सध्याच्या धावपळीच्या जगण्यात आपण कधीतरी स्वत:पासूनच हरवत जातो. कामाच्या, जबाबदाऱ्यांच्या रगाडय़ात स्वत:साठी, स्वत:च्या आनंदासाठी वेळ मिळत नाही. मग स्वत:ला आवडणाऱ्या गोष्टीसाठी मुद्दाम वेळ काढावासा वाटतो. कधी कधी साचलेल्या कामांचा ताण खूप असतो, खूप काम केल्यानंतर शरीराबरोबर मनही थकतं आणि त्याला पुन्हा उत्साही करण्यासाठी थोडे स्वत:चे लाड करावेसे वाटतात. दुसरा कुणीतरी आपल्यासाठी काही करेल, करून देईल याची वाट न बघता स्वत:चे लाड करून घ्यायचे आता अनेक मार्ग आहेत. लाइफस्टाइल सेवा यामध्ये मोडणारा सेल्फ पॅम्परिंगचा सध्याचा लोकप्रिय मार्ग म्हणजे स्पा.
आपल्या मनावर असलेल्या ताणाची कधी कधी आपल्याला जाणीवही होत नाही. यासाठीच हल्ली काही जण ‘क्वालिटी टाइम’ काढून स्वत:साठीच आपणहून काहीतरी स्पेशल करत असतात. ब्युटी ट्रीटमेंट्स करून घेणं, एखाद्या छानशा कॅफेमध्ये स्वत:ला ट्रीट देणं, मेकअप, शॉपिंग या सेल्फ पॅम्परिंगच्या इतर गोष्टींबरोबर हल्ली खूप मुली स्पा ट्रीटमेंट्स, मसाज या गोष्टी करून घेतात.
मुंबईची प्रोफेशनल सानिका ओक म्हणते, ‘मी सुरुवातीला सालसा ट्रेनर होते. अभ्यास, क्लास दोन्ही करून मी कधी कधी थकून जायचे. कुणीतरी छान डोक्याला मसाज करून द्यावा, रिलॅक्सिंग वेळ द्यावा, असं वाटायचं. पण हल्ली सगळेच बिझी. म्हणून मी इतर कोणावरही अवलंबून न राहता स्वत:साठी हेअर स्पा करून घ्यायचं ठरवलं. पहिला अनुभवच खूप रिलॅिक्सग होता. मग मी रेग्युलरली स्पा करायला लागले. यामुळे सगळा थकवा निघून जायचा. पुन्हा कामासाठी मन तयार व्हायचं.’
फुल बॉडी स्पा, हेयर स्पा, फूट स्पा, स्किन केयर स्पा अशा स्पा प्रकारांना हल्ली मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. या स्पा ट्रीटमेंट्स बरोबरीने फेशियल ट्रीटमेंट घेण्यावरही हल्ली मुलींचा भर दिसून येत आहे. प्रॉडक्टचं किट बाजारातून विकत आणलं की, घरच्या घरीसुद्धा आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपण स्वत:साठी स्पा करू शकतो. तसंच हल्ली अनेक ब्युटी एक्सपर्ट्स होम सव्र्हिस देतात. आपल्या घरी येऊन पार्लरप्रमाणेच उत्तम ट्रीटमेंट आपल्याला देतात.

फुल बॉडी स्पा
या प्रकारामध्ये वेगवेगळी लोशन्स, तेल, सुगंध वापरून संपूर्ण शरीराला सूिदग मसाज दिला जातो. शरीराचे स्नायू त्यामुळे मोकळे होतात. सुगंधामुळे शरीराबरोबर मनालाही तजेला मिळतो. त्यामुळे छान रिलॅक्स वाटतं.

हेअर स्पा
खरं तर आजीच्या हातांनी केसाला चंपी करून घेण्याची मजा ‘हेयर स्पा’मध्ये नाही. त्यात आजीच्या हाताची माया असते. या घरगुती मायेच्या चंपीला दिलेलं मॉडर्न रूप म्हणजे हेअर स्पा. यामध्ये प्रशिक्षित मसाजिस्ट आपल्या डोक्याला छान मसाज करून देते. त्यानंतर गरम पाण्यानं हेअर वॉश दिला जातो. मसाजसाठी वापरण्यात येणारी सुगंधी द्रव्यं औषधासारखी उपयुक्त असतात. केसांचा पोत सुधारण्यासाठी, आवश्यक पोषकत्त्व त्यामध्ये समाविष्ट केलेली असतात. नंतरच्या हेअरवॉशमुळे आधी केलेली ट्रीटमेंट केसांच्या मुळांपर्यंत पोहोचते. मसाजमुळे रिलॅक्स वाटतं आणि केसांचा पोतही सुधारतो. काही हेअर स्पा ट्रीटमेंटमध्ये केसांचं स्मूदनिंगही करून दिलं जातं. केसांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही उपचारपद्धती चांगली असते.

फूट स्पा व स्किन केअर स्पा
फूट स्पामध्ये पेडीक्युअर ट्रीटमेंट दिली जाते. पण यामध्ये पाय स्वच्छ करून मसाज करताना केवळ पायाचं सौंदर्य नाही, तर मनाला आराम मिळेल असं वातावरण निर्माण केलं जायला हवं. स्कीन केअर स्पामध्ये प्रत्येक स्कीन टेक्श्चरनुसार ट्रीटमेंट दिली जाते. कांती नितळ होण्यास मदत होते.