ते त्याच्याही पलीकडे जातं. पण मला माझ्या गोष्टीचा फोकस कुठेही हरवू द्यायचा नव्हता. मी त्या दोघांचे नातेसंबंध दाखवत बसले असते, तर मूळ कथेला धक्का पोहोचला असता. त्यामुळे तसं काही माझ्या मनातही आलं नाही.

स्त्रीच्या कोणत्या सायकॉलॉजीचा विचार केला होता?
कोणत्याही वयात कोणत्याही स्त्रीला काहीही दाद मिळाली, तर तिला आवडतंच. मध्यमवय म्हणजे काहीतरी कमी आहे, आणि आपण कमी सुंदर दिसतो, तर ते चूक आहे. एखाद्या ८० वर्षांच्या बाईला एखाद्याने, ‘तुम्ही खूप सुंदर दिसता’ असं सांगितलं तर तिलाही ते बरं वाटत असतं. यात वयाचा आडपडदा येत नाही. शशीचा आत्मविश्वास वाढलेला दाखवायचा होताच. पण तिने कधी मनातही आणलं नव्हतं की, असं काही होईल. तिच्या आयुष्यात आलेल्या प्रसंगाला ती कशी सामोरी गेली, एवढंच मला दाखवायचं होतं. यात सायकॉलॉजीचा विचार केला नव्हता.

कमर्शिअल फिल्म काढायचं धाडस तुला कसं झालं? अमेरिकेतल्या बायकांच्या मते आजच्या काळातली शशी गोडबोले आम्हाला खटकते. ती कोणीतरी बिहारी किंवा उत्तर भारतीय महिला दाखवली असती तर चालली असती. पण मराठी बायका स्वतंत्र विचार करणाऱ्या असतात. त्यामुळे ती शशी तू मराठीच का दाखवलीस?
मराठी संस्कृती मला माहिती आहे. इतर प्रांतांतील संस्कृती माझ्या फारशी परिचयाची नाही. माझ्या आईवरून मला शशी गोडबोले या पात्राची प्रेरणा मिळाली होती. त्यामुळे ही शशी गोडबोले माझ्या आईचं रूप आहे. मराठी माणसं खंबीर आहेत आणि स्वत:साठी काहीतरी करणारी आहेत, हे जगाला कळावं, अशी माझी इच्छा होती.

आजकालचे फिल्ममेकर्स दुसऱ्याच्या आयुष्यावर चित्रपट बनवतात. पण तू स्वत:च्या आयुष्यावर चित्रपट बनवलास. हे धाडस कसं आलं?
पहिली गोष्ट म्हणजे, या चित्रपटात काही माझं पूर्ण आयुष्य जसंच्या तसं नाहीये. माझ्या आईला खूप राग येईल की, तिला कोणताही फ्रेंच माणूस भेटला वगैरे असं मी दाखवलंय तर. कारण चित्रपटात तुम्ही गोष्टी शंभर टक्के खऱ्या दाखवू शकत नाही. कुठेतरी तुम्हाला काल्पनिक गोष्टींचा आधार घ्यावाच लागतो. मी असा विचार केला नाही की, हे खूप मोठं धाडस आहे. मी आपलं स्वत:ला जे वाटलं, ते माझ्या मनाच्या खरेपणाने लिहिलं. मी कोणतंही वैश्विक सत्य वगैरे मांडायचा प्रयत्नही केला नव्हता. पण कदाचित तुम्ही जेवढे खासगी बोलता, तेवढं ते वैश्विक बनतं, या उक्तीप्रमाणे ते वैश्विक वाटत असेल. आपण खरेपणाने एखादी गोष्ट मांडू शकलो, तर त्याचा चांगला परिणाम होतो. थोडंसं वाटलं होतं की, आईला वाईट वाटेल का? पण त्यामुळे किती बायकांच्या प्रश्नांना वाचा फुटली. तसंच इंग्रजी बोलता न येणं म्हणजे काही फार मोठा कमीपणा आहे, हा समजही बऱ्याच अंशी दूर झाला, असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही स्वत:शी प्रामाणिक राहून एखादी गोष्ट मांडलीत, तर ती सगळ्यांना आवडते.

तुला आवडलेली तुझी जाहिरात कोणती? की सगळ्याच जाहिराती तुला आवडल्या होत्या?
अजिबात नाही. उलट मला माझं काम काही दिवसांनी अजिबात आवडत नाही. ‘अरे बाप रे, मी किती विचित्र काम केलं’, असं वाटतं ते काम बघून! कदाचित तुमच्यापैकीही अनेकांना असं होत असेल. एखादं काम आपण केलंय त्याच्यापेक्षा जास्त चांगलं करू शकलो असतो, असं बऱ्याचदा वाटतं. हॅवेल्स वायरची एक जाहिरात होती. एक मोलमजुरी करणारी बाई स्वयंपाक करत असते. तिचा हात भाजत असतो आणि तिचा मुलगा तिला वायरची सांडशी बनवून देतो, अशा स्वरूपाची ती जाहिरात होती. ती माझी होती आणि अजूनही मला ती आवडते. त्याशिवाय अ‍ॅक्सिस बँक, तनिष्क वगैरेच्या जाहिरातीही माझ्या आहेत. सध्या अडीच र्वष एकही जाहिरात केलेली नाही. पण पुढे मला नक्कीच जाहिरात करायची आहे.

चित्रपट एका मराठी स्त्रीभोवती फिरतो. श्रीदेवीचं नावही अस्सल मराठमोळं म्हणजे शशी गोडबोले, असं आहे. असं असताना तिच्या तोंडी अधेमधे दोन चार मराठी वाक्ये का नाही आली? तिच्या कुटुंबीयांच्या तोंडी, सासूबाई सोडून, एकही मराठी संवाद का नाही?
माझं पहिल्यापासून स्पष्ट होतं की, श्रीदेवीसारखी अभिनेत्री, तिच्या तोंडून मराठी ऐकणं हे वास्तवाशी फारकत घेणारं ठरलं असतं. तिच्या तोंडी मराठी संवाद शोभूनच दिसले नसते. प्रत्येक माणूस आपली मातृभाषा बोलताना त्या त्या भाषेतले शब्द एका विशिष्ट पद्धतीने उच्चारतो. दुसऱ्या भाषेतील माणसाने कितीही प्रयत्न केले तरी त्याला तशा प्रकारे दुसरी भाषा बोलताच येत नाही. कितीही तालीम करूनही ते मराठी शब्द, वाक्य श्रीदेवीला बरोबर उच्चारता येत नव्हतं. तिच्या तोंडी मी ‘अगंबाई’, ‘काय गं’ वगैरे मराठी शब्द दिले होते. तो शॉट पुन्हा बघताना माझे मलाच ते खूप खटकले. तो संवाद ऐकल्यानंतर काही मिनिटं प्रेक्षक चित्रपटाबाहेर येण्याची शक्यता होती. म्हणूनच मी तो धोका टाळला. मराठी मला चांगली येते. त्यामुळे श्रीदेवी बोलत असताना मला ते खटकत होतं. त्यामुळे मी केवळ सुलभा देशपांडे यांच्या तोंडी काही मराठी संवाद दिले होते.

श्रीदेवीऐवजी इतर कोणी अभिनेत्री डोक्यात होती का?
मी काहीच ठरवलं नव्हतं. लिहितानाही माझ्या डोक्यात नव्हतं कोणाला घ्यायचं. त्या वेळी मी माझ्या आईला डोक्यात ठेवूनच लिहीत होते. म्हणजे, या प्रसंगात आई कशी वागली असती, असा विचार चालू असायचा. त्याप्रमाणे मी लिहायचे. ही शशी गोडबोले कोण साकारेल, असलं काही माझ्या डोक्यातही नव्हतं. पण लिहून झालं आणि त्यानंतर एक दिवस श्रीदेवी भेटली. तिने मला विचारलं की, सध्या काय चालू आहे? मी तिला माझ्या या स्क्रिप्टबद्दल सांगितलं. तिने मला विचारलं की, ती ऐकू शकते का? दुसऱ्या दिवशी मी स्क्रिप्ट घेऊन गेले आणि तिला वाचून दाखवली. ती ज्याप्रमाणे माझ्या वाचनाला, त्यातील प्रसंगांना प्रतिसाद देत होती, ते पाहून मी दोन मिनिटं स्तब्ध झाले. माझ्या डोक्यातली शशी त्या त्या प्रसंगांना ज्या प्रकारे व्यक्त झाली असती, त्याच प्रकारे श्रीदेवी ही स्क्रिप्ट ऐकताना होत होती. त्या वेळी श्रीदेवीमध्ये मला माझी शशी गोडबोले दिसली. इतर कोणत्याही अभिनेत्रीचा विचार मी आधी केला नव्हता. कदाचित तो केला असता तर इतर अनेक नावं आली असती. पण एक गोष्ट मान्य करायलाच हवी की, श्रीदेवीनेही अत्यंत ताकदीने ही शशी उभी केली आहे. आता तर मी शशी गोडबोलेसाठी तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे, तिच्यातला निरागसपणा इतर कोणातही नाही. खूप काम केल्यानंतर त्या वयात तेज असतं. पण तिच्यात ते अजूनही नाही. आपण जणू पहिल्यांदाच काम करतोय, या भावनेनेच ती माझ्याशी चर्चा करायची. तिची शिकण्याची वृत्ती तिच्या खूप उपयोगी पडली.

श्रीदेवीच्या आवाजाच्या बाबतीत नेहमीच प्रश्नचिन्ह होतं. त्यांचा आवाज खूपच पातळ आणि किनरा आहे, असा एक सूर ऐकू यायचा. पण या चित्रपटात तसं अजिबात जाणवत नाही. यामागचं कारण काय? डबिंग स्टुडियोतही तू प्रत्येक वेळी श्रीदेवीबरोबर होतीस का?
तुम्हाला खोटं वाटेल, पण या चित्रपटात शूटिंगच्या वेळीच त्यांचे आवाज रेकॉर्ड झालेले आहेत. त्यामुळे अगदी पाच टक्के चित्रपटच डबिंग करावा लागला. पण श्रीदेवीच्या आवाजाबद्दल ही गोष्ट नक्कीच खरी आहे की, तिचा आवाज काहीसा किनरा आहे. पण त्याहीबाबतीत आम्ही दोघींनी चर्चा करून त्यावर मार्ग काढला. कारण स्क्रिप्ट आणि ते पात्र याकडेच लोकांचं लक्ष जावं, असा माझा प्रयत्न होता. तिलाही हे समजलं. ती प्रचंड हुशार अभिनेत्री आहे. त्यामुळे कधी तिचा आवाज किनरा लागला की, तीच स्वत:हून विचारायची. मग आम्ही एकमेकींकडे पाहून हसायचो आणि ती पुन्हा तो किनरा आवाज टाळून शॉट द्यायची.

आर. बाल्की हे नाव खूप प्रसिद्ध आहे. तू म्हटलं होतंस की, मी बाल्कीपेक्षा चांगली दिग्दर्शक आहे. तर हा चित्रपट बनवताना तुझ्यावर काही दडपण होतं का?
‘मी बाल्कीपेक्षा चांगली दिग्दर्शिका आहे’ असं मी कोणत्याही मुलाखतीत म्हटलं नव्हतं. खूप बरं झालं की, मला हा प्रश्न विचारला गेला. मी कधीही माझी तुलना बाल्की किंवा इतर कोणाशीच केलेली नाही. या मुलाखतीच्या निमित्ताने मला पत्रकारितेचा एक वेगळाच अनुभव आला. पत्रकार कोणत्या गोष्टीला कसं वळण देऊ शकतात, देवालाही सांगणं अवघड आहे. मी काय बोलले आणि काय लिहिलं गेलं, हे खूप वेगळं होतं. त्या प्रश्नानंतर ती मुलाखतकार मला म्हणाली होती की, ही मुलाखत मी थोडीशी चटपटीत बनवणार आहे. पण प्रत्यक्षात मी वर्तमानपत्र उघडून पाहिलं, तेव्हा मला त्यातला ‘चटपटीतपणा’ काय आहे, तो कळला. पण मी असं काही बोललेच नव्हते. पण हा चित्रपट बनवताना माझ्यावर दडपण होतं, हे नक्की! बल्की प्रसिद्ध आहे, याचं दडपण होतंच. पण आपण स्वत:चं नाव बनवावं, हे त्याला भेटण्याच्या आधीपासूनच माझं स्वप्न होतं. त्यामुळे त्याच्यापेक्षा चांगलं वगैरे करण्याचा प्रयत्न मी केला नव्हता. तो खूप चांगले चित्रपट बनवतो, वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट बनवतो, हे मला खूपच आवडतं. त्याने ते तसे बनवले नसते, तर मला थोडीशी भीती वाटली असती. पण मला दडपण होतं एका चांगल्या कल्पनेचं. ती सुचली तरच चित्रपट बनवायचा हे माझं नक्की होतं. बल्की निर्माता असल्यामुळे मला माझं स्वातंत्र्य मिळालं. आयटम साँग किंवा पंजाबी गाणं हवंच, असा कोणताही हट्ट त्याने धरला नाही. त्याने मला प्रचंड मोकळीक दिली आणि तो माझ्यामागे खंबीरपणे उभा राहिला.

मराठी माणसाला एक विशिष्ट गंड असतो. म्हणजे तो स्वत:ला बिचारा समजत असतो. पण जाहिरात क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर मराठी माणसं आहेत. मराठी माणसाचा इंग्लिशविषयी किंवा अन्य भाषेविषयी असलेला गंड इतर भाषांमधील लोकांनाही त्यांची भाषा सोडून दुसऱ्या भाषांबद्दल वाटत असणारच ना! पण मग मराठी माणूस हा गंड कुरवाळत बसतो, असं वाटतं का?
पण हे फक्त मराठी लोकांचंच नाही, भारतीय लोकांचंच नाही, तर अगदी अमेरिकेपासून युरोपपर्यंत सगळ्यांचाच हा प्रॉब्लेम आहे. कित्येक स्पॅनिश लोकांना इंग्रजी येत नाही. त्यांना त्याचा गंडही वाटतो. आज इंग्रजी ही कॉर्पोरेट क्षेत्रापासून सगळ्याच क्षेत्रांमध्ये एवढी आवश्यक भाषा बनली आहे, किंवा बनवली गेली आहे की, ज्यांना ती येत नाही, त्यांना त्याबाबत सतत गंड वाटत राहतो. हा चित्रपट अमेरिकेत दाखवला गेला त्या वेळी अनेक इराणी, स्पॅनिश बायका माझ्याकडे आल्या आणि मला सांगितलं की, ही माझीच गोष्ट आहे. शशीचा अनुभव हा केवळ एका बाईचा नाही, तर तो पुरुषाचाही असू शकतो. ही एक मानवी भावना आहे.

