मी तुमच्या कॉलमचा फॅन आहे. माझं वय २४ वर्षे असून उंची ५.४ फूट आहे आणि वजन ५५ किलो आहे. मी थोडा बारीक आहे. माझ्या वयापेक्षा मी लहान दिसतो. त्यामुळे मला खरा त्रास होतो. माझ्या कमी उंचीमुळे मी कुठल्या पार्टीला किंवा फंक्शनलासुद्धा जाऊ शकत नाही. लोक मला हसतील अशी भीती वाटते. मला यामुळे कधी कधी डिप्रेशनपण येतं. आता या वर्षी माझं शिक्षण संपून मला नोकरी लागेल. माझ्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडावी, यासाठी मी काय केलं पाहिजे, कसे कपडे घालावेत?
नितीन
प्रिय नितीन,
मुलांच्या अ‍ॅव्हरेज उंचीपेक्षा तुझी उंची कमी असल्यानं तुला कसं वाटत असेल हे मी खरंच समजू शकते. पण मला विचारशील तर उंचीचा आणि पर्सनॅलिटीचा काही संबंध नाही. तुझी उंची कितीही असली तरी तुझं व्यक्तिमत्त्व चांगलं असू शकतं. मला अशी अनेक मुलं माहिती आहेत, ज्यांची उंची कमी असूनदेखील इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी आहे. आपल्या समाजानं खरं तर अशा सो कॉल्ड आयडियल इमेज निर्माण केल्या आहेत. मुलींच्या बाबतीत जसं गोरी मुलगी सुंदर मानली जाते, तसं मुलगा उंच असेल तर चांगला मानला जातो. पण हळूहळू या संकुचित विचारातून आपण बाहेर येतोय. ‘ब्लॅक ब्युटी’ आता अ‍ॅप्रिशिएट केली जाते, डस्की ब्युटी म्हणून मुलींचं सौंदर्य टिपलं जातं, तसं मुलांच्या बाबतीतही ‘टॉल, डार्क अँड हँडसम’च्या पलीकडची पर्सनॅलिटी शोधली जाईल. उंची कमी असूनही अनेक मुलींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा आमीर खान हे याचं ठळक उदाहरण आहे. उंचीनं कमी असलेल्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांची अशी लिस्ट करता येईल एवढी उदाहरणं आहेत. कमी उंची म्हणजे सगळं संपत नाही. आता या बॉईश लुकला पर्याय शोधण्याचे दोन मार्ग तुझ्यापुढे आहेत. एक तर या लुकचा फायदा करून घेत चॉकलेट हिरोसारखी इमेज ठेवायची किंवा थोडा मेक-ओव्हर करून मॅच्युअर लुक आणायचा. तुझ्यासाठी दोनही पर्याय खुले आहेत. पण तुलाच यापैकी एकाची निवड करावी लागेल.
पहिल्या पर्यायाचा विचार केलास तर हेअरस्टाइलपासून कपडे, अ‍ॅक्सेसरीज सगळंच या चॉकलेट लुकला साजेसं असायला हवं. अर्धवट झालं तर वाईट दिसेल. आमीर खान, शाहीद कपूर यासारख्या चॉकलेट हिरोंच्या ड्रेसिंगचा, स्टाइलचा फोटो किंवा व्हिडीओ बघून थोडा अभ्यास कर. त्यांच्या चित्रपटातल्या भूमिकांच्या फोटोऐवजी रिअल लाइफमधले फोटो रिफर करणं चांगलं. शाहीदसारखी (इश्क विश्क) बॉडी कमावायची असेल तर मात्र जीममध्ये बराच घाम गाळावा लागेल, त्याची तयारी ठेव. मी इथे हिरोंची उदाहरणं देतेय याचं एकमेव कारण म्हणजे त्यातून मला काय म्हणायचंय ते तुला समजेल आणि या फेमस पर्सनॅलिटींशी आपण रिलेट होऊ शकतो.
दुसरा पर्याय आहे कम्प्लिट मेकओव्हरचा. ही कदाचित थोडी मोठी प्रक्रिया असेल. तुला वेट गेनपासून सुरुवात करायला लागेल. हेअरस्टाइल मॅच्युअर लुकला साजेशी हवी. दाढी-मिशा आणि कपडय़ांचा चॉइस सगळंच बदलावं लागेल. या लुकसाठी क्लीन शेव्ह आणि बॉईश वाटणारे कपडे सोडून दे. जीम किंवा कुठल्या हेल्थ प्रोग्रॅमला जायला हरकत नाही. पण अमुक दिवसात उंची वाढवा, वजन वाढवा वगैरे जाहिरातींना बळी पडू नकोस. कुठलीही गोष्ट कष्ट केल्याखेरीज मिळत नाही. असं इन्स्टंट काही नसतं आणि उंचीसारख्या गोष्टी आपल्या हातातही नसतात. अशा अवास्तव दावा करणाऱ्या प्रोग्रॅम्सचे साइड इफेक्ट होऊ शकतात.
या सगळ्याखेरीज काही सोप्या टिप्स विचारात घेतल्यास तर व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी उपयोग होईल. उभ्या रेघा असलेले शर्ट वापर. पण जाडीचा आभासही हवा असेल तर थोडय़ा जाड रेघांचे किंवा चेक्सचे शर्ट वापर. थोडं जाड दिसायचं असेल तर एकावर एक लेअर असलेले कपडे वापरायला हरकत नाही. म्हणजे टीशर्टवर शर्ट घालता येईल. फक्त मुंबईचं हवामान बघूनच हा निर्णय घे. बूटसुद्धा इनर सोल असलेले वापर. बाहेरूनदेखील उंच सोल असलेले शूज हल्ली मिळतात. त्यामुळे उंची थोडी जास्त दिसेल. दोन-तीन इंचाचा तरी यामुळे फरक पडू शकतो.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला तुझा आत्मविश्वास वाढवावा लागेल. तो कुठल्याही बाह्य़उपचारानं वाढत नाही. तो आतूनच वाढतो. तुला स्वत:बद्दल चांगलं वाटेल आणि तू आसपासच्या लोकांच्या कमेंट्सकडे लक्ष देण्याऐवजी स्वत:च्या मनाचं ऐकशील तेव्हाच तो वाढेल. आपली आहे तेवढी उंची मान्य केलीस की तुझं तुलाच मोकळं वाटेल, छान वाटेल. एकदा आपण स्वत:ला आवडलो की लोकांनासुद्धा आवडतो. आत्मविश्वास नसेल तर ते चेहऱ्यावर लगेच दिसतं आणि त्यानं व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम होतो. मग आपल्या हातून छोटय़ा छोटय़ा चुका व्हायला लागतात, याचा करिअरमध्ये परिणाम होऊ शकतो. तुझ्याकडे जे आहे त्याचा चांगला उपयोग करायला शिक म्हणजे आपोआप स्वत:वर प्रेम करशील. तुझ्या करिअरला आणि आयुष्याला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा!