खरंच नियम आणि कायदे नुसते करून आणि अमलात आणून भागत नाही.. वारंवार त्यांची आठवण करून द्यावी लागते.
खूप शूटिंग आणि त्यानिमित्तानं फार प्रवास चालू आहे. बऱ्याच दिवसांनी मुंबईत परत आले आणि धावपळीचा नसलेला एक निवांत दिवस सुरू केला. संध्याकाळी बाळाला फिरायला घेऊन गेले. खेळून झाल्यावर छान सूर्यास्त होईपर्यंत एका पायरीवर बसणे. बाळाला नेहमीचे भूभू, मनिमाऊ, काऊ वगैरे भेटले. ओळखीच्या आज्जी-आजोबा, ताई-दादांना टाटा करून आम्ही घरी यायला निघालो. अजून अंधार झाला नव्हता. छान संधिप्रकाश होता. आमच्या नेहमीच्या गल्लीकडे गाडी वळवली- म्हटलं भाज्या फळं घेऊनच घरी जावं. कोथिंबीर संपत आली होती. कोशिंबिरीसाठीही काही उरलं नव्हतं. पैशाची पर्स, कापडी पिशवी आणि बाळाला कडेवर घेत मी गाडीतून उतरले.
एकदम चरकारायला झालं. समोर भाजीवाल्यांचे ठेलेच नव्हते. फळवालेही नव्हते. रस्ता सुनसान दिसत होता. ओळखीचा एक चेहरा दिसेना आसपास. मी मान वळवून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पाहिलं. तिथलेही भाजीवाले गायब! पुढे कोपऱ्यापर्यंत नजर टाकली-नाहीच कुणी! क्षणभर धस्स झालं छातीत. म्हटलं, काहीतरी झालं वाटतं शहरात! काही दुर्घटना झाल्याशिवाय असं बंद कशाला होईल सगळं? कुणाला विचारावं- तर आसपास कुणी रेंगाळतही नव्हतं. झूमझूम करत गाडय़ा पळत होत्या. घराजवळ कोपऱ्यावर गाडी उभी करणाऱ्या भाजीवाल्याकडे मोर्चा वळवला तर त्याचाही पत्ता नाही! एवढंच नाही तर समोरचे फूलवाले, शहाळंवाला कुणीच नाही. आधी वाटलं भाजी संघटनेचे कुणी मामा, काका उपरवाल्याला प्यारे झाले असावे. पण..
.मग कळलं. पोलिसांनी चक्क बेकायदा भाजीवाल्यांचं उच्चाटन केलं होतं! त्या दिवशी दहा रुपयांच्या कोथिंबिरीसाठी पन्नास रुपये खर्च करून मला स्टेशनजवळच्या मार्केटपर्यंत जावं लागलं. तिथेही तीच तऱ्हा. फुटपाथवर एकही (मुंबईच्या भाषेतला) मसालेवाला नाही. लिंबू, मिरची, कोथिंबीर, कडिलिंब विकणारा. शेवटी अगदी आत भाजीच्या गाळ्यांपाशी पोचेस्तवर हुरूपच आला मला. काय मस्त! कित्ती जागा होती चालायला. अतिक्रमण केलेल्या विक्रेत्यांना हटवल्यामुळे फुटपाथवर किती नीट चालता येत होतं. तसाच अधिकृत व्यावसायिकांना कधी नव्हे ते स्वच्छ व्यवहार करता येईल, त्यांच्यापर्यंत ग्राहक पोचतील, कदाचित त्यांना दोन पैशांचा फायदाही होईल. ‘किती वेगळा वाटतोय रस्ता, मार्केट.’, असं मी एका विक्रेत्याला म्हणायला गेले तर तो म्हणाला, ‘‘कसलं काय. दोन दिवसाचं नाटक आहे नेहमीसारखं. पुढच्या आठवडय़ात पुन्हा पहिले पाढे पंचावन्न दिसतील.’’ वजनाच्या जागी दगड नाही, वजन ठेवून भाजी मोजणारा तो प्रामाणिक भाजीवाला प्राक्तन स्वीकारल्यासारखा दिसत होता.
पण खरंच दोन दिवसांनी जिमला चालत जाताना पाहिलं तर काय. शहाळंवाला इकडे तिकडे पाहात अंदाज घेत होता. ‘चाहिए क्या नारियल.’, असं ब्लॅकनी तिकीट विकणाऱ्यांसारखा खुसफुसत विचारत होता. बिळातल्या उंदरासारखा एक भाजीवाला शेजारच्या कंपाऊंडमधून आत बाहेर करत होता. त्याने बिल्डिंगच्या गेटमागे भाजी लपवून ठेवली होती. आणखी एक जण फुटपाथच्या मध्यभागीच उगवल्यासारखा त्याच्या भाजीच्या जागेवर बसून होता. ते पाहिल्यावर- पहिल्यांदाच माझ्या डोक्यात प्रकाश पडला. की इतके दिवस अनेकदा मी अनधिकृत माणसांकडून भाजी विकत घेत होते! गुन्हा जितका त्या भाजीवाल्यांचा, तितकाच माझाही आहे. मी कधीच त्यांच्याकडे लायसन्स आहे की नाही याची चौकशी सोडा, फिकीरसुद्धा केली नव्हती. दोनतीन भाजीवाल्यांशी तर माझी दोस्तीसुद्धा झाली होती. एकाने टेम्पोत लपवलेल्या भाज्या घ्यायला मी परवा नकार दिला- तर त्याच्या चेहऱ्यावर ‘गद्दार हो तुम’ असा भाव दिसला!
कायदेशीर परवाना नसलेल्या कितीतरी गोष्टी अंगवळणी पडत चालल्या आहेत. कुठल्याही परिसरात एक चक्कर मारून बघा जमलं तर. इतके प्रशस्त वाटतायत सगळे रस्ते. एरवी आसमंतात एवढा गोंगाट भरलेला असतो- की कारण नसताना कावून जायला होतं. परवा आमच्या हरचेकर ज्युवेलर्समधून बाहेर पडले तर छोटी खोपटी, फेरीवाले हटवल्यामुळे चक्क शुकशुकाट होता सगळीकडे. आणि जरा निवांत सुस्काराच बाहेर पडला तोंडातून. ही मोहीम घडवल्याबद्दल महानगर पालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांचं हार्दिक अभिनंदन. पैसे खाणे, हफ्ते वसूल करणं आणि मग कुठलाही काळा धंदा व्हाइट कॉलरवाला करणं- हीच ओळख झाली आहे दुर्दैवानं आपल्या व्यवस्थापनाची. पण त्याला खोटं पाडत बेकायदेशीर विक्रेते आणि आमच्यासारखे सोयीस्करपणे कायदा विसरणारे- यांना अद्दल घडवल्याबद्दल तुमचे आभार. आम्हीच खतपाणी घालतोय या चोरटय़ा वृत्तींना.
हो, दहा मिनिटं जास्त खर्च होणार आहेत. हो, दोन दिवस आधीच भाज्यांची यादी करावी लागणार आहे. पण आता अधिकृत विक्रेत्यांकडेच भाजी घ्यायची ओके? ठरलं तर मग.! आणि हो, ज्यांना या निर्णयाचा जास्त त्रास होऊ शकतो, त्या आजारी व्यक्तींना किंवा जेष्ठ नागरिकांनाही आपण शक्य तेव्हा मदत करायची आहे.