या चित्रपटात इतर माणसं त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलतात, पण कोणत्याही संवादाला सबटायटल्स नाहीत. सबटायटल्स न देण्याचा निर्णय का घेतलास?
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा चित्रपट आपण शशीच्या पॉइंट ऑफ व्ह्य़ूने बघतो. तिला जे समजत नाही, पण जाणू शकते, ते मला दाखवायचं होतं. मला या चित्रपटातून हेच स्पष्ट करायचं होतं की, भाषा महत्त्वाची नाही, तर भावना महत्त्वाच्या आहेत. माझ्या मते माझा हा उद्देश यशस्वी झाला आहे. कारण चित्रपट चालू असताना कोणीही, तो किंवा ती काय म्हणाली, असा प्रश्न विचारला नाही. कदाचित उत्सुकतेपोटी विचारला असेल. पण ती भाषा न कळल्याने भावना समजून घेताना काहीच अडचण आली नाही. आपण भाषेच्या पलीकडे जायला हवं. आता तर ‘इंग्लिश विंग्लिश’चा दुसरा भाग बनवा, अशी विनंतीही प्रेक्षकांकडून यायला लागली आहे. पण मला कळत नाही की, त्यात पुढे काय दाखवणार!

न्यूयॉर्कच्या लँग्वेज स्कूलमधील कॅरेक्टर्स आणि कलाकार कसे शोधलेत?
मी न्यूयॉर्कमध्येच माझा शॉर्ट फिल्म कोर्स केला होता. त्या कोर्समध्येही वेगवेगळ्या देशांमधील अनेक विद्यार्थी माझ्याबरोबर होते. त्यामुळे मला तिथेच असा अनुभव मिळाला होता. त्यानंतर मी लोकेशन शोधायला न्यूयॉर्कला गेले होते, तेव्हा एका लँग्वेज स्कूलमध्ये अ‍ॅडमिशन घेऊन दोन-तीन दिवस घालवलेत. तिथे मला लँग्वेज स्कूल, तेथील वातावरण याची बऱ्यापैकी कल्पना आली. मग काही गोष्टी मी पुढे कल्पनेतूनच त्यात घातल्या. आता अमेरिकेत अनेक दक्षिण भारतीय आहेत. त्यापैकी काहींना चित्रपटातल्या लँग्वेज स्कूलमध्ये पाठवलं. हा चित्रपट लिहिताना मला माझ्या एका मित्राचीही खूप मदत झाली. कृष्णन हरिहरन नावाचा माझा मित्र, सहकारी चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट लिहिताना सातत्याने माझ्याबरोबर होता. लिहिताना मला कोणीतरी बरोबर लागायचं. एकटं काम करणं खूप कठीण होतं. लिहिताना माझं लक्ष विचलित होणार नाही, याची काळजी त्याने घेतली. आम्ही दोघं एकत्र चर्चा करत असू. तो मला त्याची मतं सांगत होता. माझ्या चित्रपटाच्या श्रेयनामावलीतही साहाय्यक लेखक म्हणून त्याचं नाव आहे.

जाहिरात क्षेत्र हे तुझं मूळ क्षेत्र आहे. ते चित्रपटाइतकंच कलात्मक आहे. त्याच्याविषयी काही सांगशील का? तसंच कोणत्या चित्रपटांनी, दिग्दर्शकांनी तुझ्यावर प्रभाव टाकला होता?
जाहिरात क्षेत्रात वेळ आणि आपण ही मोठी स्पर्धा असते. कमीतकमी वेळात आपण आपलं म्हणणं कसं मांडू शकू, हे तिथे आव्हान असतं. छोटय़ात छोटी जाहिरात अगदी दहा सेकंदांतही संपते. किंवा त्याहीपेक्षा कमी वेळात संपू शकते. आपल्याला कळतही नाही, आणि जाहिराती येऊन जातात. क्रिकेट मॅचच्या वेळी तर प्रत्येक सेकंद खूप महाग असतो. त्यामुळे आपली जाहिरात कमीतकमी वेळात आणि किती सुंदरपणे आणि किती स्पष्टपणे करू, ही गंमत असते. त्याची मदत चित्रपटातही होते. जाहिरात करताना तिला एक कथा असायला हवी. त्यात काहीतरी मानवी भावना असायला हव्यात. मला जाहिरातीत माणसं असावी लागतात. त्यात मजा येते. ग्राफिक्सपेक्षाही हे जास्त आव्हानात्मक असतं. दिग्दर्शकांनाही या क्षेत्रात अशाच प्रकारे नेमतात. म्हणजे, लहान मुलांच्या जाहिरातींसाठी अमक्या दिग्दर्शकाला घ्या, गाडीच्या जाहिरातीसाठी अमक्याला घ्या, अशी विभागणी या क्षेत्रात केलेली असते. प्रत्येक जाहिरातीची एक स्क्रिप्ट येते. पण त्याला दृश्य स्वरूप कसं मिळेल, हे दिग्दर्शक ठरवतात. पण शेवटी ही सांघिक कामगिरी आहे. दिग्दर्शक आणि कॉपीरायटर दोघे एकत्र येऊन हे काम करतात. आम्हा दिग्दर्शकांना कोणती कंपनी नसते. अ‍ॅड एजन्सीज जाहिराती लिहितात. त्यांच्या कन्सेप्ट ते आम्हाला पाठवतात. ते आम्हाला बोलावतात आणि मग आम्ही एकत्र काम करतो. चित्रपटच नाही, तर संपूर्ण आयुष्याचा प्रभाव माझ्यावर पडला आहे. सत्यजित रे, हृषीकेश मुखर्जी आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट बनवणारे सगळेच दिग्दर्शक मला आवडतात. उमेश आणि गिरीश कुलकर्णी, परेश मोकाशी हे मराठीतले दिग्दर्शक आवडतात. प्रादेशिक चित्रपटही मला आवडतो.

भारतातल्या जाहिरातींमध्ये प्रामुख्याने गोऱ्या किंवा सुंदर मुलींना यश मिळतं, असं दाखवलं जातं. किंवा कोणत्याही उत्पादनाच्या जाहिरातीत बाई असते. असं का? दिग्दर्शिका म्हणून अशा कोणत्या जाहिराती केल्या आहेस का?
नाही. अशा जाहिराती मी अजिबात केलेल्या नाहीत. मला अशा जाहिरातींबद्दल विचारणा झाली होती. पण मी त्या नाकारल्या. मला नाही पटत. मुलींना यश काही त्यांच्या रंगावर मिळत नाही. पण भारतात हे आहे. बायका स्वत:च म्हणतात की, माझ्यासाठी सून गोरी हवी. पण त्याला जाहिरातींमधून पाठिंबा का द्यावा.

तीस सेकंदांची जाहिरात बनवणारी गौरी आणि दोन तासांचा चित्रपट बनवणारी गौरी, यात काय फरक जाणवला? आणि या दोन माध्यमांमध्येही काय फरक जाणवला?
आपल्याला हवं ते आपण मांडू शकतो, हे माझ्या बाबतीत चित्रपटांमध्येच झालं. जाहिरात क्षेत्रात आपण एक उत्पादन विकत असतो आणि तुमच्या कामाला तो उत्पादक मान्यता देत असतो. त्यामुळे त्याला पटेल, असं काम तुम्हाला करावं लागतं. जरा बारकाईनं पाहिलं, तर चित्रपट हेदेखील एका उत्पादनासारखंच आहे. फक्त तिथे प्रेक्षक तुमच्या कामाला मान्यता देतात. पण चित्रपटात मिळणारा अनुभव हा पूर्णपणे स्वत:चा आहे. माझा चित्रपट पडला, तरी त्याला मी जबाबदार आहे; आणि चालला, तरी त्याला मीच जबाबदार आहे. लोक चित्रपट पैसे देऊन बघतात. तर जाहिराती तुमच्यावर थोपवल्या जातात.

तू मराठीत चित्रपट करणार का?
तशी कल्पना मराठीत असेल, तर मला नक्कीच आवडेल. ‘इंग्लिश विंग्लिश’ ही एका मराठी कुटुंबाची गोष्ट असूनही मी तो चित्रपट हिंदीत का केला, असा प्रश्न मला अनेकांनी विचारला होता. पण माझ्या मते मराठी कुटुंब हे प्रातिनिधिक आहे. खरंतर ही समस्या जागतिक आहे. मी हा चित्रपट मराठीत केला असता, तर त्याला पुन्हा भाषेचं बंधन आलं असतं. मराठी लोक हिंदी चित्रपट बघतातच. त्यामुळे ते माझा चित्रपट नक्कीच बघणार, याबाबत मला खात्री होती. मला वाटतं की, विषय चित्रपटाची भाषा ठरवतो. ‘गाभ्रीचा पाऊस’ हा चित्रपट कधीच हिंदूीत बनू शकत नाही. कारण त्या विषयाला मातीचा एक गंध आहे. तो त्या मातीची भाषा घेऊनच तुमच्यासमोर येऊ शकेल आणि जास्त परिणाम करू शकेल. तर माझ्या मते, चित्रपटाचा विषय चित्रपटाची भाषा ठरवत असतो.

तू चित्रपटाचं श्रेय तुझ्या इतर टीमला किती देतेस?
सर्वात जास्त. कारण माझी इतर टीम होती म्हणूनच मी हा चित्रपट पूर्ण करू शकले. मी माझ्या याआधीच्या मुलाखतींमध्येही याचा वारंवार उल्लेख केला आहे. तुम्हीही इथे मला श्रीदेवीबद्दल प्रश्न विचारलेत. पण हा चित्रपट यशस्वी होण्यामागे एकटय़ा श्रीदेवीचा वाटा नाही. माझा कॅमेरामन, एडिटर, संगीत दिग्दर्शक यांच्यापासून ते अगदी सेटवरच्या स्पॉट बॉयपर्यंत सगळ्यांनाच त्याचं श्रेय जातं. मी एकटी काहीच करू शकले नसते.

प्रेक्षकांनी बघितलेला चित्रपट आणि दिग्दर्शकाला दाखवायचा होता तो चित्रपट, असं काही वेगळं होतं का? तसंच तो एवढय़ा मोठय़ा स्तरावर गाजेल, असं वाटलं होतं का?
चित्रपट एवढय़ा मोठय़ा स्तरावर गाजेल, याबाबत काहीच कल्पना नव्हती. मी केवळ परफेक्ट काम करण्याचा प्रयत्न केला होता. चित्रपट एकदा संपला, प्रमोशन सुरू झाले. त्यामुळे मला विचार करायला वेळच नव्हता. पण चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहिला आणि मला विश्वासच बसत नव्हता. आणि खरं सांगायचं, तर मला सांगायचं होतं, ते मी व्यवस्थित मांडलं आणि लोकांनाही तेच कळलंय.

तुला कोणाकडून प्रेरणा मिळते?
मला अनेक लोकांकडून प्रेरणा मिळते. एकाच व्यक्तीकडून प्रेरणा मिळते, असं होत नाही. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या लोकांनी मला प्रेरणा दिली आहे. एखादं पुस्तकही मला प्रेरणा देऊन जातं. एक सामान्य माणूसही मला प्रेरणा देतो.

इंग्लिश विंग्लिशच्या संगीतात तुझा किती सहभाग होता?
मी खूप गुंतले होते. स्वानंद आणि अमित मला मित्रांसारखे आहेत. आम्ही तिघांनी एकत्रपणे केलंय ते सगळं. प्रत्येक गाण्याचं वजन काय आहे, हे ओळखूनच आम्ही ती गाणी केली होती. अमित रात्री रात्री चाल बांधायचा आणि मला फोन करून ऐकवायचा. त्यामुळे या चित्रपटाच्या गाण्यांमध्येही माझा खूप जास्त सहभाग होता.

राजेश्री राजपूत
‘व्हिवा लाऊंज’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रगतीच्या रुंदावणाऱ्या कक्षा आणि वेगळ्या क्षेत्रांची ओळख होतेय. या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन आपल्याला ओळखायला हवं. तरुणींसाठी हे क्षेत्र सुरक्षित आहे, हा चौकटीबाहेरचा विचारही या कार्यक्रमामुळे पुढे आलाय.

वेदांती दाणी
(लघुपट दिग्दर्शिका)
लाइफ इज मोअर ड्रेमेटिक देन सिनेमा. एक नवीन इन्सपिरेशन या कार्यक्रमामुळे मिळालं. या कार्यक्रमामुळे गौरी शिंदेसारख्या मोठय़ा लोकांना भेटता येतं. त्यांना समजून घेता येतं. आपण त्यांना आपल्या मनातले प्रश्नही विचारू शकतो. त्यामुळे कोऑर्डिनेशनसाठी हा प्लॅटफॅार्म अतिशय छान आहे.

प्राची कथले
कार्यक्रम खूपच चांगला होता. प्रत्येक गोष्टीत यशस्वी व्हायचं असेल तर त्याचं शिक्षण घेणं काम करण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे कामात जो बदल होतो तो अप्रतिम असतो. त्यांचं उदाहरण म्हणजे गौरी शिंदे. तिच्यामुळे माझ्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदललाय.

निकिता कदम
मी पहिल्यांदाच ‘व्हिवा लाऊंज’च्या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम खूपच आवडला. गौरीचा स्ट्रगल तर समजलाच, पण इतर अनेक गोष्टीही तिच्याकडून जाणून घेता आल्या.

अमृता कामत
कार्यक्रम फारच आवडला. ‘इंग्लिश िवग्लिश’ ही फिल्म आमच्या ग्रुपमध्ये सर्वाना आवडली होती. मुलाखतीच्या निमित्तानं त्या फिल्ममधले आणखी बारकावे कळले.  

रुपाली राजपूत
गौरी िशदे यांच्या सिनेमाचा विषय, मांडणी प्रत्येक मुलीने या कार्यक्रमांतून ‘स्व’ची ओळख निर्माण करावी, अशी प्रेरणा देणारा हा कार्यक्रम आहे.

स्वप्नाली खरात
कार्यक्रम खूप आवडला. चित्रपट क्षेत्राविषयी माहिती कळली. शिवाय गौरीने दिलेल्या उत्तरांमुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली.

कांचन उतेकर
कार्यक्रम खूपच सुंदर झाला. गौरी िशदे मूळची पुण्याची आहे, हे ऐकून अभिमान वाटला. एकूणच मुलाखत आणि  प्रश्नोत्तरं छान वाटली.

सुचिता काळे
काय मस्त कार्यक्रम होता हा ! मी पुढच्या कार्यक्रमाला नक्की येणार. एवढय़ा छान सेलिब्रिटींशी ‘व्हिवा लाऊंज’मुळं आम्हाला संवाद साधायला  मिळतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे.

स्नेहल
कार्यक्रम चांगला वाटला. शिकण्यासारख्या खूप काही गोष्टी यात होत्या. या फिल्डमध्ये इंटरेस्ट असल्यानं मी आर्वजून या कार्यक्रमाला हजर होते.

निशिगंधा वेदपाठक
खूप छान कार्यक्रम होता. हॅट्स ऑफ गौरी!  मस्त मूव्ही केलायेस. ‘व्हिवा लाऊंज’चा कार्यक्रम नेहमीच प्रेरणादायी ठरतो.  

अश्विनी खरात
या मुलाखतीतून चित्रपट आणि जाहिरात क्षेत्राविषयीची उत्तम माहिती मिळाली.

पूजा सावंत
‘व्हिवा लाऊंजचा हा अनुभव अवर्णनीय होता. डिरेक्शन, अ‍ॅडव्हर्टाइझमेंट याबद्दल मोलाचं मार्गदर्शन मिळालं. प्रोफेशनल इंटरव्ह्य़ू न वाटता ती गप्पांची मफील वाटत होती. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याबद्दल थँक्स टू व्हिवा लाऊंज.

शब्दांकन : रोहन टिल्लू / संकलन : राधिका कुंटे, भक्ती सोमण, प्रियांका पावसकर